- अतुल करवाल(आयपीएस, महासंचालक, एनडीआरएफ)अतिशय जास्त तीव्रतेच्या बिपोरजॉय या वादळाने १५ जूनच्या संध्याकाळी ताशी १४० किलोमीटर वेगाने कच्छच्या किनारपट्टीला धडक दिली आणि गुजरात तसेच राजस्थानमध्ये विध्वंस घडवला. निसर्गाच्या अशा रौद्र स्वरूपाला तोंड देत असतानाही गुजरातमध्ये हे वादळ जमिनीवर धडकल्यावर कोणतीही जीवितहानी होऊ न देणे ही एक मोठी कामगिरी म्हणावी लागेल. इतक्या जास्त तीव्रतेच्या आपत्तीला अतिशय कार्यक्षम पद्धतीने तोंड देण्याची देशाची क्षमता सातत्याने वाढत असल्याचे हे उदाहरण आहे. १९९९ मध्ये ओडिशामध्ये झालेल्या अति जास्त तीव्रतेच्या चक्रीवादळात ९८८७ लोकांचे बळी गेल्यानंतर आपत्ती प्रतिसादामध्ये सातत्याने सुधारणा होत गेली आणि त्यामुळेच २०२० साली अम्फान या अति जास्त तीव्रतेच्या चक्रीवादळातील बळींची संख्या १२८ पर्यंत मर्यादित करण्यात यश मिळाले.
बिपोरजॉय या वादळाचा सुसंघटित आणि समन्वयित पद्धतीने केलेला सामना ही असाधारण कामगिरी आहे. भारतात ओडिशामधले १९९९चे सुपर सायक्लॉन, २००१ला कच्छमध्ये झालेला भूकंप आणि २००४ मधली त्सुनामी अशा लागोपाठ आलेल्या तीन आपत्तींनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांचे आपत्ती प्रतिसादासाठी पूर्णपणे समर्पित असलेले जाळे कार्यरत करण्यात आले. आपत्तीचा प्रभाव कमी करणे, जोखीम कपात आणि प्रतिसाद यामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा आपत्तींच्या स्थितींमध्ये खूप जास्त प्रमाणात परतावा मिळत असल्याचे लक्षात आल्यावर याकडे जास्त लक्ष पुरवले जात आहे. जगात आपत्तींची सर्वाधिक झळ पोहोचण्याची शक्यता असलेल्या देशांत भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्याने हे करणे योग्यच आहे. २००६ मध्ये आठ बटालियनसह स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या क्षमतेत केंद्र सरकारने वाढ केली असून आता बटालियनची संख्या १६ करण्यात आली आहे.
पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारताला आपत्तींना चिवट प्रतिसाद देणारा देश बनवण्यासाठी खूप जास्त भर दिला आहे. २०१६ मध्ये दिल्लीत झालेल्या आशियायी मंत्रीस्तरीय परिषदेत जाहीर केलेल्या १० कलमी कार्यक्रमाद्वारे आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा केंद्राच्या स्थापनेद्वारे आपत्ती जोखीम कपातीसंदर्भात पंतप्रधानांनी एक दृष्टिकोनदेखील जगाला दिला आहे. ४० हून जास्त देश यापूर्वीच यामध्ये सहभागी झाले आहेत.
देशातील सर्वोच्च पदस्थांकडून ठेवले जाणारे लक्ष आणि सातत्याने मिळणारे प्रोत्साहन यामुळे एनडीआरएफ हे दल संपूर्ण वर्षभर कोणत्याही काळात काम करणारे पूर्णपणे समर्पित आपत्ती प्रतिसाद दलाचे जगातील अनोखे उदाहरण ठरले आहे. आता या दलाकडे सर्व प्रकारच्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींची प्रभावी पद्धतीने हाताळणी करण्याची क्षमता आहे. यावर्षी ६ फेब्रुवारीला तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाच्या आपत्तीला आपण दिलेल्या प्रतिसादातूनही त्याचा दाखला मिळाला आहे.
गुजरात राज्याकडून करण्यात आलेले सखोल नियोजनदेखील बिपोरजॉयच्या आपत्तीला तोंड देण्यात महत्त्वाचे ठरले. १,४३,०५३ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. झाडे उन्मळून पडू नयेत म्हणून त्यांची छाटणी करण्यात आली. वाऱ्याच्या जास्त वेगाने उखडून उडत्या जीवघेण्या धोकादायक वस्तूंमध्ये रूपांतर होऊ नये म्हणून ४३१७ होर्डिंग्ज खाली उतरवण्यात आली. वादळाच्या काळातच प्रसूतीचे वेळापत्रक असलेल्या ११५२ गर्भवती महिलांना खबरदारी म्हणून आधीच रुग्णालयात हलवण्यात आले. या काळात ७०७ बालके सुरक्षित वातावरणात जन्माला आली. एनडीआरएफच्या १८ आणि एसडीआरएफच्या १२ तुकड्या आधीपासूनच योग्य ठिकाणी तैनात केल्यामुळे हे शक्य झाले. अहोरात्र काम करताना या तुकड्यांनी चक्रीवादळाच्या काळात आणि नंतरही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काम केले.
एका अतिशय मोठ्या आपत्तीला तोंड देताना इतक्या चांगल्या प्रकारे आणि समन्वय राखून एकही बळी जाऊ न देण्याच्या कामगिरीने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. अशा आपत्ती आता वारंवार येऊ लागल्या आहेत. २००० ते २०१९ दरम्यान ७३४८ आपत्तींची नोंद झाली. या आपत्तींना तोंड देण्यासाठी एनडीआरएफकडून एसडीआरएफची क्षमता वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. आपली कार्यकुशलता वाढवण्यासाठी एनडीआरएफ सातत्याने झटत आहे. देश आणि मानवतेसाठी आपली सेवा समर्पित करण्याचा या दलाला अभिमान आहे.