प्रा. डॉ. एस. आर. यादव, ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ -‘कंदील पुष्प’ वनस्पतीची नवीन प्रजात युवा संशोधकांनी शोधून काढली आहे... कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे विद्यार्थी अक्षय जंगम, रतन मोरे आणि डॉ. नीलेश पवार गेली सहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांवरील वनस्पतींचा अभ्यास करीत आहेत, त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये विशाळगडावर ‘कंदील पुष्प’ वर्गातील ही वेगळी वनस्पती आढळली. ‘सेरोपेजिया शिवरायीना’ असे तिचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. या वनस्पतीचे वैशिष्ट्य काय?- कंदील पुष्प ही सेरोपेजिया गटातील रुईच्या कुळातील वेलवर्गीय वनस्पती आहे. या प्रकारच्या अनेक वेली, छोट्या वनस्पती सह्याद्रीतल्या डोंगरदऱ्यांत फक्त पावसाळ्यात वाढतात. स्थानिक याला खरतुडी हमण, खरचुडी, खरपुडी या नावांनीही ओळखतात. या वनस्पती दुर्मीळ आहेत. कंदील पुष्प वनस्पतीच्या वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या रंगांची सुंदर फुले येतात. यातल्या काही जाती सुगंधीही आहेत. या वनस्पतीला चीक असतो आणि त्यांचे परागीभवन छोट्या कीटकांमार्फत होते. पावसाळ्यानंतर या वनस्पती मरून जातात अन् त्यांचा कंद फक्त जमिनीत शिल्लक राहतो. या कंदापासून पुढच्या वर्षी पुन्हा वनस्पती वाढते. सह्याद्रीच्या सर्वच डोंगरउतारांवर ही वेलवर्गीय वनस्पती आढळते. या वनस्पतीला असे अनोखे नाव कसे पडले?- कंदील पुष्पची पाने परस्परविरोधी असतात. फुले हनुमानाच्या गदेसारखी असतात, त्यांना जमिनीत एक कंद असतो. त्यामुळे त्यांना ‘हनुमान बटाटा’ असेही म्हणतात. फुले कंदिलासारखी असल्याने त्यांना ‘कंदील पुष्प’ असेही म्हणतात. फुलाच्या तळाला फुगीर, लंबगोल, त्यावर अरुंद उंच नळीचे धुराडे असते. त्याच्यावर उष्ण हवा बाहेर जाण्यासाठी खिडक्या आणि हवेत वर नक्षीदार कळस किंवा घुमट अशी या फुलांची रचना असते. ही प्रजात एक फुटापर्यंत वाढते. फुलासह ही वनस्पती संपूर्ण हरितवर्णीय असते. या वनस्पतीचे वैशिष्ट्य काय?- जगात ‘कंदील पुष्प’च्या २४४ प्रजाती आहेत, तर देशात ५३ प्रजाती आहेत. त्यातील सर्वाधिक कंदील पुष्पच्या २५ प्रजाती एकट्या महाराष्ट्रात सापडतात. त्यात आता या एकाची भर पडली आहे. याच्या १८ प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. जगात सेरोपेजियाच्या सर्वाधिक प्रजाती आफ्रिकेत आहेत. मादागास्कर, भारत, चीन, कॅरेबियन प्रदेशात ही वनस्पती आढळते; परंतु जगात प्रदेशनिष्ठतेसाठी महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. २०० वर्षांपूर्वी भारतातच या वनस्पतीचा सर्वप्रथम शोध लागला. पोटदुखीवर औषधी असल्याने गुराखी किंवा स्थानिक लोक याचे कंद काढून खातात, तसेच जनावरेही ते खातात. कंदील पुष्प समूहाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यांचे जतन, संवर्धन करून त्या पुन्हा ‘प्रकाशमान’ करण्याची गरज आहे. यातल्या बहुतेक जाती दुर्मीळ होत आहेत, तर काहींचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.शिवाजी विद्यापीठ आणि पुण्याच्या आगरकर संशोधन केंद्राने २००८ ते २०१२ या कालावधीत डीबीटी अर्थसाहाय्यातून ‘कंदील पुष्प’च्या २० प्रजातींचे प्रयोगशाळेत ऊती संवर्धन करून त्याचे नैसर्गिक अधिवासात जतन करण्याचा उपक्रम केला आहे. शब्दांकन : संदीप आडनाईक, कोल्हापूर
नष्ट होण्याच्या मार्गावरील ‘कंदील पुष्प’ पुन्हा प्रकाशमान व्हावे...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:52 AM