स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास सोसलेला आणि या चळवळीची मूल्ये अखेरपर्यंत जपलेला कट्टर गांधीवादी, महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यासाठी मंत्रिपदांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा प्रत्येक दिवस कारणी लावलेला मुत्सद्दी राजकारणी, कट्टर राजकीय मतभिन्नता असलेल्या, विरोधी पक्षीयांशी व्यक्तिगत जीवनात सहजतेने स्नेह जपणारा दिलदार मित्र, राजकीय जीवनातली टीकेची वादळे झेलतानाही सुसंस्कृत वाणी-वर्तनाची अभिजात संस्कृती जपणारा जन्मदत्त अभिजन, गावखेड्यांतल्या तरुणांना हाताशी घेऊन ‘लोकमत’ची पायाभरणी करणारा दूरदृष्टीचा संपादक, दिलदार रसिक निसर्गप्रेमी अशा मोहक व्यक्तिविशेषांचे धनी, ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज प्रारंभ होत आहे.
वरील गुणविशेषणे ही ज्यांच्या आयुष्याचा मुख्य आधार होती; ते बाबूजी! ‘लोकमत’चे साप्ताहिक करून पुढे त्याचे दैनिकात रूपांतर करायचे ठरवले तेव्हा - म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी- राजकारणात सक्रिय असलेल्या बाबूजींना मुंबईचे अवकाश मोकळे होते. पण बाबूजींचे म्हणणे, पत्रकारांचे पाय मातीने मळणार नसतील, तर तळागाळातल्या माणसांची सुख-दु:खे दिल्ली-मुंबईतल्या सत्ताधीशांपर्यंत कोण पोहोचवणार? बाबूजींनी दिलेला ‘जिथे एसटी, तिथे लोकमत’ हा म्हटले तर साधा, पण कळीचा मंत्र ‘लोकमत’च्या आजच्या व्यावसायिक विस्ताराचा-यशाचा कणा बनून राहिला आहे.
माध्यम समूहाचा संस्थापक- मालक स्वत:च सत्तापदी असेल, तर धूसर बनणारी लक्ष्मणरेषा किती आणि कशी कसोशीने पाळता येते, याचा वस्तुपाठच बाबूजींनी आपल्या नि:स्पृह वर्तनाने घालून दिला. ‘लोकमत’मधल्या संपादक- पत्रकारांना बाबूजी सांगत, ‘तुमच्या पत्रकारितेला सत्य आणि साहस दोन्हीची साथ असली पाहिजे. ती इतकी पक्की हवी की मी ज्या खात्याचा मंत्री आहे, त्यातल्या गैरकारभाराबद्दलही जाब विचारण्याची हिंमत तुमच्यात असली पाहिजे!’ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वाट्याला आलेल्या प्रत्येक खात्यावर त्यांनी आपला ठसा उमटवला. उद्योग, ऊर्जा, पाटबंधारे, अन्न व नागरी पुरवठा, आरोग्य, नगरविकास अशी महत्त्वाची खाती सांभाळत असताना सर्वसामान्यांसाठी त्यांनी सत्ता वापरली. त्यांच्याच कार्यकाळात ग्रामीण महाराष्ट्रात तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक वसाहती पोहोचल्या.
काँग्रेस पक्षावर त्यांची अविचल निष्ठा होती. राजकीय-सार्वजनिक जीवनात सन्मान मिळाला, त्याचप्रमाणे अनेकदा कठोर टीकेचाही सामना करावा लागला. पण त्याप्रसंगी ना त्यांचा संयम सुटला, ना पक्षनिष्ठा ढळली! ते शांतपणे आपले काम करीत राहिले. राजकीय धकाधकीतही व्यक्तित्वाचा हा समतोल रसिकतेने सांभाळण्याची दिलदारी त्यांना मिळाली ती त्यांनी जपलेल्या साहित्य-संगीत आणि निसर्गावरच्या अजोड प्रेमातून! सत्तापदे गेली, अधिकाराच्या खुर्च्या सोडायची वेळ आली तेव्हाही बाबूजी कधी हतबल झाले नाहीत, कारण विधिमंडळाइतक्याच उत्साहाने यवतमाळच्या शेतीत स्वत: राबण्याची धुंदी त्यांनी अखेरपर्यंत टिकवली होती.
बाबूजी मुंबईत असोत, नागपुरात असोत वा यवतमाळच्या घरी; त्यांच्या टेबलावर मोगऱ्याच्या ताज्या फुलांची परडी दरवळत असेल, तेव्हा ते प्रसन्न होऊन गाण्याची लकेर गुणगुणत!- हेच त्यांच्या व्यक्तित्वाचे खरे सामर्थ्य होते! स्वातंत्र्यलढ्यातल्या सत्याग्रहाचे, तुरुंगवासाचे तेजस्वी पर्व आणि देशउभारणीच्या स्वप्नासाठी वेचलेले कर्तृत्ववान तारुण्य... दिल्ली-मुंबईच्या सत्ता दरबारात सामान्यांचा आवाज पोहोचावा म्हणून गावखेड्यांतल्या तरुणांना हाताशी घेऊन केलेली ‘लोकमत’ची पायाभरणी आणि सत्तेच्या खुर्चीवर असतानाही निर्लेप राखलेली नि:स्पृह पत्रकारिता... प्रत्येक सत्तापदाचा वापर महाराष्ट्राच्या कल्याणार्थ व्हावा म्हणून कसोशीने, तळमळीने निभावलेले मंत्रिपदांचे प्रदीर्घ कार्यकाळ आणि सत्तेच्या मोहमयी आखाड्यात सदैव लखलखलेली अढळ पक्षनिष्ठा... राजकारण-समाजकारणाच्या अखंड धकाधकीत सांभाळलेली सौजन्यशील रसिकता आणि जिवाला जीव देणाऱ्या स्नेही-सोबत्यांचा, सहकाऱ्यांचा, मुलं-सुना-नातवंडांचा, प्रेमाने रुजवलेल्या झाडापेडांचा बहरलेला श्रीमंत गोतावळा!... तुमचे अवघे जीवन ही एक अखंड साधना होती, बाबूजी ! त्या समर्पित साधनेला कृतज्ञ नमस्कार...