- डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
नेदरलँड हा देश धर्मनिरपेक्ष, नास्तिक होत चालला असल्याची बातमी नुकतीच वाचली. चर्च, मशिदींमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी होते आहे. ‘मिनिंग ऑफ लाइफ’पेक्षा ‘मिनिंग इन लाइफ’ शोधण्यावर जास्त भर आहे. अर्थात नेदरलँडच्या जुन्या पिढीला चिंता आहेच. धर्मापासून दूर जाणाऱ्या नव्या पिढीच्या भावनिक, सांस्कृतिक जडणघडणीविषयी काय करायचे? आयुष्याचा अर्थ शोधण्याऐवजी जीवनातल्याच अर्थाला महत्त्व देणारी पिढी कुटुंब व्यवस्थेला मानेल का? समाजात सहृदयता, करुणा, एकमेकांविषयी लळा, जिव्हाळा राहील काय? हे प्रश्न देखील इथल्या विचारवंतांना सतावताहेत.
धर्माच्या आहारी न जाणाऱ्या या देशात समाजवादाची मुळं मात्र खोलवर विस्तारली आहेत. गरीब अन् श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न सहज जाणवतात. कालच इथले घर संपूर्ण स्वच्छ करायला बाई आली होती. चौकशी करता ती मंगोलियन असल्याचे समजले. ती अन् तिचा नवरा तीन वर्षांपूर्वी इकडे आले. छोट्या दोन मुलांना आजी-आजोबांजवळ ठेवून! कोरोनामुळे गेली दोन वर्षे मुलांची भेट नाही! त्यांना या कामाचे तासाला १५ युरो मिळतात. मी महिन्याचा हिशोब केला, तेव्हा हे दोघे पती-पत्नी मिळून सहा हजार युरो महिना कमावतात. इथे इंजिनिअर किंवा लेक्चररचा सुरुवातीचा पगार यापेक्षा कमी असतो! इथे पगार तुमची योग्यता, तुमचे स्किल, तुमचा अनुभव यावर अवलंबून असतो. त्यामुळे ऑफिसमधील २० वर्षांचा अनुभव असलेली सेक्रेटरी अन् तिचा डॉक्टरेट झालेला तरुण बॉस यांचा पगार सारखा असू शकतो! त्यामुळे इथे आर्थिक वर्ग भेद, गरिबीतला असंतोष जाणवत नाही.
खासगीकरण कमीच. सारे नियंत्रण, नियम, कायदे सरकारचे... अन् सरकार समाजवादी... घर बांधायचे तर नियम पाळून... त्यामुळे इथे गगनचुंबी इमारती दिसत नाहीत. नेदरलँड हा समुद्र पातळीपासून खूप खालच्या स्तरावरचा देश. वादळ वारे, पूर या नैसर्गिक संकटांचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. त्यासाठी आता पाण्यावर तरंगणारी घरे बांधली जाताहेत.
याचा अर्थ सर्व काही आलबेल आहे, असेही नाही. ड्रग विक्रीवर प्रमाणात सूट आहे. पण म्हणून कुठेही बेवडे दिसत नाहीत, हे विशेष. तरुण पिढी बऱ्याच प्रमाणात स्वतंत्र आहे. पालकांवर अवलंबून न राहता वयात आलेली मुले कमाईला लागतात. आमच्या १३ वर्षांच्या नातीला आताच स्वतंत्र कमाईचे वेध लागले आहेत.
आमच्या सुनेचे एक निरीक्षण मला भावले. ती म्हणाली, ‘इथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे. आपापल्या विश्वात मग्न आहे. आपल्याकडे हाताला काम नाही म्हणून मुले मोर्चा, आंदोलने यात दिसतात. त्यांना कामात गुंतवले, स्वप्नपूर्तीसाठी व्यस्त ठेवले तर तेही कार्यक्षम होतील.’
इथली करप्रणाली वैशिष्ट्यपूर्ण आहे. ४० टक्क्यांच्या वर कर कापला जातो. पण सर्वांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. तुमच्या नोकरीवर गदा आली तरी सरकारकडून बेकार भत्ता मिळतो, तो निर्वाहासाठी पुरेसा असतो. वृद्धांना विशेष सुविधा आहेत. त्यांना एकटेपण जाणवणार नाही, याची काळजी नातेवाईक घेतात. सरकारही मदत करतं. आई-वडिलांचे वडिलोपार्जित घर, इस्टेट मुलांना फुकट मिळत नाही. ती त्यांना पालकांना पैसे देऊन विकत घ्यावी लागते! त्यामुळे वृद्ध पालक मुलांवर अवलंबून नसतात.
विवाह नियमात बरेच स्वातंत्र्य आहे. माझ्या नातीच्या एका मैत्रिणीला दोन्ही आयाच आहेत! वडील नाहीत! दोन स्त्रिया, दोन पुरुष एकत्र राहू शकतात. या देशातल्या वास्तव्याने मला एक नवे जग दाखवले आहे, हे नक्की!vijaympande@yahoo.com