- किरण अग्रवाल
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची ओरड तर वाढते आहेच, शिवाय घराघरात भरून असलेला कापूस व शेतावरील सोयाबीन, तुरीचे कुटार पाहता आगीच्या घटना कशा टाळता येतील यासाठी यंत्रणांसह ग्रामस्थांनाही अलर्ट राहावे लागेल. हे बघतांना माणुसकीच्या नात्याने मुक्या जीवांची काळजीही घ्यावी लागेल.
उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य असेल याची जाणीव व्हावी; पण ती जाणीव सरकारी यंत्रणांना मात्र झालेली दिसत नाही हे दुर्दैव. उन्हाळ्याकडे फक्त पाणीटंचाईच्या दृष्टिकोनातूनच पाहून चालणारे नसते, तर एकूणच आरोग्य व ठिकठिकाणी लागणाऱ्या आगीच्या घटना पाहता ''अलर्ट'' मोडवर राहून काम करणे अपेक्षित असते, परंतु ते होताना दिसत नाही.
मागे याच स्तंभात उन्हाळ्याच्या अनुषंगाने जाणवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची चर्चा करण्यात आली होती. उन्हाळा सुरूही झाला, पण टंचाई निवारण आराखड्याचे कागदपत्र काही हाले ना, अशी यासंदर्भातली स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाने यासंदर्भात संवेदनशील राहत उपाययोजना करायला हव्यात. महत्त्वाचे म्हणजे पाणीटंचाईकडे लक्ष वेधून झाले आहेच, आता त्या व्यतिरिक्तच्या इतर बाबींकडेही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. विशेषता उन्हाच्या तीव्रतेने अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यासाठी अग्निशमन यंत्रणेपासून सर्वच संबंधितांनी जागरूक असणे गरजेचे बनले आहे.
आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यात जंगल क्षेत्र मोठे आहे. दोन दिवसांपूर्वीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या संग्रामपूर तालुक्याच्या अंबाबारवा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वणवा पेटला, यात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. दर उन्हाळ्यात या आगी लागत असतात. मागच्या वर्षीही याच परिसरात म्हणजे सोनबर्डी वर्तुळातील करमाळा परिसरात मोठी आग लागून सुमारे 47 हेक्टर क्षेत्रफळावरील वनसंपदा नष्ट झाली होती. बरे, सोनबर्डी वर्तुळातच वारंवार आगी का लागतात हे देखील तपासायला हवे पण तितक्या गांभीर्याने विचारच कोणी करीत नाही. शिवाय फक्त आग व वनसंपदेचे नुकसान एवढ्या मर्यादित भूमिकेतून याकडे पाहता येऊ नये. या जंगलावर अवलंबून असणारे वन्य घटक, पशुपक्षी व त्यांचा अधिवास या अशा घटनांमुळे धोक्यात येतो व उघड्यावर पडतो ही बाब यात अधिक महत्वाची आहे.
जंगलांचेच काय, ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये शेतातून काढला गेलेला कापूस भरून पडलेला आहे. आता चांगला भाव मिळेल, थोडा वेळ थांबू असा विचार करत करत दिवस उलटत आहेत, पण भाव नसल्याने कापूस अनेकांच्या घरात पडून आहे. अनेकांच्या शेतात, खळ्यावर सोयाबीन, तुरीचे कुटार पडलेले आहे. उन्हाचा चटका इतका तीव्र आहे की जराशी ठिणगी अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकते. दोनच दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्याच्या पारस परिसरात मनारखेड येथे एका पडीक शेताला आग लागून तेथील सोयाबीन व तुरीच्या कुटाराची गंजी खाक झाली. अशा घटना घडल्यावर अग्निशामक यंत्रणा धावून जातात व आग आटोक्यात आणतात, पण यात बळीराजाचे जे नुकसान होते ते भरून निघत नाही.
उन्हाळा हा घशाला कोरड पाडणारा असतो, तसा माणुसकीची परीक्षा पाहणाराही असतो. आपण मनुष्याच्या तृष्णेची चिंता अधिक वाहतो, परंतु मुक्या जीवांचे काय? यातही पाळीव प्राण्यांची काळजी बळीराजाकडून घेतली जाते, पण अन्य पशु पक्षांचे काय? पाण्याअभावी कासावीस होऊन जीव सोडून देण्याखेरीस त्यांच्याकडे पर्याय नसतो. आपण ''वसुधैव कुटुम्बकम''ची संस्कृती व संस्कार जपणारे आहोत. तेव्हा आणखी उन्हाळा तीव्र होण्याची वाट न पाहता आतापासूनच जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व चार दाण्यांची व्यवस्था करायला हवी. अकोल्यामध्ये भल्या पहाटे रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना बिस्किट, टोस्ट खाऊ घालण्याची मानवीयता मोठ्या प्रमाणात दिसून येते. तिला अधिक विस्तृत करीत उन्हाळ्यात मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल. घरातील लहान लेकरांना आपण ही जबाबदारी दिली तर त्यांच्यावर भूतदयेचा संस्कारही होईल व ते आवडीने हे काम करतीलही.
सारांशात, उन्हाची दाहकता लक्षात घेता सरकारी यंत्रणांनी गतिमान होत आवश्यक ती टंचाई निवारणाची कामे केली व सामान्य जणांनीही माणुसकीच्या नात्याने पशुपक्ष्यांसाठी घराच्या अंगणात किंवा टेरेसवर पाण्याची व्यवस्था केली तर या दाहकतेची तीव्रता काहीशी कमी करता येणे नक्कीच शक्य आहे. चला त्यासाठी सारे मिळून प्रयत्न करूया...