मोहजालाचा वापर करून स्त्री अथवा पुरुषाकडून हवी ती माहिती काढून घेणे आणि त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करणे हे मानवाच्या ज्ञात इतिहासात ठायी ठायी आहे! डिजिटल जगात तर ते आणखी नित्याचे झाले आहे. ‘हनीट्रॅप’’मध्ये अडकवून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे घडत असतातच. पण, जेव्हा देशाच्या सुरक्षेच्या क्षेत्रात अगदी उच्च पदावर काम करणारी व्यक्ती या जाळ्यात अडकते आणि देशाच्या सुरक्षेशीच छेडछाड केल्याचा संशय व्यक्त होतो, तेव्हा ती बाब अतिशय गंभीर असते. तो सापळा केवळ मोहजालाचा आहे, असेही अशावेळी मानणे चुकीचे ठरते.
डॉ. प्रदीप कुरूलकर हे नाव महिनाभर आधी घेतले असते, तर देशाच्या मानाच्या अशा संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) प्रख्यात शास्त्रज्ञ, देशाच्या आत्मनिर्भर वाटचालीमध्ये मोलाचे योगदान असा मोठा ‘बायोडेटा’ समोर येत होता. मात्र, हनीट्रॅपचा आरोप झाल्यानंतर त्यांचे हेच प्रख्यातपण धोक्याचे वाटू लागले. निवृत्तीला सहा महिने बाकी असताना उच्च स्तरावरील शास्त्रज्ञाचे देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरतील, असे ‘खेळ’ दहशतवादविरोधी पथकासमोर आले, तेव्हा सर्वांचीच भंबेरी उडाली. देशभक्तीपर व्याख्याने ठोकणाऱ्या आणि अत्यंत सुसंस्कृत अशी प्रतिमा असलेल्या या शास्त्रज्ञाने देशाची झोप उडवली. कारण, या शास्त्रज्ञाचा वावर अतिशय संवेदनशील अशा ठिकाणी होता. त्यामुळेच, कुरूलकर सापडले, पण पुढ्यात नक्की काय वाढून ठेवले आहे, याचा अद्यापही अंदाज येत नाही. ‘डीआरडीओ’च्या दिघी येथील संशोधन आणि विकास विभागाचे ते प्रमुख होते. क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची प्रणाली, लष्करी अभियांत्रिकी साहित्य, अत्याधुनिक असे रोबोटिक्स तंत्रज्ञान, लष्करी वापरासाठी मानवरहित तंत्रज्ञान या विषयांवर त्यांची हुकुमत होती. मात्र, ‘डीआरडीओ’च्या देखरेख विभागाला गेल्या काही दिवसांत संशय आला आणि तातडीने पावले उचलली गेली. ‘हनीट्रॅप’चा संशय व्यक्त करण्यात आला.
एटीएसला नंतर या प्रकरणात तथ्य आढळले. इतक्या मोठ्या पदांवर आणि संशोधन प्रणालीमध्ये सक्रिय शास्त्रज्ञाने नेमकी कुठली माहिती शत्रूदेशाला पुरविली, याचा आता तपास सुरू आहे. जी माहिती समोर येत आहे, त्यावरून हे जाळे मोठे असल्याचा संशय आहे. बंगळुरू, नाशिकपर्यंत याचे धागेदोरे पोहोचले आहेत. ‘हनीट्रॅप’ आणि हेरगिरीच्या एकूणच प्रकरणामुळे सुरक्षा क्षेत्र हादरून गेले आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करणाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकू नये, याचे प्रशिक्षण दिलेले असते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आत्मचरित्रामध्ये परदेशामध्ये दूतावासात गेल्यानंतर तेथे कशा पद्धतीने ललना तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, तुमचा संपूर्ण अभ्यास करून, प्रसंगी तुमच्या स्थानिक भाषेत संवाद साधून कसे आपलेसे केले जाते, याचा उल्लेख आहे. अशा मोहजालामध्ये कधीही न अडकण्याचा सल्ला ते देतात. आता सोशल मीडियाच्या काळात आणि सारे जग एका क्लिकवर उपलब्ध झाल्यानंतर हा धोका आणखी वाढला आहे.
युद्धपद्धतीमध्येही दिवसेंदिवस बदल होत असून, स्पर्शरहित युद्धाचे मोठे आव्हान आहे. त्याचा उल्लेख संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यामध्ये ‘डीआयएटी’च्या दीक्षांत सोहळ्यात केला. युद्ध आता पारंपरिक राहिलेले नाही. त्याचे आयाम बदलले आहेत. ड्रोन, रोबोटिक्सचा वापर वाढत आहे. अपारंपरिक आणि हायब्रिड युद्धपद्धतीही समोर येत आहेत. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानात कुरुलकरांचा हातखंडा होता. क्षेपणास्त्र प्रक्षेपणामध्ये त्यांचे योगदान होते. संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या एटीएसच्या तपासात नंतर आणखी मोठी माहिती समोर आली.
डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासह बंगळुरूमध्ये कार्यरत भारतीय हवाई दलाचा एक अधिकारीदेखील पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे समोर आले. निखील शेंडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. याचा अर्थ हे एक मोठे ‘रॅकेट’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेजारच्या पाकिस्तानात सध्या अराजक आहे. भारताला कोंडीत पकडण्याची संधी चीन सोडत नाही. अशावेळी कुरूलकर अन्य देशांच्या संपर्कात होते आणि तिथून त्यांच्या अकाउंटवर पैसेही येत होते, हे लक्षात घेतले म्हणजे नक्की कोणते कारस्थान शिजत होते, असा प्रश्न पडतो. कुरूलकर गजाआड गेले तरी, जी गोपनीय माहिती बाहेर गेली, ती परत येणार नाही. त्यासाठी व्यूहरचनाच बदलाव्या लागणार आहेत. पहारेकरीच दरोडा घालत असतील, तर अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचाही फेरआढावा घ्यावा लागणार आहे.