ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स आता राजे झाले आहेत. यामुळे अनेक संदर्भ बदलतील. प्रिन्स चार्ल्स यांच्यावर आता नव्या जबाबदाऱ्या येतील. प्रिन्स चार्ल्स हे राजे झाल्याचा संदेश आता सगळ्या जगापर्यंत गेला आहे; पण एवढंच नाही. बकिंगहॅम पॅलेसमध्ये असलेल्या लाखो मधमाश्यांचा मालकही आता बदलला आहे. अगोदर त्यांच्या मालकीणबाई महाराणी एलिझाबेथ होत्या, आता प्रिन्स चार्ल्स त्यांचा राजा बनला आहे; पण ही बाब त्यांना कोण सांगणार की त्यांचा राजा आता बदलला आहे? आणि त्यांना जर हे सांगितलं नाही तर त्यांना कळणार तरी कसं की आपला मालक आता बदलला आहे?
ब्रिटनमध्ये अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे की शाही राजघराण्यात काही बदल झाला, राजघराण्यात कोणाचं लग्न झालं, कोणाचं निधन झालं, कोणाचा जन्म झाला, राजा बदलला, राजघराण्यात लग्न होऊन कोणी नवीन सदस्य आला, तर त्याची माहिती या मधमाश्यांनाही सांगावी लागते. राजघराण्यात मधमाश्या पाळण्याची परंपरा फार पुरातन आहे. सध्याच्या घडीला राजघराण्यात दहा लाख मधमाश्या पाळण्यात आल्या आहेत. त्यांची अनेक पोळी बकिंगहॅम पॅलेस आणि क्लॅरेन्स हाऊस येथे आहेत.
ब्रिटनमध्ये असं मानण्यात येतं की राजघराण्यात घडलेली कोणतीही नवी आणि महत्त्वाची गोष्ट येथील मधमाश्यांनाही सांगावी लागते, नाही तर या मधमाश्या रागावतात. आपल्याला महत्त्व दिलं नाही म्हणून त्या चिडतात. असं झाल्यास काही वेळा आपलं पोळं सोडून त्या निघून जातात, काही वेळा मध तयार करणंच बंद करतात, तर काही वेळा या अपमानाचं दु:ख असह्य होऊन त्या प्राणत्याग करतात. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स आता त्यांचे मालक, राजे बनले आहेत. त्यामुळे या लाखो मधमाश्यांपर्यंत हा संदेश देण्यात आला की, तुमचा राजा आता बदलला आहे. पण तो महाराणी एलिझाबेथ यांच्याइतकाच दयाळू आणि प्रेमळ आहे. तो आता तुमची काळजी घेईल! तुमचं पालन, संगोपन करील. त्यामुळे तुम्हीही आता तुमच्या नव्या राजाशी चांगले संबंध ठेवा आणि मध बनवणं सोडू नका. राजघराण्याशी एकनिष्ठ राहा आणि तुम्हीही आपली परंपरा पाळा.
शाही राजघराण्यात पाळली जाणारी ही परंपरा आताही इमानेइतबारे पाळली गेली. त्यासाठी या मधमाश्यांचे पालक (रॉयल बी कीपर) ७९ वर्षीय जॉन चॅपल आणि त्यांची पत्नी कॅथ यांच्यावर यावेळी ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी राजघराण्यात असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यांना काळी रिबिन बांधली आणि पोळ्यांच्या प्रत्येक बॉक्सजवळ जाऊन त्यांच्या कानात सांगितलं, मधमाश्यांनो, तुमचा राजा आता बदलला आहे. त्याच्या प्रजेप्रमाणे तुमचीही तो अगदी मनापासून काळजी घेईल. तुमच्यावर प्रेम करील. जॉन चॅपेल हे गेल्या तीस वर्षांपासून राजघराण्यात मधमाश्यांचं पालन करताहेत. त्यांची काळजी घेताहेत. सगळ्या मधमाश्यांशी त्यांची चांगली दोस्ती आहे. त्यांनी सांगितलं, राजघराण्यातील मुख्य माळ्याचा काही दिवसांपूर्वीच मला मेल आला होता आणि मला तातडीनं तिथं बोलवून घेण्यात आलं. रिवाजाप्रमाणे सगळ्या मधमाश्यांच्या कानात मी ही नवी बातमी सांगितली आहे. योग्य वेळी त्यांना संदेश पोहोचल्यामुळे त्या आता नाराज होणार नाहीत आणि मध तयार करणंही सोडणार नाहीत. राजघराण्याचीही त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. अर्थात राजघराणंही परंपरेप्रमाणे त्यांची काळजी घेईलच आणि त्यांच्या देखभालीत कोणतीही कसूर ठेवणार नाही.
असं म्हटलं जातं की, ज्या ज्यावेळी अनवधानानं कुठली महत्त्वाची घडामोड या मधमाश्यांना सांगितली गेली नाही, सांगायची राहून गेली किंवा त्यांना पुरेसं महत्त्व दिलं गेलं नाही, त्या त्यावेळी या मधमाश्यांनी आपली नाराजी प्रकट केली आहे आणि मूक आक्रोश करीत आपल्या पद्धतीनं त्यांनी राजघराण्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचवला आहे. असं घडू नये म्हणून राजघराण्यातर्फेी प्रत्येकवेळी कटाक्षानं काळजी घेतली जाते.
संपूर्ण युरोपातच परंपरेचं पालन!संपूर्ण युरोपात अनेक शतकांपासून ही परंपरा पाळण्यात येते. आयर्लंड, वेल्स, जर्मनी, नेदरलॅण्डस्, फ्रान्स, स्वीत्झर्लंड, बोहेमिया याशिवाय अमेरिका आणि इतरही काही देशांत ही प्रथा पाळली जात होती. आजही या प्रथेचं तिथे पालन केलं जातं, पण इंग्लंडमध्ये ही परंपरा जास्त लोकप्रिय आहे. जनताही या प्रथांचा आदर आणि सन्मान करते.