- भारत सासणे(विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारप्राप्त लेखक, साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष)आजचा भवताल चिंतास्पद आहे हे आधी आपण मान्य करायला हवं. त्यानंतर जगभरात अनेक ठिकाणी हुकूमशाहीचे फास आवळले जाणं, तरुणांना राजकारणाबद्दल अनास्था असणं, कुठलीही लोककल्याणकारी कामं मार्गी न लागणं, संशय व भीतीसोबत रोजचं आयुष्य कंठावं लागणं, उत्साह न उरणं या प्रश्नांची उत्तरं काढता येतात. प्रश्न गुंतागुंतीचे आणि अवघड आहेत. प्रश्नांमध्येच उत्तरांचा समावेश असणं ही एक वेगळी गोष्ट असते!
जे म्हणायचंय ते म्हणण्याइतपत परिस्थिती मोकळी आहे का, आपल्याला मोकळा श्वास घेता येतो आहे का, अशी शंका सातत्यानं व्यक्त होत आलीय. अशा परिस्थितीत लेखक-विचारवंतांची काही भूमिका असली पाहिजे का? उघड दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी मतप्रदर्शन करायला हवं का? - तर हो! जे सत्य दिसतं किंवा भासतं ते समाजातल्या जबाबदार घटकांनी समाजाला सांगायला हवं. अशा जबाबदार घटकांपैकी एक लेखक.
माझी सर्वसामान्य माणसांशी बांधिलकी आहे. गेली चाळीस-पन्नास वर्षं मी जे लिहित आलो त्याचा केंद्रबिंदू सर्वसाधारण माणूसच आहे. विवेचन, विश्लेषण केलं, भूमिका घेतल्या तरी मुळात लेखकाच्या शब्दाला वजन उरलं आहे का, अशीही चर्चा कानी येते. मला वाटतं, असं निराशावादी वातावरण आपण निर्माण करू नये. लेखक जे म्हणतो व ज्या तऱ्हेनं मांडतो त्याबद्दल शंका किंवा मतभेद असू शकतात; पण त्याचं म्हणणं आजही समाजात आदरपूर्वक ऐकलं जातं असा माझा अनुभव आहे.मात्र हे करताना लेखकावर जास्तीचं ओझं लादलं जातंय का, याचाही विचार व्हावा. सगळेच लेखक विचारप्रवर्तक लिखाण करतील असं नाही. प्रत्येक लेखक आपापल्या पिंडानुसार व प्रतिभेनुसार निर्मिती करतो. काही लेखक, कवी हे रोमँटिक विचार करतात, काही बुद्धिवादी व तर्कनिष्ठ असतात, काही लेखक कमी व कार्यकर्ते अधिक असतात, काहींची सामाजिक जागरणाच्या दिशेने व शोषणाविरोधातील लढाईसाठी बांधिलकी असते. प्रत्येक जण आपली प्रकृती घेऊन कार्यरत राहतो.
आपल्या प्रकृतिधर्मानुसार लेखकाचे टप्पे नि कप्पे असतातच. आपापला पैस बघून ते व्यक्त होतात, मात्र अलीकडच्या दशकांमध्ये लेखकांच्याच नव्हे, विचारवंतांच्या भूमिकेकडेही पाठ फिरवली जाते आहे. त्यांच्या शब्दांकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्याचं राजकारण दिवसेंदिवस ठळक होतं आहे. समाज निद्रिस्त अवस्थेत आहे, त्याला जागं करायला हवं, बरं-वाईट सांगायला हवं असं ज्यांना वाटतं, त्यांच्याच वाट्याला उपेक्षितपण येतं आहे. प्रतीकात्मक अर्थानं असं म्हटलं जातं, ‘जो झोपेतून उठवतो, तो कोंबडा सर्वाधिक मारला जातो.’
सुखाच्या, गाफिलतेच्या झोपेतून उठवून ‘सत्य’ आरवणारा व सत्यसूर्याला सलाम देणारा कोंबडा धोकादायक आहे याची जाणीव असल्यामुळं ‘व्हिसल ब्लोअर्स’ना धोका आहे. जबाबदारी मानणारे व निभावणारे समाजाला जागं करण्याचं, जाब विचारण्याचं-विचारायला लावण्याचं अप्रिय काम करत असतात. असा प्रयत्न करणारा लेखक समाजाकडून दुर्लक्षित, उपेक्षित, तिरस्कृत राहू शकतो. तरीही त्यानं आपल्या ताकदीनिशी सत्य सांगतच राहिलं पाहिजे.जागं करण्याची, सत्य सांगण्याची जबाबदारी घेऊन लेखक काम करतो तेव्हा तो लोकांना अस्वस्थ करतो. तो रूचत नाही. सगळ्याच श्रेष्ठ कथा-कादंबरीकारांवर तशी वेळ येत गेली, मात्र बेंबीच्या देठापासून सत्य सांगणाऱ्यांचं नाव टिकलं आहे!
आपल्या भाषेत अस्सल ऐवज आहे; पण आजची पिढी मराठी वाचत नाही. आपल्या भाषेत देण्यासारखं इतकं असून मराठी पुस्तकांकडे सहसा लहान मुलं, कुमारवयीन मुलं वळत नाहीत अशी चिंता सगळीकडे व्यक्त होतेय. मग भाषेचा निरंतर प्रवाह त्यांच्याकडे कसा पोहोचेल? मला वाटतं, मुलं कुठली भाषा वाचतात याविषयी सचिंत होण्यापेक्षा ते जे वाचताहेत त्याकडं लक्ष द्यायला हवं. काय वाचावं हे सांगणाऱ्यांना त्या त्या भाषेतील श्रेष्ठ लेखनाचा व्याप ठाऊक हवा. तसं घडलं तर मुलांची दृष्टी व्यापक होत जाईल. सक्षमता कुठल्या भाषेतून व कुठल्या माध्यमातून येते हा दुय्यम मुद्दा आहे.
आजचे तरुण मराठी बोलतात, मराठीत लिहितात; फक्त इतकंच की ती मराठी संमिश्र आहे. आसपासच्या विविध भाषा व बोलींचा त्यात सढळ वापर आहे. त्यांचं आकलन मुळात अनेकभाषीय आहे. ते तसंच उमटणार. अनुभवात, आशयात रमत जात जी भाषा सापडेल ती त्यांची भाषा... आकलनाची वाट विस्तारते आहे ना, याकडं लक्ष राखणं ही आपली जबाबदारी.शब्दांकन : सोनाली नवांगुळ