हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली -
भाजपच्या नव्या अध्यक्षांबाबत पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मतैक्य झाल्याचे दिसते. १५ महिने रखडलेला हा प्रश्न त्यामुळे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. जयप्रकाश नड्डा यांच्या जागी येणाऱ्या नव्या अध्यक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर काम करावे लागेल. पितृसंस्था असलेल्या संघामधून ही व्यक्ती आलेली असेल. संघपरिवारातून मिळालेल्या माहितीनुसार २० एप्रिलपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड होईल, असे स्पष्ट होते. जयप्रकाश नड्डा यांची मुदत गेल्या जानेवारीत संपल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असल्यामुळे पक्ष घटनेशी तडजोड करून पक्षाच्या संसदीय मंडळाने आणीबाणीची परिस्थिती म्हणून पक्षाध्यक्षांची मुदत वाढवून दिली.
नागपूरस्थित संघ मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्चअखेरीस भेट देण्याची शक्यता असून कटकटीचे ठरलेले अनेक मुद्दे त्यावेळी सोडवले जातील असे मानले जाते. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट टाळली होती; त्यामुळे अशी भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपाची पितृसंस्था असून मोदी कट्टर स्वयंसेवक आहेत. आपल्या जीवनावर संघाचा खोलवर प्रभाव पडलेला आहे, असे मोदी वारंवार सांगत असतात. संघाला पाठिंबा देण्याचा, सौहार्द राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल, अशी चिन्हे आहेत. खट्टर अविवाहित असून त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलेले आहे. तसेच मोदींशी त्यांची जवळीक आहे. दक्षिण भारतातून आलेले केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचेही नाव अजून पूर्णपणे मागे पडलेले नाही असे अंतर्गत सूत्रे सांगतात. तरीही खट्टर यांच्या नावावर मतैक्य होत आहे असे दिसते.
‘आप’ला जीवदान मिळेल?कांशीराम यांना मायावती या त्यांच्या उत्तराधिकारी एका झोपडपट्टीत सापडल्या होत्या. अरविंद केजरीवाल यांचा प्रवासही बाह्य दिल्लीतील सुंदरनगर या झोपडवस्तीतून सुरू झालेला असून सनदी अधिकारी ते भ्रष्टाचार निर्मूलन कार्यकर्ता अशी वाटचाल त्यांनी 'परिवर्तन' या त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून केली. मात्र, गेल्या दोन दशकात केजरीवाल दिल्लीतल्या शीशमहलापर्यंत पोहोचले आणि कालांतराने रस्त्यावरही आले. जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविण्याऐवजी स्वतःच परिवर्तित झालेला माणूस म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. परिणामी आम आदमी पक्षाचा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. या देशाचे राजकारण कधी तरी बदलेल, अशी आशा करणाऱ्या लोकांचा तो मोठा अपेक्षाभंग होता. भारत भ्रष्टाचारमुक्त होईल या स्वप्नाचा अंत झाल्याने 'आप'च्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उमटले. २०२० साली 'आप'चा वारू रोखता येणार नाही असे वाटत होते. पुढे अकालींना निष्प्रभ करीत या पक्षाने काँग्रेसकडून पंजाब हिसकावून घेतले. मात्र, तितक्याच वेगाने त्याची प्रभा लोप पावली, आणि पतन पाहावे लागले. काय चुकले याचा अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी केजरीवाल विजनवासात गेले असले जरी आपली आरामशीर जीवनशैली सोडायला मात्र ते अद्याप तयार नाहीत. अजूनही गाड्यांच्या ताफ्यात राहूनच ते प्रवास करतात. साध्या घरात राहण्यास ते आजही इच्छुक नाहीत.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवले जाईल, अशी जोरदार बोलवा राजधानी दिल्लीत पसरली आहे. केजरीवाल यांचे राज्यसभेवर जाण्याची मनसुबे उधळले गेल्याने आता सिसोदिया यांचे नाव पुढे आले आहे.
राहुल यांनी तेजस्वींना डिवचलेराहुल गांधी यांनी काँग्रेसचा बिहारमधील मित्र राष्ट्रीय जनता दलाला डिवचले आहे. पक्षाचे तरुण नेतृत्व असलेल्या कन्हैयाकुमार यांना त्यांनी पुढे आणण्याचे ठरवले असावे. कन्हैयाकुमार काँग्रेसतर्फे ‘पलायन रोको, नोकरी दो’ पदयात्रा काढत आहेत. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातून ही पदयात्रा निघेल. कन्हैया जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष असून त्यांच्यासारखा तरुण नेता समोर उभा ठाकल्याने तेजस्वी यादव डिवचले जाणे स्वाभाविक होते.
राहुल गांधी यांनी यात्रेची मोहीम कन्हैया यांच्या हाती सोपविल्याने अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेतेही नाराज आहेत. काँग्रेस महासमितीचे बिहारमधील प्रमुख कृष्णा अल्लावरू, प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंग आणि इतरांना त्यांनी कन्हैया यांच्या पदयात्रेत सामील व्हायला सांगितले आहे. अपक्ष खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना पक्षात ओढण्याचे प्रयत्न काँग्रेसने चालविल्याने राजद अस्वस्थ आहे. पप्पू यादव काँग्रेसमध्ये गेलेले राजदला नको आहे. अर्थात पप्पू यादव यांची पत्नी रंजीता यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले आहे. राजदच्या बालेकिल्ल्याला पप्पू यादव धोका उत्पन्न करू शकतात. बहुरंगी लढतीत पप्पू यांनी संयुक्त जनता दल तसेच राजद व इतरांचा पराभव केलेला आहे. काँग्रेसने त्यांच्याविरूद्ध उमेदवार उभा केला नव्हता.