हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीउपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील जवळिकीकडे राजकीय विश्लेषक सध्या फार बारकाईने पाहत आहेत. दोघांमध्ये जे गूळपीठ जमले आहे, तसे यापूर्वी काही कधी बघायला मिळाले नव्हते. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध फारसे मधुर नव्हते, हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या नात्यात माधुर्य असे कधी जमलेच नाही; म्हणून तर धनखड आणि मोदी यांचे जे मेतकूट जमले आहे, त्याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. सहा, मौलाना आझाद रोडवरील धनखड यांच्या घरी मागच्या महिन्यात मोदी जाऊन धडकले. साधारणत: दोन तास ते तेथे होते. या भेटीवर कोणतेही प्रसिद्धीपत्रक निघाले नाही वा छायाचित्रेही प्रसारित केली गेली नाहीत. याउलट मोदी अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटले; त्या भेटीला मात्र बरीच प्रसिद्धी देण्यात आली. ट्विटरवर छायाचित्रे टाकण्यात आली; परंतु बराच वेळ चाललेल्या धनखड-मोदी भेटीत काय चर्चा झाली, हे मात्र लगेच समजू शकले नाही. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत मुद्द्यांवर मोदी यांनी आपले विचार उपराष्ट्रपतींना ऐकवले असे दिसते. या भेटीनंतरच पंधरा दिवसांच्या आत धनखड दोनदा विदेश दौऱ्यांवर गेले होते. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसियान इंडिया शिखर बैठक आणि पूर्व आशिया शिखर बैठकीला पंतप्रधान कंबोडियाला जाऊ शकले नाहीत. बालीत झालेल्या ‘जी 20’ बैठकीत ते गुंतले होते. त्यामुळे धनखड यांना तेथे धाडण्यात आले. पनॉम पेन्ह येथे झालेल्या या बैठकीत धनखड अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना भेटले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर त्यांच्याबरोबर होते. आसियानचे नेते शिखर बैठकीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येतील, अशी अपेक्षा ठेवून होते; पण तसे होणार नव्हते. परत आल्यावर धडखड यांनी त्यांच्या बॅगा उघडल्याही नव्हत्या, तोच त्यांना फिफा जागतिक चषकाच्या उद्घाटन समारंभासाठी दोह्याला रवाना व्हावे लागले. उपराष्ट्रपतींची सेवा परराष्ट्र व्यवहारात घेण्याचा पंतप्रधानांचा मानस दिसतो. त्याची ही केवळ सुरुवात आहे.मोदी सरकारमध्ये ‘नंबर टू?’ - नाही!केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शाब्दिक घोळ घालत बसत नाहीत. ते सरळ बॅटने खेळतात. अलीकडेच मोदी सरकारमध्ये ‘नंबर टू’ असल्याबद्दल कोणीतरी अमित शहा यांची प्रशंसा केली. त्यावर ते ताडकन उत्तर देत थेट म्हणाले, ‘मोदी सरकारमध्ये दुसरा क्रमांक असे काही नाही. कोणी उगीच कसल्या भ्रमात राहू नये. येथे केवळ ‘नंबर वन’ आहे आणि त्यांचे नाव आहे नरेंद्र मोदी. आम्ही मोदीजींच्या अधिपत्याखाली काम करतो. प्रथम क्रमांक आम्हाला जे आदेश देतो, त्यानुसार आम्ही वागतो!’ अमित शहा यांनी हे सरळ सांगितले असेल; पण राजनाथ सिंग हे ज्येष्ठतेच्या उतरंडीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनाही यातून संदेश मिळाला. लोकसभेत पंतप्रधानांच्या नंतर राजनाथ सिंग यांचे आसन आहे. त्यामुळे तांत्रिक अर्थाने दुसरा क्रमांक त्यांना दिला जातो. पूर्वसंकेतानुसार पाहू जाता ज्येष्ठता यादीत राजनाथ सिंग हेच दुसऱ्या क्रमांकावर येतात; परंतु व्यावहारिकदृष्ट्या अमित शहा यांच्याकडे हे स्थान जाते!मोदींकडून शास्त्रज्ञांचा शोध -नोकरशहा आणि व्यावसायिक तज्ज्ञांना महत्त्वाच्या पदांवर नेमताना नरेंद्र मोदी सरकार जरा जास्तच वेळ लावते. विधि आयोगावर नेमणुका करण्यासाठी पंतप्रधानांनी तब्बल तीन वर्षे घेतली. थोडेसे विपरित काही होते आहे असे लक्षात येताच दिलेले आदेश मागे घेण्यासही सरकार मागे-पुढे पाहत नाही, हे या सरकारचे दुसरे वैशिष्ट्य. नोकरशाहीला अधिक चांगले स्वरूप देण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या श्रेणीबाहेरून चांगली माणसे घेण्याचा प्रयोगही या सरकारने केला; परंतु हळूहळू ही प्रक्रिया संथ होत गेली; कारण या मंडळींचे काम काही फार प्रभावी ठरले नाही. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना निवडून नरेंद्र मोदी यांनी या मंडळींना सचिव, सहसचिव आणि इतर उच्च पदांवर नेमले होते. त्यांच्यापैकी काहीजणांच्या हाती (जलसंसाधन आणि आयुष) सारथ्यही देण्यात आले; परंतु त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना सनदी श्रेणीतून आलेल्या बाबूंशी झटापट करावी लागली. सार्वजनिक उद्योगात चांगले काम व्हावे यासाठी मोदी यांनी यशस्वी उद्योजक मल्लिका श्रीनिवास यांना सार्वजनिक क्षेत्र निवड मंडळावर नेमले. दोन वर्षांपूर्वी ही निवड झाली होती. हे मंडळ सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक यांच्या नेमणुका करते. या व्यवस्थेने थोडी चांगली कामगिरी केली; पण ती गोगलगाईच्या गतीने चालली आहे. ताज्या माहितीनुसार फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑफ इंडियाच्या संचालनासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीच्या शोधात मोदी आहेत. एक वर्षापूर्वी रिटा टाटिया निवृत्त झाल्यापासून ही जागा रिकामी आहे. आय. ए. एस.च्या १९८१ च्या केडरमधून त्या आल्या होत्या. आता या महत्त्वाच्या संस्थेवर मोदी यांना चेअरमन म्हणून नोकरशहा नको आहे. प्रशासकीय कौशल्य असलेला या क्षेत्रातला तज्ज्ञ शास्त्रज्ञ त्यांना हवा आहे. योग्य व्यक्ती मिळेपर्यंत सध्या एका सनदी अधिकाऱ्याकडे तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. डॉ. एम. श्रीनिवास यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या संचालकपदी नेमून पंतप्रधान कार्यालयाने सर्वांनाच धक्का दिला. डॉ. रणदीप गुलेरिया यांची जागा त्यांनी घेतली. निवड यादीमध्ये डॉक्टर श्रीनिवास यांचे नावही नव्हते; परंतु मोदी यांना एक कठोर प्रशासक आणि सक्षम व्यावसायिक त्या ठिकाणी हवा होता, असे सांगतात.
पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचे घट्ट गूळपीठ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 9:36 AM