संपूर्ण विश्वच आज दहशतवादाच्या सावटाखाली सापडलेले असताना योगायोगाने चीनला अद्याप त्याचा उपसर्ग पोहोचलेला नसल्याने आणि भारतावर वचक निर्माण करण्यासाठी पाकिस्तानला कुरवाळणे त्या देशाला गरजेचे वाटत असल्याने तो देश वारंवार असा चावटपणा करीत असला पाहिजे. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर अलीकडेच झालेल्या घातपाती हल्ल्याचे कारस्थान जैश-ए-मुहम्मद या पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर यानेच घडवून आणल्याचे ठोस पुरावे भारतापाशी आहेत. भारतात याआधी झालेल्याही अशाच अनेक घातपाती कृत्यांचे पितृत्वदेखील त्याच्याचकडे जाते. परिणामी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) जशी ‘जैशे’वर आंतरराष्ट्रीय बंदी लादली आहे, तशीच ती मसूदवरदेखील लादावी असा प्रस्ताव भारताने या संघटनेकडे पाठविला होता. संघटनेच्या सुरक्षा समितीच्या पाच कायम सदस्य देशांपैकी चौघांचा या प्रस्तावाला पाठिंबा असताना, चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करून युनोला याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यास भाग पाडले. सुरक्षा समितीच्या स्थायी सदस्यांमध्ये भारताचा समावेश केला जाण्यास पुन्हा चीनच विरोध करीत असून, त्यामागेही त्या देशाचे पाकला कुरवाळणे हेच कारण आहे. अन्यथा चीनला मसूद अझरचा पुळका येण्याचे काहीच कारण नाही. बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स शहरावर गेल्या पंधरवड्यात जो भीषण घातपाती हल्ला झाला त्यानंतर लगेचच भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी तिथे पोहोचले आणि त्यावेळी बोलताना त्यांनी युनोवर सडकून टीका केली. अतिरेकी आणि घातपाती कारवायांचे गांभीर्य अद्याप युनोच्या लक्षातच आलेले नाही असे ते म्हणाले. युनोवर वरचष्मा असलेल्या अमेरिकेत ९/११ होईपर्यंत भारतात होत असलेल्या घातपाती कारवाया म्हणजे साधा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे अशीच अमेरिकेची आणि म्हणून युनोची धारणा होती. पंतप्रधानांचा हा युक्तिवाद अंमळ सैल करायचा तर जोवर खुद्द चीनला अतिरेकी कारवायांचे चटके बसत नाहीत तोवर तो देशही असाच चावटपणा करीत राहील हे गृहीत धरायचे.