देशभक्त अच्युतराव पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धन या अहमदनगर येथील बंधूंनी आपल्या भाषणांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी चेतना दिली. त्यांचे विचार ऐकून अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात उतरले. रावसाहेबांच्या भाषणांनी ब्रिटिशांविरुद्ध तरुण पेटून उठले, तर अच्युतरावांच्या भूमिगत चळवळीमुळे स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला.
नगरचे प्रथितयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी रावसाहेब व अच्युतराव या दोन बंधूंनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. पटवर्धन बंधूंचे वडील हरिभाऊ हे लोकमान्य टिळक, डॉ. ॲनी बेझंट यांच्या होमरूल लीगचे काम करीत असत. ते सेनापती बापट यांचे सहाध्यायी होते. ॲनी बेझंट नगरला आल्यावर त्यांचा मुक्काम पटवर्धन वाड्यातच असायचा.
रावसाहेब पटवर्धन यांनी १९२२ साली महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह आंदोलनात उडी घेतली. १९३०, १९३२, १९३९ आणि १९४२ च्या आंदोलनात त्यांनी कारावास भोगला. त्यांचा साने गुरुजी, पंडित नेहरू यांच्याशी जवळून स्नेह होता.
अच्युतराव पटवर्धन हे रावसाहेबांचे लहान बंधू. तेही स्वातंत्र्य चळवळीत रावसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढले. प्रदीर्घ काळ भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला बळ दिले. अच्युतराव हे अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. इंग्रजांनी देशाची अर्थव्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने कशी नेस्तनाबूत केली, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हापासून ते महात्मा गांधी यांच्या विचारांकडे वळले. गांधी यांच्या आंदोलनात देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांना सहकार्य करण्याचा पर्याय त्यांनी निवडला. रावसाहेब हेही इतिहास, राजकारण, अर्थशास्त्रात पारंगत होते. रावसाहेब पटवर्धन यांनी आपल्या लेखणी आणि वाणीतून महात्मा गांधी यांचे विचार समाजात रुजवले. अस्पृश्यता निर्मूलन, हिंदू- मुस्लीम ऐक्य, दारूबंदी या गांधीजींच्या चतु:सूत्रीचा त्यांनी प्रचार केला. ‘संघशक्ती’ हे साप्ताहिक त्यांनी अहमदनगरला सुरू केले. यातून त्यांनी महात्मा गांधी यांचा संदेश खेड्यापाड्यांत पोहोचवला. स्वदेशीची चळवळ त्यांनी झोपडीपर्यंत नेली. त्यांनी स्थापन केलेल्या साखर कामगार युनियनमार्फत १०० चरखे फिरू लागले.
सन १९४२च्या लढ्यात भूमिगत राहून स्वातंत्र्याचे कार्य करणारे अच्युतराव पटवर्धन यांना कैदेत टाकण्यासाठी ब्रिटिश पळापळ करत होते. यासाठी तीन लाख रुपयांचे बक्षीस अन् अनेक बिघे जमीन इनाम म्हणून देण्याचे जाहीर केले गेले. परंतु शेवटपर्यंत अच्युतरावांनी ब्रिटीशांना धूळच चारली. अच्युतरावांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीत काम करून देशाच्या विकासाला एक दिशा दिली. पुढे समाजवादी पक्षाच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. अच्युतराव हे रावसाहेबांपेक्षा जहाल विचारांचे होते. काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर पडून नगर जिल्ह्यात पुढे त्यांनी स्थानिक पातळीवर काम केले. रावसाहेब हे नेहरूंच्या, तर अच्युतराव हे जयप्रकाश नारायण यांच्या जवळ होते. १९४५ साली रावसाहेब पटवर्धन यांची तुरुंगातून सुटका झाली. नगरच्या जनतेने त्यांचा सत्कार केला, त्यावेळी त्यांना १० हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. ती त्यांनी कामगारांच्या हितासाठी खर्च केली. पुढे त्यांनी देशभर कामगार चळवळ मजबूत करून कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.
अच्युतराव पटवर्धनांनी पुढे राजकारणातून संन्यास घेतला. जे. कृष्णमूर्तींच्या सल्ल्यानुसार त्यांनी विधायक कार्य केले व शैक्षणिक क्षेत्रातही खूप भरीव कार्य केले. समाजातील वरच्या स्तरांतील अनेक नामवंत व्यक्तींबरोबर अच्युतरावांचा स्नेह होता, याचा भूमिगत चवळवळीस फार फायदा झाला. अहमदनगरच्या मातीत जन्मलेला नेता, अशी त्यांची ख्याती देश- विदेशात हाेती.
स्वातंत्र्यानंतर नेहरू पर्व सुरू झाले. रावसाहेब पटवर्धन हे नेहरूंच्या जवळचे होते. नेहरूंनी रावसाहेबांना उपराष्ट्रपतिपद स्वीकारण्याची विनंती केली. मात्र, रावसाहेबांनी ती नम्रपणे नाकारली. सत्तेच्या जागा नाकारण्याचे त्यांनी ठरवले होते. काहीही न मागणारा मित्र म्हणून मला राहू द्या, अशी गळ रावसाहेबांनी नेहरूंना घातली, अशी त्यांची विशुद्ध मैत्री होती. अन्यथा रावसाहेब पटवर्धन उपराष्ट्रपतीही झाले असते!
संकलन : सुदाम देशमुख वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, अहमदनगर