- किरण अग्रवाल
आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागला असून त्या संबंधातील आंदोलने वाढू लागली आहेत, मात्र ती होताना परस्परांच्या भूमिकांचा आदर राखून अभिव्यक्ती घडून येते आहे ही खूप मोठी समाधानाची बाब म्हणता यावी.
संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतीक म्हणविणारे सणवार आता एकापाठोपाठ एक येऊ घातले असतानाच राजकीय व सजातीय आंदोलनांमध्ये वृद्धी झाल्याने पश्चिम वऱ्हाडातील वातावरण ढवळून निघाले आहे, पण असे होत असताना यात स्वयंशिस्त व परस्पर सलोख्याचे जे प्रत्यंतर येत आहे त्याने एकूणच आपल्या लोकशाही व्यवस्थेतील अभिव्यक्तिवरील विश्वास बळकट व्हावा.
आगामी काळात निवडणुका येऊ घातल्याने तसेही राजकीय आंदोलनांनी जोर धरला आहेच, त्यात सजातीय आंदोलनांची भर पडून गेली आहे. जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर संपूर्ण राज्यातच निषेध नोंदवला गेला. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातही जागोजागी आंदोलने झालीत, त्यामुळे गेला आठवडा आंदोलनांचा राहिला. अकोला जिल्हा बंद पुकारला गेला यास नागरिकांसह विविध संस्था संघटना व पक्षांनीही पाठिंबा दिल्याचे दिसून आले. सनदशीर मार्गाने केल्या जाणाऱ्या आंदोलनाला व्यवस्थेकडून जेव्हा गालबोट लागते तेव्हा रोष निर्माण होतोच. जालना प्रकरणात तेच झाले, पण सकल मराठा समाजाच्या संस्थांनी हा रोष व्यक्त करताना आजवरच्या आंदोलनात जपला गेलेला शिस्त व संयमाचा जो परिचय आणून दिला तो कौतुकास्पदच ठरला.
अकोला जिल्हा बंद पाठोपाठ बुलढाण्यात सकल मराठा बांधवांकडून मोर्चा काढला गेला. यासाठी जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची कन्या पल्लवी व दोन भगिनीही दाखल झाल्या होत्या. पल्लवीने मोर्चेकऱ्यांसमोर आवेशपूर्ण भाषण केले. जिजाऊंच्या लेकींचा कणखर व संघर्षशील बाणा यातून पहावयास मिळाला. हा मोर्चाही स्वयं शिस्तीत पार पडला. इतकेच नव्हे, मोर्चानंतर मोर्चा मार्ग व परिसराची स्वतः मोर्चेकर्यांनी स्वच्छता करून इतरांसमोर आदर्श ठेवला. अकोल्यातील बंद असो, की बुलढाण्यातील मोर्चा; पोलीस व्यवस्था त्यांच्या कर्तव्याच्या अनुषंगाने हजर असली तरी त्यांच्यावर कसलाही ताण येऊ न देता मोर्चा आयोजकांनीच पुरेपूर काळजी घेत शिस्तिचे दर्शन घडविले.
आरक्षणाचा मुद्दा घेऊनच ओबीसी, माळी महासंघ व समता परिषदेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. खामगावमध्ये ओबीसी महासंघाने ''आमच्या आरक्षणास धक्का लावू नये'' म्हणून मोर्चाही काढला, तर अकोल्यात उपोषण केले गेले. ही सारीच आंदोलने अतिशय शांततेत पार पडलीत. सणावारांच्या व लगेचच येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कसलाही तणाव निर्माण होणार नाही किंवा भीती वाढीस लागणार नाही, अशा पद्धतीने ही आंदोलने पार पडत आहेत हे विशेष. याही पुढे अशी आंदोलने हाती घेताना हीच काळजी घ्यावी लागणार आहे.
अन्यायाबद्दलची चिड व्यक्त करताना व आपल्या मागण्या किंवा अपेक्षा प्रदर्शित करताना इतरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही याची काळजी घेत जी अभिव्यक्ती घडून येत आहे ती आपल्या लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास वाढवणारीच आहे. एरवी समाजाच्या नावाने व बळावर आपले राजकारण रेटणारे काही नेते या आंदोलनापासून बाजूस राहिल्याचे दिसून आल्याने त्याचीही चर्चा झाली, पण अशांना याच लोकशाही व्यवस्थेने उपलब्ध करून दिलेल्या मतयंत्राच्या माध्यमातून जागा दाखवण्याची भूमिका बोलून दाखविली गेली, ती संबंधितांची धडधड वाढविणारीच ठरावी.
सारांशात, आंदोलने वाढली असलीत तरी त्यात शिस्त व संयम कटाक्षाने पाळला जात असल्याचे प्राधान्याने दिसून येत आहे. परस्परांबद्दलच्या भूमिकांचा आदर, सलोख्याची जाण व त्यासाठीचे भान या आंदोलनांच्या आयोजकांकडून बाळगले जात असल्याने त्यासंबंधीच्या समाधानाचा सुस्कारा नक्कीच सोडता यावा.