संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादकमराठी ग्रंथ व्यवहार करणारे लेखक, प्रकाशक, ग्रंथालये, ग्रंथपाल, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते सारेच सध्या अस्वस्थ आहेत. कारण नव्या मराठी लेखकांचा नवा वाचक वर्ग निर्माण होताना दिसत नाही. ग्रंथालयांची कोरोनापूर्वी असलेली सदस्यसंख्या कोरोना संपला, सर्वकाही सुरळीत झाले तरी पूर्ववत झालेली नाही. जे मोजकेच वाचक वाचतात ते आजही व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी वगैरे यांच्या पलीकडे जात नाही. त्याच लेखकांची तीच चिरकाल यशस्वी पुस्तके वाचण्याकडे कल आहे. विश्वास पाटील, अच्युत गोडबोले वगैरे काही मोजके अपवाद आहेत. वाचन संस्कृती आणि भाषा विषयक धोरण ठरवणाऱ्या समितीने ठाण्यात भेट दिली तेव्हा हे दाहक वास्तव उजेडात आले. नामदेव कांबळे हे या समितीचे अध्यक्ष असून, लेखक भानू काळे, समीक्षिका व लेखिका मीना वैशंपायन, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालक विजया डोनीकर, आदी यावेळी हजर होते.तरुण पिढी वाचत नाही हा दावा खरा नाही. तरुणांचा इंग्रजी वृत्तपत्रे, पुस्तके वाचण्याकडे कल आहे. त्यांचे लेखक नवे आहेत. अनेक तरुण हे ज्या क्षेत्रात करिअर करतात, त्या क्षेत्राशी संबंधित पुस्तके वाचण्यास प्राधान्य देतात. युट्युबवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, सामाजिक प्रश्न याबाबत विश्लेषण करणारे हजारो व्हिडीओ उपलब्ध आहेत. तरुण तेच पाहतात. या व्हिडीओसोबत या विषयांची सखोल माहिती घेण्याकरिता स्टडी मटेरियल दिले जाते. वेबसाईट सुचविल्या जातात. त्यावर जाऊन तरुण अधिक सखोल माहिती घेतात. ग्रामीण भागातील व वेगवेगळ्या मागास जाती-जमातीमधील पहिल्या किंवा दुसऱ्या सुशिक्षित पिढीतील सदस्य भाषिक वृत्तपत्रे व साहित्य वाचतात. संघर्ष करून उभ्या राहिलेल्यांबद्दल त्यांना वाचायला आवडते. त्याचवेळी शहरातील पन्नाशीच्या आसपास व त्यापेक्षा जास्त वय असलेला वाचक मात्र जीवनसंघर्षाच्या कथांपेक्षा रंजनावर भर देतो. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये उत्तम ग्रंथालयांचा अभाव आहे. डोंबिवलीसारख्या शहरात दोन हजार विद्यार्थ्यांच्या शाळेत ५०० पुस्तकांचे ग्रंथालय नसेल तर वाचन संस्कृती काय कपाळ रुजणार? ग्रंथसखाचे शाम जोशी यांनी समितीला सांगितले की, कोरोनापूर्वी त्यांच्या ग्रंथालयाचे पाच हजार सभासद होते. आता केवळ ३०० राहिले. परंतु, तरीही त्यांनी यावर्षी तीन लाख रुपये किमतीचे महाराष्ट्रातील बहुतांश दिवाळी अंक खरेदी केले. ३०० सभासदांकडून दिवाळी अंकाच्या वर्गणीकरिता जेमतेम साडेतीन हजार रुपये जमा झाले. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याकरिता असे झपाटलेपण हवे.
वाचन संस्कृती कशी वाढेल?सरकारची वाचन संस्कृतीकरिता नेमलेली समिती अजून अभ्यास करतेय. त्यांचा अहवाल तयार होईपर्यंत राज्यात निवडणुका होतील. तेव्हा कोण कुणाबरोबर येऊन सरकार स्थापन करील व नव्या सरकारला केव्हा अहवाल पाहायला वेळ मिळेल त्याची शाश्वती नाही.
शाम जोशी यांनीच मराठी पुस्तकांच्या १० हजार प्रस्तावनांची सूची तयार केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तब्बल १५४ पुस्तकांकरिता प्रस्तावना लिहिल्याचे आढळून आले. राज्याचे राजकीय नेतृत्व इतके साहित्यप्रेमी असल्याखेरीज वाचन संस्कृती वृद्धिंगत होत नाही.