योगेश्वर गंधे, चित्रपट अभ्यासक, पत्रकारमला अगदी परवा माझी पन्नाशीतली एक मैत्रीण म्हणाली, ‘अरे तुझी अमोल पालेकरांशी ओळख आहे ना? मला त्यांची भेट घालून दे. माझ्या विशीनंतर जेव्हा आई-वडिलांनी स्थळ पाहायला सुरुवात केली होती, तेव्हा माझा हट्टच होता, की मला अमोल पालेकरसारखाच कुणी हवा ! माझी आई पण पालेकरांचे सिनेमे पाहूनच खुश असायची!
- मी तिला थांबवत म्हटलं की, बाई गं, येत्या २४ नोव्हेंबरला अमोल पालेकर हा अभिनेता-दिग्दर्शक, चित्रकार, सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी माणूस ऐंशीव्या वर्षात पदार्पण करतोय. तर म्हणाली, ‘हे रे काय? तू काहीतरी सांगतोस. चितचोर, छोटी सी बात, रजनीगंधा, घरौंदा या सिनेमातून आपल्या अभिनयाचं तेव्हा आणि अजूनही गारुड करणारा अमोल पालेकर ऐंशी वर्षांचा? नाही पटत !’
हळूहळू माझ्या नजरेसमोर गेल्या ४५-५० वर्षांच्या आमच्या मैत्रीचा आणि चित्रपट चळवळीचा पटच सरकू लागला. १९८० च्या दशकात व आणीबाणी कालखंडातील हिंदी सिनेमा हा बासू चटर्जी, हृषिकेश मुखर्जी, राजश्री प्राॅडक्शन्स यांचा होता आणि प्रामुख्याने अमोल पालेकर या टिपिकल मध्यमवर्गीय अभिनेत्याच्या भोवतीच फिरत होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाने एकूणच देशात उत्साहवर्धक परिस्थिती नव्हती. काळाबाजार फोफावला होता. राजकीय अस्थिरता होती. प्रत्येक गोष्टीच्या रेशनिंगने मध्यमवर्ग पिचला होता आणि त्याचा मोठा परिणाम विशी-पंचविशीतल्या युवकांच्या वागण्या-बोलण्यात दिसत होता. त्यातून आलेला मूर्तिमंत गबाळा बावळटपणा, नेभळट-भित्रेपणा नेमकेपणाने दिग्दर्शकांनी अमोलच्या रूपातून प्रेक्षकांसमोर आणला होता.
गावदेवीत एका मध्यमवर्गीय पण कलाप्रेमी कुटुंबातला अमोल पालेकर जगप्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेची पदवी घेतो. तिथूनच नाटकाशी नाळ जुळते आणि दुबे, बादल सरकार, तेंडुलकर, मोहन राकेश, धर्मवीर भारती अशांच्या सान्निध्यात त्याच्यातला नट व दिग्दर्शक घडत जातो. पण त्या काळात केवळ नाटक व चित्रकला यावर पोट कसं भरता येईल? म्हणून मग हा मध्यमवर्गीय एका राष्ट्रीयीकृत बँकेत कारकून होतो. म्हणजे बघा, त्याने हिंदी चित्रपटात साकारलेल्या सर्वच भूमिका या त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी किती एकरूप होत्या ! मनाच्या भुकेसाठी कला आणि पोटासाठी नोकरी हाच मध्यमवर्गीयांचा स्थायीभाव आहे. गावदेवी सारस्वत काॅलनी ते जुहूतल्या ‘चिरेबंदी’ पर्यंतचा अमोल पालेकर या सामान्य माणसाचा नट, दिग्दर्शक, चित्रकार, समाजव्रती म्हणून झालेला असामान्य प्रवास मोठा व थक्क करणारा निश्चित आहे.
अमोल पालेकरांनी त्यांच्या काळात जो पिचलेला मध्यमवर्गीय नायक जिवंत केला, त्यातूनच हिंदी रुपेरी पडद्यावर ॲंग्री यंग मॅन जन्माला आला. किती आगळीवेगळी नाटकं, मालिका, हिंदी-मराठी, बंगाली, कानडी चित्रपटांतील अभिनय व दिग्दर्शन. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान, अनेक चित्रप्रदर्शने, अनेक जगप्रसिद्ध पुस्तकांची जॅकेट्स आणि वेगळ्या वाटेवरचे दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रेक्षकांच्या मनातून पुसले जाणारे नाहीत.
सुजाण प्रेक्षक घडविण्यासाठी महाराष्ट्रात चित्रपट संस्कृती रुजवून पालेकरांनी सुरु केलेली ‘अभिजात चळवळ’ असो, नाना पाटेकरांच्या सहयोगाने पुण्यात केलेले ‘हरित पट्टा जतन व संवर्धन’ असो, अगदी कोकणात माणगावला उभारलेले ‘आंतरभारती भवन’ असो, हे सारे पालेकरांच्या स्वभावधर्मातून फुललेलं कार्य दुर्लक्षून चालणार नाही. वाहत्या पाण्यात हात धुणारे अनेक संधिसाधू आहेत; पण अमोल पालेकर हा मनस्वी कलावंत अशा वाहत्या पाण्यापासून कायमच दूर राहिला.
अपघाताने लाभलेले भारत सरकारच्या ‘चिल्ड्रन्स फिल्म संस्थे’चे अध्यक्षपद सोडले, तर हा श्रेष्ठ नट-दिग्दर्शक आजही कोणत्याही सरकारचा लाभार्थी नाही. असं वागणारा हा माणूस कलावंत आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पण हेच शाश्वत कलावंताला ठामपणे जगवतं.
अमोल पालेकर नावाचा हा मित्र ‘आक्रित’, ‘रावसाहेबा’सारखा आपल्याच ‘दायरा’त ‘भूमिका’ करत ‘थोडासा रुमानी’ होत; ‘छोटी सी बात’ करत ‘रजनीगंधा’चा दरवळ व ‘अंगुर’चा स्वाद देत दिग्दर्शनाचा अजोड ‘घरौंदा’ उभारण्यात ‘कच्ची धूप’ बनून आहे. बदलत्या समाज व कलाजीवनाचा मराठी आणि पर्यायाने भारतीय अस्सल ऐवज म्हणजे अमोल पालेकर ! ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने या मित्रास अगणित शुभेच्छा!