- डॉ. एस. एस. मंठा(माजी अध्यक्ष, भारतीय तंत्रशिक्षण परिषद)
संगणक विज्ञान सतत उत्क्रांत होत असते. डिजिटल ट्विन हे त्याचे नवे अपत्य. जरा गंमतशीर वाटते ना ! हे जुळे काय करते? प्रत्यक्ष वस्तू, प्रणाली किंवा प्रक्रियेचे प्रतिनिधित्व किंवा आभासी प्रतिकृती म्हणजे हे जुळे. ज्याच्या मदतीने वास्तव जगातील वस्तू, प्रणाली किंवा प्रक्रियेचे डिजिटल प्रारूप तयार केले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, मेटाव्हर्स आणि आभासी तसेच विस्तारित वास्तव यांचा मेळ त्यात घातला जातो. वास्तव जगातील वस्तू, प्रणाली किंवा प्रक्रिया यांचे डिजिटल रूप त्यातून तयार केले जाते. इमारती, उत्पादन प्रकल्प, शहरे किंवा कशाचीही आभासी प्रतिकृती ती असू शकते.
डिजिटल ट्विनविषयी आणखी काही सांगू शकेल अशी रोचक कहाणी एका आभासी सहायकाच्या संबंधातून समोर आली. पाचेक वर्षांपूर्वी कृत्रिम बुद्धिमतेच्या मदतीने चालणारा ‘टाय’ नावाचा चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने ट्विटरवर आणला. वापरकर्त्याशी संवाद साधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे प्रतिसादात सुधारणा करण्याचा हेतू त्यामागे होता. परंतु या प्रयोगाने अनपेक्षित वळण घेतले. ट्रोलर्स आणि वापरकर्त्यांनी मुद्दाम काही अनुचित तसेच आक्षेपार्ह प्रश्न विचारले. स्वाभाविकच आक्रमक स्वरूपाचे वादग्रस्त ट्वीट्स धडाधड प्रकटू लागले. थोड्याच काळात सारे नियंत्रणाबाहेर गेले. जातीवादी, लैंगिक, प्रक्षोभक निवेदने त्यावर प्रकटू लागली. अखेर मायक्रोसॉफ्टला २४ तासांच्या आत हे चॅटबॉट मागे घ्यावे लागले. यातून आपल्याला कोणता धडा घेता येईल? कृत्रिम माहितीच्या आधारे आभासी मदत घेण्यामध्ये कोणते धोके आहेत? ते आपण ओळखायला शिकले पाहिजे.
जर डिजिटल ट्विन हा प्रत्यक्ष वस्तू किंवा प्रणालीची आभासी प्रतिकृती असेल तर आपल्याला आपली प्रतिकृती तयार करता येईल काय? परमेश्वराने जर मूळ प्रत निर्माण केली असेल तर आपल्याला अनुकृती का करता येऊ नये, यावर सध्या काम चालू आहे. माणसाचे डिजिटल ट्विन तयार करण्यासाठी वैद्यकीय, आनुवंशिक माहिती तसेच रक्तदाब, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन अशी काही माहिती आवश्यक आहे. एकात्म आणि संघटित स्वरूपात ही माहिती त्या प्रारूपात संक्रमित केली जाईल. मानवी शरीराच्या जागी गणिती समीकरणे, अल्गोरिदम्स किंवा यंत्राचे अध्ययन करणारी तंत्रे वापरून असे प्रतिरूप तयार करणे ही पुढची पायरी असेल.
मानवी अवयवांसारखे अवयव किंवा मानसिक प्रतिरूपे डिजिटल स्वरुपात तयार केल्याची उदाहरणे आहेत. तसे माणसाचे हुबेहूब रूप तयार करणे एक आव्हानच आहे. भिन्न भिन्न स्त्रोतांकडून प्रचंड प्रमाणावर मिळविलेल्या माहितीचे एकात्मीकरण त्यासाठी आवश्यक आहे.आरोग्य क्षेत्रात माणसासाठी डिजिटल ट्विन खूपच फायदेशीर आहे. व्यक्तिगत औषधयोजना, आजारांचा धोका ओळखणे, सर्वोत्तम उपचार योजना तयार करणे, औषधयोजना किंवा इतर उपायांचे परिणाम समजून घेणे, आजार रोखणे, लवकर निदान, प्रकृतीवर लक्ष ठेवणे, स्वास्थ्य व्यवस्थापन, भविष्यात्मक विश्लेषण, स्वयंआरोग्य काळजी, आभासी क्लिनिकल चाचण्या, वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण, दूरस्थ आरोग्य काळजी आणि टेलीमेडिसिन, औषधाचे परिणाम समजून घेणे, शस्त्रक्रियेची प्रक्रिया किंवा आजाराची वाढ हे सगळे व्यक्तिगत उपचाराच्या योजनेत शक्य होणार आहे.
माणसाच्या विशिष्ट पैलूंचे वर्तन कसे होते हे माहितीचलित अल्गोरिदम्स आणि संगणकीय प्रतिरूपाच्या मदतीने ओळखले जाईल. विशिष्ट मानवी मेंदूचे प्रतिरूप हे युरोपिअन युनिअनने निधी पुरविलेल्या ‘न्यूरोट्विन’ प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. अपस्मार किंवा अल्जायमरसारख्या आजारावर कोणते उपचार अधिक चांगले ठरतील हे या प्रकल्पाच्या यशामुळे सांगता येईल. करमणुकीच्या क्षेत्रात दृश्य परिणामांच्या बाबतीत तसेच ॲनिमेशनमध्ये डिजिटल ट्विनचा पुष्कळ उपयोग होणार आहे.
माणसाचे मानसशास्त्र जात्याच गतिशील असून, मानवी मन अत्यंत गुंतागुंतीचे आहे. माणसाचे जसेच्या तसे जुळे तयार करणे इतक्यात शक्य होणार नाही हे खरेच. खासगीपणा, माहितीचे स्वामित्व आणि सहमती अशासारख्या प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. अर्थात डिजिटल ट्विन तयार करण्यामागे आभासी जगातले कोणतेही उपकरण निर्माण करणे, त्याची चाचणी घेणे हा हेतू आहे. जोवर हे जुळे आपल्या गरजेनुसार काम करते आहे हे लक्षात येणार नाही तोवर आपण त्याचे उत्पादन करणार काय?