- जावेद जब्बार, ख्यातनाम पत्रकार, कराचीसंस्कृती, समाज आणि सरकार- गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तानने तिन्हींच्या बाबतीत दोन टोकांमधला प्रवास अनुभवला आहे. स्वातंत्र्याच्या वेळी पश्चिम पाकिस्तान मेहगडपासून सुरू होऊन नंतर मोहंजोदारोपर्यंत विस्तारलेल्या ७५०० वर्षांच्या संस्कृतीशी जोडले गेले होते. पूर्वेकडे मौर्य साम्राज्याशी जोडली गेलेली आणि इतर संस्कृतींची संवादी अशी संस्कृती होती.
ऑगस्ट १९४७ आणि नंतर ४९ मध्ये झालेल्या मोठ्या स्थलांतरामुळे आधीच समृद्ध असलेल्या देशपटलावर नवे प्रवाह दाखल झाले. दोन्ही हिस्से प्राय: मुस्लिम होते आणि भाषिक वैविध्य त्यात मोठ्या प्रमाणावर होते. सत्तरहून अधिक भाषा आणि डझनावर बोलीभाषा आज देशात कानावर पडतात. वैविध्य, उत्स्फूर्तता आणि गोंधळ असे मिश्रण असलेल्या या देशाच्या उत्क्रांतीचे दोन भाग पडतात. १९४७ ते १९७१ ही पहिली २४ वर्षे आणि १९७२ ते २०२२ ही पुढची पन्नास वर्षे. पहिल्या २४ वर्षांत दोन्ही पाकिस्तानी संस्कृतींच्या मिलाफाचे प्रयत्न झाले. हे करताना प्रदेशांचे, प्रांतांचे सांस्कृतिक वैविध्य नजरेआड केले गेले. आधुनिक देशाचा जन्म झाल्यापासूनच सुरक्षा आणि स्थैर्य याला प्राधान्य द्यावे लागले. त्यासाठी अंतर्गत सलोखा आवश्यक होता, त्यासाठी समानता गरजेची आहे, असा चुकीचा अर्थ लावला जाऊन ‘ब्युरो ऑफ नॅशनल इंटिग्रेशन’सारखे मंच तयार झाले. ज्यांनी एकसारखेपणावर अतिरेकी भर दिला.
जनरल झिया यांच्या अकरा वर्षांच्या इस्लामी राजवटीत लष्कराकडे सूत्रे जाऊन बऱ्याच सामाजिक उलथापालथी झाल्या. पत्रकारांचा, बुद्धिमंत्ताचा, स्पष्टवक्त्या महिलांचा छळ होऊ लागला. माध्यमातून त्यांची हकालपट्टी झाली. पुढे बेनझीर पंतप्रधान झाल्यावर आशेची काही किरणे दिसू लागली. नवाज शरीफ यांच्या काळातही परिस्थिती बरी होती. परवेज मुशर्रफ यांची धोरणे झियांच्या अगदी उलटी, उदारमतवादी, सांस्कृतिक स्वातंत्र्य देणारी होती. सर्व कायदेमंडळात त्यांनी महिलांसाठी राखीव जागा वाढवल्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमात खासगी गुंतवणूक येऊ दिली. २००५ साली कराचीत नॅशनल अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना झाली. सांस्कृतिक विकासात सरकार योगदान देऊ शकते, हे दिसून आले. त्यांच्या नंतरच्या काळात आलेल्या सरकारने काही जुजबी बदल वगळता धोरणात ढवळाढवळ केली नाही.
गेल्या दोन दशकांत पाकिस्तानात मध्यमवर्गाची वाढ झाली आहे. या वर्गात सुखलोलुपता दिसते. या वर्गात नवे ज्ञान, तंत्रज्ञान बदल यांना सन्मुख नसणारा मध्ययुगातील इस्लामसारखा एक प्रवाह आहे. तो बुरख्याचा पुरस्कार करतो. कुटुंबनियोजन त्याला मान्य नाही. दुसरा प्रवाह आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष आहे. जुने सर्व वाईटच आहे, असेही तो म्हणत नाही. माध्यमे, नागरी समाज, लष्कर, खासगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, विद्यापीठे, कायदा अशा बाबतीत आधुनिक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी तो आग्रही आहे. समाजात आळस, ओंगळपणा, धर्मावर खुलेपणाने चर्चा करण्यात भावनिक असमर्थता, बेशिस्त, स्त्रीद्वेष, महिला व बालकांच्या हक्कांची पायमल्ली, बिगर मुसलमानांबाबत असंवेदनशीलता, पर्यावरणाविषयी उदासीनता असे काही दोषही शिरलेले दिसतात. त्याचबरोबर काही सकारात्मक बाजूही आहेत. त्यात असामान्य सहानुभाव, मित्रत्व, आतिथ्यशीलता, लोकशाहीस अनुकूल मनोवृत्ती, नवीन जीवनशैली स्वीकारण्याची तयारी, कितीही अडचणी दिसत असल्या तरी उद्याचा दिवस आजच्यापेक्षा चांगला असेल, यावर विश्वास ठेवणे या काही जमेच्या बाजू होत. पाकिस्तानच्या विशाल इतिहासाचा हा काही अंश झाला. येणाऱ्या काळात ही वैशिष्ट्ये समाजमनात आणखी मुरत जातील आणि सांस्कृतिक परिपक्वता येईल.