ट्वेंटी डेज इन मारियुपोल.. वास्तवाची क्रूर कहाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 07:53 AM2024-03-13T07:53:31+5:302024-03-13T07:56:28+5:30
या डॉक्युमेंट्रीचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील जवळपास सारंच चित्रण प्रत्यक्ष घटनास्थळी, युद्ध जेव्हा सुरू झालं त्यावेळीच करण्यात आलेलं आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला जवळपास दोन वर्षे होत आली आहेत. हे युद्ध संपायचं अजूनही नाव घेत नाही. या युद्धातील एकेक घटना आणि बातम्या, या युद्धात सर्वसामान्य नागरिकांचे किती हाल झाले, यासंदर्भातील तपशील हळूहळू बाहेर येत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या ऑस्कर पुरस्कारांत ‘ट्वेंटी डेज इन मारियुपोल’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या डॉक्युमेंट्रीचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील जवळपास सारंच चित्रण प्रत्यक्ष घटनास्थळी, युद्ध जेव्हा सुरू झालं त्यावेळीच करण्यात आलेलं आहे.
या माहितीपटात रशियन हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनियन शहर मारियुपोलचं चित्रण दाखवण्यात आलेलं आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या केवळ एका महिन्यातच हे शहर ९० टक्के नष्ट झालं. चित्रपटातील बहुतेक शॉट्स तेव्हाच रेकॉर्ड केलेले आहेत. युक्रेनचे फोटो-व्हिडीओ पत्रकार मस्टीस्लाव चेर्नोव यांनी प्राणावर उदार होऊन हे सारं चित्रण केलं आहे. आपल्या या माहितीपटाच्या आधारे युद्धभूमीवरील ‘आँखो देखा हाल’ दाखवताना रशियाच्या क्रूरतेची वास्तविकताही त्यांनी जगासमोर आणली आहे.
असोसिएटेड प्रेस (एपी) आणि पीबीएस फ्रंटलाइन यांनी संयुक्तपणे या माहितीपटाची निर्मिती केली आहे. चेर्नोव यांनीच या माहितीपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शनही त्यांचंच आहे.
दोन्ही देशांदरम्यान युद्धाचे ढग जमा होत आहेत हे कळताच वार्तांकनासाठी चेर्नोव तातडीनं मारियुपोलच्या दिशेनं निघाले. युद्ध सुरू होण्याच्या केवळ एक तास आधी ते मारियुपोल येथे पोहोचले. काही वेळातच युद्ध सुरू झालं. त्या दरम्यानची हिंसा, अत्याचार, विनाश त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. बॉम्बवर्षावात एकामागोमाग उद्ध्वस्त होणाऱ्या इमारती, जखमी आणि मृत पावणारे लोक, गंभीर जखमांमुळे आकांत करणारे नागरिक, जीव वाचवण्यासाठी लोकांचा सुरू असलेला आटापिटा, आपल्या डोळ्यांसमोर आपले परिजन गेल्यामुळे आक्रोश करणारे लोक, रक्ताचे वाहणारे पाट, जखमांमुळे होत असलेल्या वेदना सहन न झाल्यानं पुरुष, मुलं आणि महिलांनी तडफडत सोडलेले प्राण, जागोजागी अस्ताव्यस्त पडलेले त्यांचे मृतदेह, बॉम्बस्फोटानं उडवून देण्यात आलेली रुग्णालयं, चित्रपटगृहे आणि सामूहिक कबरी.. अशा अनेकानेक गोष्टींचं चित्रण त्यांच्या कॅमेऱ्यानं केलं. या हल्ल्यात चेर्नोव स्वत:ही अनेकदा बालंबाल बचावले, पण त्यांनी ना युद्धभूमी सोडली, ना पत्रकाराचा धर्म. युद्ध सुरू असताना प्रत्येक क्षण मृत्यूची मागणी करीत असतानाही मारियुपोल येथे तब्बल वीस दिवस ते राहिले. मुख्य म्हणजे जिवंत राहिले आणि हा सारा ‘इतिहास’ आपल्या माहितीपटाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा जिवंत केला.
त्यांनी जवळपास तीस तासांचं रेकॉर्डिंग केलं. माहितीपट बनवताना त्यातले अनेक शॉट्स एडिट करण्यात आले, पण त्यातला प्रत्येक क्षण रशियन सैनिकांची क्रूरता दाखवत होता. कोणत्याही युद्धात सर्वसामान्य निरपराध माणसं, मुलं, महिला मारली जाऊ नयेत हा सर्वसामान्य नियम, पण पाषाणहृदयी रशियन सैनिकांनी याबाबत कोणताही विधिनिषेध दाखवला नाही. मारियुपोल येथे एक नाट्यगृह आहे. त्यात अनेक माणसं होती. त्यावरही रशियन सैन्यानं क्षेपणास्त्रं डागली. युद्ध सुरू झाल्यामुळे या नाट्यगृहाच्या तळघरात सुमारे १३०० महिला आणि मुलांनी आसरा घेतला होता. या ठिकाणी लहान मुलं आणि महिला आहेत, हे हल्लेखोर सैनिकांना कळावं आणि त्यांनी तिथे हल्ला करू नये, यासाठी त्या नाट्यगृहावर मोठ्या अक्षरांत ‘लहान मुले’ असंही लिहिण्यात आलं होतं. तरीही रशियन सैनिकांनी ५०० किलोचे दोन बॉम्ब या नाट्यगृहावर फेकले. त्यात किमान सहाशेवर मुलं आणि महिला ठार झाल्या, तर बाकीचे गंभीर जखमी झाले!
रशियन सैनिकांनी मारियुपोलच्या मॅटर्निटी हॉस्पिटलवरही हल्ला केला. अनेक गर्भवती महिला तेथे उपचार घेत होत्या. रशियानं हल्ला केल्यानंतर जखमी गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवितानाचा युक्रेनियन सैनिकांचा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हल्ल्याच्या पहिल्याच महिन्यात मारियुपोलमध्ये जवळपास २० हजार लोक मारले गेले. रशियन सैनिकांनी त्यासाठी दोनशे सामूहिक कबरी खोदल्या आणि मृतदेहांची विल्हेवाट लावली. हे शहर रशियन सैनिकांनी नंतर ताब्यात घेतलं.
हे बलिदान कधीच विसरलं जाणार नाही!..
ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना चेर्नोव म्हणतात, किती बरं झालं असतं, जर हा चित्रपट बनवण्याची गरज मला पडली नसती, रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं नसतं, हजारो निरपराध लोक मृत्युमुखी पडले नसते.. सर्व लोकांना मुक्तपणे जगू द्या. इथे तातडीनं युद्धविराम घडवून आणा.. मारिओपोलच्या ज्या नरिपराध नागरिकांना युद्धात आपल्या प्राणांचं मोल द्यावं लागलं, त्यांचं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. सिनेमा आठवणी ताज्या करतो आणि आठवणी इतिहास घडवतात..