चार दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा त्यांच्याविरुद्ध प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील अवमानजनक टिपणीबद्दल दाखल सगळे गुन्हे एका ठिकाणी वळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यांचा अर्ज नाकारण्याआधी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने, राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या म्हणजे काहीही बोलायचा परवाना नव्हे, तुमच्या एका वक्तव्याने देशभर आग लागली आहे, तुम्ही देशाची माफी मागायला हवी होती, अशा शब्दांत त्यांची खरडपट्टी काढली. भडक वक्तव्यांनी वातावरण पेटविणारे धर्मगुरू स्टुडिओत जमविणाऱ्या वृत्तवाहिन्या, तसेच गुन्हा दाखल होऊनही नूपुर शर्मांना हात न लावणाऱ्या दिल्ली पोलिसांनाही न्यायालयाने फैलावर घेतले.
दरम्यान, नूपुर शर्मांचे समर्थन केल्याबद्दल कन्हैयालाल नावाच्या टेलरची नृशंस हत्या राजस्थानात उदयपूर येथे उजेडात आली. त्याच्या आठवडाभर आधी महाराष्ट्रात अमरावती येथे उमेश कोल्हे नावाच्या पशुऔषधी केमिस्टची अशीच हत्या झाली. तिचा संबंध नुपूर शर्मांच्या समर्थनाशी असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला; परंतु राज्यातील जनतेचे लक्ष त्यावेळी राजकीय बंडाळी, बंडखाेर शिवसेना आमदारांच्या सुरत, गुवाहाटी पर्यटनाकडे होते. सर्वोच्च न्यायालयात नूपुर शर्मांची कानउघाडणी होत असतानाच केंद्रीय गृहखात्याने उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला उतरवले. प्रकरण चव्हाट्यावर आले. आता हा तपास एनआयएकडे गेला आहे. सुनियोजित पद्धतीने हत्या करणारे सात आरोपी अटक आहेत. आठव्याचा शोध सुरू आहे. कोल्हे यांच्या हत्येसंबंधी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. नागपूरमध्येही अशीच एक घटना घडता घडता वाचली. संबंधिताने शहर सोडल्याने जीव वाचला. पोलिसांनी आता त्यांना संरक्षण दिले आहे. समाज, देशाबद्दल गंभीर चिंताजनक असे हे वातावरण आहे.
धर्मांधता इतकी भिणलीय की लोक बेभान झाले आहेत. दुसऱ्या धर्माच्या लोकांचे गळे चिरण्यापर्यंत हा विखार खोलवर झिरपला आहे. धार्मिक भावना काचेपेक्षाही नाजूक बनल्या आहेत. त्या कशाने म्हणजे कशानेही दुखावल्या जाऊ लागल्या आहेत. कुणाला स्वत:च्या धर्माची चिकित्सा सहन होत नसेल तर ते एकवेळ समजू शकते; परंतु दुसऱ्याच्या धर्माची चिकित्सा करण्यासाठी झुंडी सरसावल्याचे अत्यंत विषण्ण करणारे चित्र अवतीभोवती आहे. अनेक प्रकरणांमध्ये पोलीसही पक्षपाती वागत आहेत. नूपुर शर्मांवर कारवाई होत नाही, पण त्यांचे वक्तव्य उजेडात आणणारे पत्रकार मोहम्मद झुबेर यांना चाळीस वर्षांआधी एका चित्रपटात दाखविलेल्या दृश्यावर आधारित चार वर्षांपूर्वीच्या ट्वीटसाठी अटक होते. या पार्श्वभूमीवर, केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी ईशनिंदेसाठी माणसांचे गळे चिरण्याची प्रवृत्ती कशी तयार होते, त्यासाठी शिक्षणाचे चुकीचे माध्यम कसे जबाबदार आहे, हे सांगतानाच एका महत्त्वाच्या गोष्टीकडे देशाचे लक्ष वेधले आहे. उदयपूर, अमरावती यांसारख्या घटना हे धार्मिक द्वेषाच्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. त्यावर कोणीच बोलत नाही, हे त्यांचे मत विचार करायला लावणारे आहे.
शाहबानो खटल्यावेळी मौलवींच्या नादाला लागू नका, असे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सांगणारे, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारे हेच आरीफ मोहम्मद खान. स्वत:च्या धर्मातील अनिष्ट चालीरीती, परंपरा व मान्यतांबद्दल ते स्पष्ट बोलतात. इतरांनीही असेच स्वधर्माबद्दल बोलले तर बरे हाेईल. कारण, या देशाला धर्म चिकित्सेची दीर्घ परंपरा आहे. सध्याचे विद्वेष, विखार, घृणा, अविश्वासाचे वातावरण ही भारताची पूर्वापार ओळख नाही. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध असे विविध धर्म शेकडो वर्षे इथे एकत्र नांदत आहेत. धार्मिक विविधतेमधील एकता हा भारताचा विशेष आहे. म्हणूनच इथला असा टोकाचा धार्मिक द्वेष व त्यावरून होणारा रक्तपात जगासाठी धक्कादायक आहे. तथागत गौतम बुद्ध व महात्मा गांधींच्या देशात हे घडत असताना ज्यांनी हे रोखायला हवे ते राजकीय नेते शांत आहेत. सत्तेवरील मंडळी लोकांना शांत राहण्याचे, धार्मिक बाबींबद्दल सहिष्णू बनण्याचे साधे आवाहनही करीत नाहीत. हा विखार समाज व देश संपवून टाकेल हे ज्यांना समजते ते विद्वान विचारवंत, समाजसेवक जणू दिङ्मुढ आहेत. सद्हेतूने सहिष्णुतेबद्दल बोललो, समाज जोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावरही परधर्माच्या लांगूलचालनाचे आरोप होतील, ही त्यांची भीती हा आणखी कितीतरी गंभीर प्रकार आहे.