काही वर्षांनी माणसाला राहायला पृथ्वीवरील जागा कमी पडेल, हे तर खरंच आहे. येणाऱ्या पिढ्यांनी राहायचं कुठे हा प्रश्न तर आजच जगभरात गहन झाला आहे. त्यामुळेच इमारतींचा विस्तारही आडवा होण्याऐवजी आता उभा आकाशाच्या दिशेनं होतो आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यातलं हे संकट ओळखून जगभरातल्या संशोधकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून परग्रहावर जागा शोधायला सुरुवात केली आहे. मंगळापासून ते आकाशगंगेतील आणखी कोणकोणत्या ग्रहांवर आपलं बाडबिस्तार टाकता येईल, याचा शोध कधीचाच मानवानं सुरू केला आहे. त्यासंदर्भात काही आशेची किरणंही दिसू लागली आहेत.
सर्वसामान्य माणसांनाही अंतराळात घेऊन जाण्याच्या सफरी सुरू झाल्या आहेत. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि 'स्पेस एक्स' या कंपनीचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी तर येत्या काही वर्षांत मंगळावर स्वतंत्र मानवी वसाहत उभारण्याचा चंगच बांधला आहे. त्यासाठी त्यांची तयारीही सुरू झाली आहे. भविष्यात परग्रहावरील वस्ती शक्य होईलही, पण संशोधकांना छळणारा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंगळ किंवा आणखी एखाद्या ग्रहावर मानव जाईलही, पण तिथे तो आपली प्रजा, आपला वंश कसा वाढवणार? शास्त्रज्ञांच्या मते, आपला वंश वाढवणं हेच या विश्वातल्या प्रत्येक सजीवाचं प्रमुख उद्दिष्ट असतं, पण अत्यंत कमी जवळपास शून्य गुरुत्वाकर्षण शक्ती असलेल्या परग्रहांवर मानवाला हे शक्य होईल का, हा कळीचा प्रश्न आहे. 'आम्ही तुम्हाला अंतराळात घेऊन जाऊ, मंगळावर मानवाची वस्ती उभारू' असं अनेकजण ठामठोक सांगतात, पण तिथे तुम्हाला तुमचा वंश वाढवता येईल का, याविषयी कोणीच काहीच बोलत नाही.
संशोधकांनी त्या दृष्टीनं प्रयत्न केले नाहीत, असं नाही. पण निदान आजपर्यंत तरी त्यांना त्यात अपयशच आलं आहे. आजवर अनेक अंतराळवीर अवकाशात जाऊन आलेत, काहीजण तर महिनोन्महिने तिथे राहून आलेत, पण त्यांनीही सांगितलंय, अंतराळात आम्ही शरीरसंबंधांचा अनुभव घेतलेला नाही. अंतराळात प्रजनन यशस्वी होतं की नाही, याची चाचणी घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी आजवर अनेक सजीव अंतराळात पाठवले आहेत, पण त्यातला कोणताच प्रयोग आजवर यशस्वी झालेला नाही. हे प्रयोग यशस्वी होऊ शकतील, याबाबत मात्र संशोधक आशावादी आहेत.
याच प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणून चीन लवकरच माकडांना अंतराळात पाठवणार आहे. चीननं अंतराळात नुकतंच तियोंगांग स्पेस स्टेशन' तयार केलं आहे. संशोधक झांग लू यांचं म्हणणं आहे, माकडं आणि उंदरांवर संशोधन करताना अंतराळात प्रजनन शक्य आहे का आणि ते आपला वंश कसा वाढवतात हे जाणून घेतलं जाईल. अंतराळातील मानवी वसाहतींसाठी हे संशोधन मैलाचा दगड ठरणार आहे.
माकडांना मानवाचं पूर्वज मानलं जातं तसंच मानव आणि माकडं यांच्या प्रजननात बरंच साम्य असल्यामुळे या प्रयोगासाठी माकडांची निवड करण्यात आली आहे. प्राण्यांचा आकार जेवढा मोठा तेवढी संशोधकांची आव्हानंही वाढतात. या प्रयोगासाठी जे संशोधक अंतराळात जातील त्यांच्यावर माकडांचं खाणंपिणं, त्यांनी केलेला कचरा साफ करणं, त्यांची मानसिकता सांभाळणं या जबाबदाऱ्याही असतील.
यापूर्वी प्राण्यांवर अंतराळात जे प्रयोग झाले आहेत, त्यात आढळून आलं आहे की, अंतराळात प्राण्यांचे सेक्स हार्मोन्स कमी होतात. जास्त काळ अंतराळात राहिल्यामुळे शुक्राणू आणि बिजांडांचा दर्जाही खालावतो. अंतराळात प्रजनन शक्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी नासानं आतापर्यंत अमिबा, शेवाळ, मधमाशा, कृमी, कोळी, गोगलगाय, जेलीफिश, बेडूक, ससे, कासव, कोंबडीची अंडी, उंदीर इत्यादी सजीव अवकाशात पाठवले आहेत. बहुतेक प्रयोगांत अपयशच आलं आहे किंवा एका मर्यादिपर्यंतच त्यांना यश आलं आहे.
.. मात्र एकाही पिलानं जन्म घेतला नाही!
सोव्हिएत रशियानंही याच प्रयोगासाठी ४३ वर्षांपूर्वी म्हणजे १९७९मध्ये काही उंदरांना अंतराळात पाठवलं होतं. हे उंदीर अंतराळात १८ दिवस होते. शारीरिक आव्हानांचा सामना करताना काही उंदरांनी तिथे संबंध प्रस्थापित केले, गर्भधारणेची लक्षणंही त्यातील काही मादी उंदरांमध्ये दिसली, मात्र पृथ्वीवर परत आल्यानंतर उंदरांच्या एकाही पिलानं जन्म घेतला नाही. नासान पहिल्यांदा १९४२मध्ये एका माकडाला अंतराळात पाठवलं होतं, पण जीव गुदमरून त्याचा मृत्यू झाला. १९४८मध्ये पुन्हा केलेल्या प्रयोगात पृथ्वीवर परतल्यानंतर ते माकड मृत्युमुखी पडलं. १९५१मध्येही काही माकडं आणि उंदरांना अंतराळात पाठवलं होतं, पण पृथ्वीवर परतल्यांनतर त्यांचाही काही तासांतच मृत्यू झाला.