- किरण अग्रवाल
मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अकोला जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आल्याने येथील रखडलेली, अडखळलेली विकासकामे मार्गी लागून विमानतळ विस्तारीकरणासारखे भविष्यकालीन उपयोगितेचे प्रकल्प साकारण्याची अपेक्षा उंचावून गेली आहे.
सरकार आपले असले तरी सत्ता ही राबविता यावी लागते, तरच कामे मार्गी लागतात; अन्यथा विकासाचे अनुशेष वाढत गेल्याखेरीज हाती फारसे काही लाभत नाही. अकोलेकरांनी याचा अनुभव गतकाळात घेऊन झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकत्वाची धुरा येताच सर्वांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक ठरले असून, त्याची चुणूक त्यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसून आली.
अकोला हे होते वा आहे तसेच राहिले व सोबतचे अमरावती कितीतरी पुढे निघून गेले; अशी खंत येथले अनेक जण बोलून दाखवतात, कारण नैसर्गिक न्यायाने जो विकास झाला त्याखेरीज नियोजनपूर्वक येथील विकासाचे प्रश्न फारसे मार्गी लागू शकले नाहीत. शहर वाढले, लोकसंख्या वाढली; नगरपालिकेची महानगरपालिका झाली, पण प्रश्न तसेच राहिलेत. विनयकुमार पाराशरे यांच्या काळात अकोल्याच्या विकासाची सर्वत्र चर्चा होत असे. राज्यातील अन्य नगरपालिकांची शिष्टमंडळे अकोल्यात भेटी देऊन व येथली कामे बघून, प्रेरणा घेऊन जात; आज ‘गेले ते दिन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. अलीकडील काळात शहरात झालेले उड्डाणपूल व चार दोन कामे वगळता बोट दाखवावे असे अभिमानास्पद काय साकारले, असे विचारले गेल्यास कुणालाही तत्काळ उत्तर देता येत नाही अशी एकूण स्थिती आहे.
अकोल्याच्या विकासाचा मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी राहण्यामागे नेतृत्वाच्या दूरदृष्टीचा अभाव हेच कारण प्रत्येकाकडून दिले जाते, तेच खरे असावे; कारण या जिल्ह्याचे नेतृत्व तर अनेक मान्यवर व मातब्बरांनी केले; परंतु भविष्यकालीन गरजांची जाण ठेवून नियोजनबद्ध विकासाची मानचिन्हे अपवादानेच साकारली गेल्याचे दिसून येते. केवळ रस्ते, वीज, पाण्याच्या समस्या सोडवणे याला विकास म्हणता येत नाही, या बाबी गरजेपोटी ओघाने होतातच. काळाची आव्हाने लक्षात घेऊन नियोजनपूर्वक जे साकारले जाते तो खरा विकास. त्यासाठी नेतृत्वकर्त्यांमध्ये दूरदृष्टी असावी लागते. अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्याने त्याच संदर्भाने अकोलेकरांच्या अपेक्षा उंचावून गेल्या आहेत.
फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असल्याने ते कसे काम करणार, असा प्रश्न करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पायडरमॅन म्हणून त्यांची संभावना केली होती, परंतु अकोला जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत विविध कामांचे निपटारे करीत त्यांनी त्यांच्या गतिमानतेची चुणूक दाखवून दिली. जिल्ह्यातील रस्त्यांच्या खराब दर्जाची कामे सध्या टीकेचा मुद्दा बनली आहेत, या कामांचा खराब दर्जा खपवून घेणार नाही, अशी तंबी देतानाच रस्त्यांसोबत शाळांमधील खराब वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. नवीन विकास कामांसाठीचे प्रस्ताव मागवतानाच अकोलेकरांना प्रतीक्षा असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुढील नोव्हेंबरपर्यंत पदभरती करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची आनंद वार्ताही त्यांनी दिली. फडणवीसांमुळेच सारे विभागप्रमुख स्वतः बैठकीस हजर होते. आदळ आपट व केवळ इशारेबाजी न करता ही बैठक गांभीर्याने पार पडलेली दिसून आली.
फडणवीस यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणूनच नव्हे, तर मुख्यमंत्री म्हणूनही नेतृत्व केले आहे; त्यामुळे कोणती कामे कशी मार्गी लावायची हे त्यांना पूर्ण ज्ञात आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निकड लक्षात घेता त्यांनी पहिल्याच बैठकीत तातडीने निर्णय घेतला, त्याच पद्धतीने अकोल्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी येथील विमानतळाचे विस्तारीकरण व संचालन गरजेचे असल्याने आगामी काळात त्याहीबाबतीत दूरदृष्टीने फडणवीस यांच्याकडून निर्णय व पाठपुराव्याची अपेक्षा आहे.
सारांशात, फडणवीस यांच्याकडे अकोला जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ज्या पद्धतीने निर्णय घेतले गेले ते पाहता, जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघण्याची अपेक्षा बळावून गेली आहे. निर्णयाप्रमाणे कामे न झाल्यास उत्तरे द्यावी लागणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणाही गतिमान होण्याची अपेक्षा आहे.