महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेची रणदुदुंभी वाजली आहे. दिवाळीपर्यंत जागावाटप, उमेदवारी वगैरे माहाैल राहील. दिवाळीनंतरचे पंधरा दिवस प्रत्यक्ष निवडणूक प्रचार होईल. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील महायुती ताकदीने रिंगणात उतरली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अतिआत्मविश्वासात राहिलेले कार्यकर्ते कामाला लागले आहेत. वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेला एखादा विद्यार्थी परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाचा रट्टा मारून पेपर सोडवतो, तशा अवस्थेत महायुती सरकार गेले चार महिने आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला धक्का दिला. त्याची कारणे समोर येताच ज्या ज्या घटकांची स्पष्ट नाराजी दिसली त्यांना खुश करण्यासाठी पावले उचलली गेली. लोकसभेवेळी जातीपातीचे मुद्दे ऐरणीवर असल्यामुळे एकेक समाज विचारात घेऊन महामंडळांचे घाऊक वाटप करण्यात आले. तरुण मतदार बेरोजगारीच्या मुद्द्यावर नाराज असल्याने त्यांच्यासाठी काही तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना जाहीर केल्या गेल्या. महागाईमुळे त्रस्त महिलांना खुश करण्यासाठी तसेच महिलांची मतेच पुन्हा सत्तेचे सिंहासन मिळवून देऊ शकत असल्याने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणली.
राज्याच्या तिजोरीचा अजिबात विचार न करता समोर दिसेल त्या प्रत्येक घटकाला भरपूर काही देण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या सगळ्या योजनांचा जोरदार प्रचारही करण्यात आला. लोकसभेतील खड्डा भरून काढण्यासाठी सत्ताधारी महायुती झटत असताना महाविकास आघाडीकडून लोकसभेतील यश कायम ठेवण्याचा निर्धार कायम आहे. तसे पाहता लोकसभेत ३१ जागा जिंकल्यामुळे महाविकास आघाडीत बऱ्यापैकी शैथिल्य आले होते. आता सत्ता आपलीच आहे, केवळ निकाल बाकी आहे, असे समजून आघाडीचे नेते मुख्यमंत्रिपदावरून शह-काटशहात गुंतले होते. जमिनीपासून चार बोटे अंतरावर चालणारा आघाडीचा रथ जमिनीवर टेकविला तो हरयाणाच्या निकालाने. हमखास विजयाची खात्री असलेल्या हरयाणात भाजपच्या सूक्ष्म नियोजनाने काँग्रेसचा म्हणजे देशपातळीवर ‘इंडिया आघाडी’चा व महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा स्वप्नभंग केला. नेत्यांची भाषा लगेच बदलली. नव्याने डावपेच तयार करण्यासाठी बैठकांवर बैठका होऊ लागल्या.
आता बहिणींचे प्रेम व सरकारच्या लाभाच्या योजनांवर मदार असलेली महायुती आणि लोकसभेप्रमाणेच जनमताचा काैल आपल्याकडे ठेवण्यासाठी झटणारी महाविकास आघाडी यांच्यात महाराष्ट्रातील सत्तेसाठी मुख्य सामना होत आहे. या दोन आघाड्यांमध्ये मिळून सहा पक्ष ही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे जागावाटप ही दोन्ही फळ्यांसाठी कसोटी असेल. अर्थातच, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असणाऱ्यांची संख्या मोठी असेल. त्याशिवाय बच्चू कडू, युवराज संभाजीराजे, राजू शेट्टी आदींची परिवर्तन महाशक्ती आघाडी, ॲड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी व राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे आणखी काही पक्ष लढतीत असतील. परिणामी, सगळीकडे बहुरंगी लढती होतील. थोडक्यात, महाराष्ट्रात राजकीय महाभारत घडू पाहत आहे. पण त्या लढाईत कुरुक्षेत्रावर एकमेकांविरुद्ध दिवसा लढणारेदेखील सूर्यास्तानंतर युद्ध थांबल्यावर एकमेकांना भेटत होते, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची गाैरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा केवळ महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन पुढे चालवता येणार नाही. केवळ भूतकाळावर या परंपरेचे पालनपोषण होत नाही. ती वर्तमानातही जपली जावी, अशी मतदारांची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षांत ती अपेक्षा पार धुळीला मिळाली आहे.
आपण ज्यांच्या विरोधात अनर्गळ वक्तव्ये करीत आहोत त्यांची उंची, त्यांचा सार्वजनिक जीवनातील कालखंड याबद्दल विचार न करता बोलणाऱ्या, तोंड उघडले की घाणच बाहेर पडते अशा वाचाळवीरांची टोळीच तयार झाली आहे. हे केवळ बोलघेवडे किंवा वाचाळवीर नाहीत. त्या पातळीच्या खाली ते कधीच घसरले आहेत. भूतकाळातील अनेक प्रसंग असे आहेत की, नेत्यांनी विरोधकांना सन्मानाने वागविले, विरोधात प्रचारासाठी आले असतानाही त्यांची काळजी घेतली. अगदी ज्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढतो आहोत त्यांच्याच घरी मुक्कामाचीही उदाहरणे आहेत. आता मात्र राजकीय स्पर्धेची जागा शत्रुत्वाने घेतली आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे. याचमुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान पवित्र कर्तव्य वाटावे, ही भावना रुजविण्याची जबाबदारी राजकीय पक्ष, नेत्यांवर आहे. तिचे भान ठेवले गेलेच पाहिजे.