बाबूजींनी घेतलेले मोठे निर्णय राज्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी उपयोगी ठरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 11:40 AM2022-07-02T11:40:49+5:302022-07-02T11:42:27+5:30
मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या विकासावर दीर्घ परिणाम करणारी ठरली. फलोत्पादन, मत्स्योत्पादन, रेशीम उत्पादन, पामतेल, रबर उद्योग, काजू लागवड, फळप्रक्रिया उद्योग यावर भर दिला पाहिजे, हा त्यांचा विचार द्रष्टेपणाचा होता.
देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र -
विलक्षण द्रष्टेपणाचा संगम म्हणजे बाबूजी, अर्थात जवाहरलालजी दर्डा. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव होता आणि ज्यांचा आदरपूर्ण उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही, असे बाबूजी. शेती, पत्रकारिता आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये अधिकाराने वावरणारे बाबूजी हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व.
हिंदीशी ममत्व आणि मराठीशी जन्माचे नाते असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने ‘लोकमत’ हे वृत्तपत्र अविश्रांत कष्टाने मोठे केले. ‘लोकमत’चे यश हे निव्वळ व्यावसायिक नव्हे, तर ते बाबूजींच्या संस्कारांचे आणि भूमिकेचेही यश आहे. मंत्रिमंडळात १७ वर्षे राहिल्यानंतरही बाबूजींनी सरकार किंवा मंत्रिपद आणि पत्रकारिता यांची सरमिसळ कधीच होऊ दिली नाही. राष्ट्रीय विचारप्रवाह आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा त्यांनी बापूजी अणेंकडून घेतला आणि तो जपण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ‘लोकमत’ या नावाला लाभलेल्या लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादाचा विसर त्यांनी क्षणभरही पडू दिला नाही.
बाबूजींची दूरदृष्टी, त्यांचे कष्ट आणि पत्रकारितेतील समर्पण अशी विविध रूपे डोळ्यांपुढे उभी राहतात. प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्व, भेदाभेद न करणारे आणि मंत्रिपद मिळाले तरी हुरळून न जाणारे तसेच मंत्रिपद नसले तरी निराश न होणारे एक कर्मयोगी अशी बाबूजींची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. त्यांच्या विचारांची अमिट छाप महाराष्ट्रातील- विशेषत: विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रावर आहे.
मी पहिल्यांदा महापौर झालो, तेव्हा त्यांनी आवर्जून मला ‘लोकमत’मध्ये बोलावून स्वागत केले होते. ‘लोकमत’च्या कार्यालयात प्रवेश करताच उजव्या बाजूला असलेले त्यांचे कार्यालय आणि तेथे बसलेले प्रसन्नचित्त आणि हसतमुख बाबूजी मला आजही आठवतात. त्यांचेच गुण विजयबाबू आणि राजेंद्रबाबू यांच्यात पुरेपूर उतरले आहेत. आज त्याच संस्कारांचा वारसा हे दोघे पुढे नेत आहेत.
समाजातील सर्वच घटकांशी, सर्व विचारधारांच्या धुरिणांशी त्यांनी वैयक्तिक स्नेहबंध जपला. बाबूजींमध्ये उपजतच सौंदर्यदृष्टी होती. अनेक शहरांमध्ये स्थापलेली ‘लोकमत’ची कार्यालये सौंदर्य आणि उपयोगिता यांचे उत्कृष्ट नमुने आहेत. अपारंपरिक ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करणारी त्यांची कार्यालये व मुद्रणस्थळे म्हणजे आधुनिक तंत्रसामर्थ्याचा आविष्कार ठरावा.
मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या विकासावर दीर्घ परिणाम करणारी ठरली. फलोत्पादन, मत्स्योत्पादन, रेशीम उत्पादन, पामतेल, रबर उद्योग, काजू लागवड, फळप्रक्रिया उद्योग यावर भर दिला पाहिजे, हा त्यांचा विचार द्रष्टेपणाचा होता. त्यासाठी त्यांनी पडीक आणि खार जमिनींचा उपयोग करून घेतला.
उद्योगमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रासाठी समग्र विकास आराखडा मांडला होता. औद्योगिक विकासाचा वेग वाढावा, यासाठी मोठ्या उद्योगांबरोबरच लहान उद्योगांनाही हात दिला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यादृष्टीने त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील २५ टक्के जागा लहान उद्योगांसाठी आरक्षित केल्या होत्या. हे मोठे निर्णय राज्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी उपयोगी ठरले.