शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

AI चा जन्मदाता म्हणतो, हा राक्षस माणसांना खाईल!

By shrimant mane | Published: May 06, 2023 6:21 AM

ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानले जाते, त्या डॉ. जेफ्री हिंटन यांना आता पश्चात्ताप झाला आहे. ते म्हणतात, एआयचे धोके भयंकर असतील!

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

माणूस मशीन बनला. मशीनला मानवी मेंदू दिला गेला. त्यामुळे खासगी आयुष्य संपले. मेंदू, स्मरणशक्तीचा वापर कमी झाला. सारे जगणे यांत्रिक बनले, आयुष्यातील शांततेचे क्षण संपले, असे मानणाऱ्या मंडळींच्या शिळोप्याच्या गप्पांमध्ये कालपरवापासून डॉ. जेफ्री हिंटन यांचे नाव येऊ लागले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्मदाता, अशी त्यांची ओळख आहे.

चॅटजीपीटी, बिंग किंवा बार्ड या प्लॅटफॉर्ममागे हिंटन व त्यांच्या दोन विद्यार्थ्यांचे संशोधन, परिश्रम आहेत. सॅम अल्टमन हा त्यापैकी एक विद्यार्थी गुगलच्या ओपन एआयचा प्रमुख आहे. आपण ज्या प्रतिभेला जन्म दिला तिचे आविष्कार आनंदाने अनुभवण्याऐवजी ७५ वर्षीय हिंटन यांना उपरती झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेचे धोके भयंकर असतील, मानवी जीवन त्यामुळे उद्ध्वस्त होईल, अशी त्यांना भीती आहे. प्रायश्चित्त म्हणा, की अन्य काही; पण त्यांनी गुगलमधील दहा वर्षांची नोकरी सोडली असून, उर्वरित आयुष्य आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यांबद्दल जगभरातील माणसांना जागरूक करण्यासाठी व्यतीत करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

संगणकशास्त्रात जेफ्री हिंटन हे मोठे नाव आहे. संगणकात मानवी मेंदू कार्यान्वित करण्याचे खूप मोठे काम केल्याबद्दल यान लिकून व योशुआ बेन्गिओ यांच्यासोबत त्यांना संगणकशास्त्रातील नोबेल, अशी ओळख असलेल्या टुरिंग पुरस्काराने २०१८ साली सन्मानित करण्यात आले. आपण कोणत्या राक्षसाला जन्म घातला आहे, याची नेमकी कल्पना त्याच्या जन्मदात्याशिवाय अन्य कुणाला असणे शक्यच नाही. त्यामुळेच हिंटन यांचा राजीनामा व त्यांची उपरती, विरक्ती हा जगभर चर्चेचा विषय बनला आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्तेचे चॅटजीपीटी-४ व्हर्जन हे हिंटन यांच्या पश्चात्तापाचे कारण मानले जाते. मानवी मेंदूच्या कितीतरी लाखपट बुद्धिमत्ता या व्हर्जनमुळे संगणकाला मिळाली. या व अशा एआय अवतारांमुळे माणसांची उत्पादकता वाढेल, कार्यक्षमता वाढेल ही कितीही खरे असले तरी त्यातून जी फसवणूक होईल, गुंतागुंत होईल तिच्यामुळे मानवी जीवनच संकटात सापडेल, असे हिंटन यांचे म्हणणे आहे. 

एक प्रकारे जेफ्री हिंटन हे आजच्या पिढीचे ज्युलिअस रॉबर्ट ओपनहायमर आहेत. हेच ते ओपनहायमर ज्यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेच्या कुप्रसिद्ध मॅनहटन प्रकल्पाचे नेतृत्व केले. न्यू मेक्सिकोच्या लॉस अलामोस प्रयोगशाळेत त्याच प्रकल्पातील संशोधनातून विनाशकारी अणुबाँब हाती आला. ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरांवर अणुबाँब टाकले. लाखो लोक बळी पडले. लाखोंच्या पदरात आयुष्यभरासाठी वेदना पडल्या. नाक मुठीत धरून जपान शरण आला. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका व मित्र राष्ट्रांचा विजय झाला. ओपनहायमर यांनाही हिंटन यांच्यासारखाच सरकारने सोपविलेले विनाशकारी अण्वस्त्राचे संशोधनकार्य पूर्ण झाल्यानंतर पश्चात्ताप झाला.

‘आय हॅव बिकम अ डेथ, द डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड’ -  या विनाशासाठी स्वत:ला जबाबदार धरणारे त्यांचे हे उद्गार इतिहासात नोंदले गेले. या उद्गाराची प्रेरणा त्यांना म्हणे, भगवद्गीतेच्या कर्मसिद्धांतामधून, सृष्टीची निर्मिती व विनाश ही परमेश्वरी योजना असल्याच्या तत्त्वातून मिळाली होती. योगायोग असा, की हिंटन यांचा राजीनामा चर्चेत असतानाच ‘ओपनहायमर’ हा अणुबाँबच्या जन्मदात्याच्या आयुष्यावर बेतलेला ख्रिस्तोफर नोलानचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या २१ जूनला तो प्रदर्शित होणार आहे. 

हिंटन व ओपनहायमर दोघांचाही पश्चात्ताप खराच. तरीही या दोघांचे संशोधन हेच जगाचे वर्तमान आहे. दोघांनीही राक्षसांना जन्म दिला हेही खरेच. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या प्रत्येक युद्धात, किंबहुना साध्या चकमकींवेळीही अण्वस्त्रांची चर्चा झालीच झाली; परंतु वैज्ञानिक संशोधनाला चांगली व वाईट, अशा दोन बाजू असतातच. एका बाजूला विनाशाची भीती व दुसऱ्या बाजूला अंतराळ विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, शेती यापासून ते गुन्ह्यांच्या तपासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात अणुऊर्जेचा, विशेषत: रेडिओआयसोटोप्सचा वापर हा समांतर प्रवास आहे. या दुसऱ्या बाजूमुळे माणसांचे जगणे अधिक सुखकर झाले. अणुबाँबने जितक्यांना वेदना दिल्या त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोकांच्या व्यथा व वेदना अणुऊर्जेने शमवल्याही. कृत्रिम बुद्धिमत्तेचेही असेच होईल. हिंटन यांच्या भावनांचा आदर करून अशी आशा बाळगूया, की त्यांनी जन्म दिलेला राक्षस कह्यात ठेवण्याचे कसब माणसांना साधेलच.shrimant.mane@lokmat.com