डाॅ. वसंत भाेसले, संपादक, काेल्हापूर -कर्नाटकात भाजपची पाळेमुळे रुजविणारे नेतृत्व बी. एस. येडीयुराप्पा! कर्नाटकात जनसंघाचे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे कार्यकर्ते होते. तेव्हापासून ते शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत हाेते. प्रसंगी सायकलवरून यात्रा काढून पक्षाची पाळेमुळे कर्नाटकात रुजविली. सत्तेत येताच ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण यावर भर देणारा भाजपचा पाया म्हणजे येडीयुराप्पा! त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी बाजूला करून त्यांचेच विश्वासू बसवराज बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले. त्या नाराजीतूनच मार्चच्या २७ तारखेला विधानसभेत शेवटचे भाषण करताना येडीयुराप्पांनी आपला जीवन प्रवास मांडला आणि आपण अनिच्छेने निवृत्ती घेत असल्याचे संकेत देत या सभागृहात पुन्हा दिसणार नाही, असे सांगितले.
येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाला पर्याय नसताना किंबहुना ताे उभा न करता विधानसभेच्या निवडणुकीला सामाेरे जाणे ही सर्वात माेठी चूक भाजपने केली. बोम्मई मुख्यमंत्रिपद नीट सांभाळत असले तरी त्यांचा राज्याच्या राजकारणात पायाच नव्हता. धारवाड ते हावेरी आणि हावेरी जिल्ह्यातील शिग्गांव मतदारसंघापुरते मर्यादित हाेते. शिवाय त्यांची पार्श्वभूमीही संघ परिवाराची नाही. त्यांचे वडील कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई तर समाजवादी विचारांचे हाेते. बोम्मई शिवाय इतर स्थानिक पण राज्यव्यापी नाव असणाऱ्या नेत्यांनाही भाजपने उमेदवारी दिली नाही, ही माेठी चूक हाेती. जगदीश शेट्टर, लक्ष्मण सवदी आदी चौदा नेत्यांनी पक्ष साेडला. माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी ऐन निवडणुकीच्या ताेंडावर निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या चिरंजीवासही उमेदवार न देऊन त्यांना नाराज केले. अशा पद्धतीने नेतृत्वाच्या फळीच्या पायावरच हातोडा ऐन निवडणुकीत घातला आणि वातावरण कलुषित करून टाकले.
काँग्रेसची यशस्वी रणनीती काँग्रेसने भाजपचा पराभव करण्यासाठी जी रणनीती अवलंबली त्यात पाच प्रमुख घटक हाेते. राहुल गांधी यांनी भारत जाेडाे यात्रेत कर्नाटकात एकवीस दिवस पदयात्रा केली. संपूर्ण यात्रेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे राहुल गांधींसाेबत राहून बाेम्मई सरकारवर टीका करीत राहिले. राहुल गांधी विविध समाजघटकांत कसे पाेहाेचतील याची आखणी केली. त्याचा प्रभाव खूप राहिला. कर्नाटकातील जनता खूप भावनिक विचार करते. सहिष्णूसुद्धा आहे. भावी मुख्यमंत्री काेण असणार, या प्रश्नाला खुबीने हाताळले. सिद्धरामय्या वरिष्ठ असल्याने तेच मुख्यमंत्री हाेतील, असे ओबीसी आणि दलित समाजाला वाटत राहिले. डी. के. शिवकुमार प्रदेशाध्यक्ष असून, सर्व कारभार ते धडाडीने पाहत असल्याने त्यांच्या रूपाने वक्कलिग समाजाला पुन्हा एकदा संधी लाभेल, असे वाटत राहिले. नेतृत्वाशिवाय तिसरी एक बाजू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे आहेत. उत्तर कर्नाटकातील ते वरिष्ठ नेते आहेत. सिद्धरामय्या आणि शिवकुमार दक्षिणेतील आणि उत्तरचे नेते खरगे अशी माेटबांधणी झाली. शिवाय, खरगे यांच्या नेतृत्वामुळे दलितांची मते पुन्हा काँग्रेसकडे वळण्यास मदत झाली. खरगे यांचा चार दशकांचा कर्नाटकातील राजकारणात वावर आहे.
बजरंग बली काँग्रेसने हिंदुत्वाचा प्रचार भाजप करणार हे माहीत असूनही बजरंग दल आणि पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम समाजाच्या संघटनेवर कारवाईचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले. यावर नरेंद्र माेदी यांनी प्रचंड टीका केली. रामाला कुलपात ठेवले हाेते, आता बजरंगबलीला ठेवणार, अशी टीका करताना ते विसरले की, प्रचार स्थानिक प्रश्नांवर कितीतरी पुढे गेला हाेता. बजरंग दल ही संघटना कर्नाटकात जे करते त्याला सर्वच हिंदूंचा पाठिंबा असताे. किंबहुना ही संघटना हिंदूंचे खरेच प्रश्न साेडविते, असे चित्र नाही. बदलत्या तरुणाईच्या जीवनशैलीवर उठलेली संघटना, अशी सनातनी प्रतिमा आहे. त्यामुळे हा मुद्दा काेणाला नकाेच हाेता.
काँग्रेसने उत्तम संघटन, स्थानिक प्रश्नांवर भर आणि प्रचारात आघाडी घेऊन निवडणुकीचा अजेंडा आधीच निश्चित करून टाकला हाेता. चेहराहीन प्रदेश भाजपचे नेतृत्व त्यात मागे पडले आणि पराभव पदरी घेतला. मुळात भाजपचा नेतृत्वाचा पायाच उखडला गेला हाेता. कळस पडायला फार वेळ लागला नाही.
भ्रष्टाचाराचा आराेपबोम्मई यांच्या नेतृत्वाला मर्यादा असल्याने मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर वचक नव्हता. नरेंद्र माेदी यांच्या करिष्मावर भाजपचे कमळ पुन्हा फुलणारच आहे. या अतिआत्मविश्वासामुळे मंत्री आणि पक्षाचे आमदार-खासदारांनी लाेक कल्याणाच्या कामातही कमिशन घेण्याचा सपाटा लावला. प्रत्येक सरकारी कामात पाच-दहा टक्के नव्हते, तर तब्बल ४० टक्क्यांचा वाटा घेण्याचा प्रघातच पाडला गेला. याला सरकारी कंत्राटदार महासंघाने विराेध केला. एका कंत्राटदाराचे दिवाळे निघाले आणि त्याने आत्महत्याच केली. केवळ या टक्केवारीला ताे वैतागला हाेता. तेव्हा कर्नाटकात सर्वदूर पसरलेल्या भ्रष्टाचाराचा स्फोट झाला. कंत्राटदार महासंघाने बोम्मई सरकारविरुद्ध मोहिमच उघडली. काँग्रेसला त्याचा लाभ उठविण्याची आयती संधी मिळाली. काँग्रेसने आजवर काम केलेच नसून भ्रष्टाचारच केला, असा नेहमी प्रचार करणाऱ्यांना सरकारी कामे करणाऱ्यांनीच आराेप करून उत्तर दिले. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपावरही विश्वास बसला. ४० टक्के कमिशन ही मोहिमच गेली वर्षभर कर्नाटकात काँग्रेसने जोरदारपणे राबविली.
नेतृत्वाचा पायाच ठिसूळ झाल्याने बोम्मई यांचे नावही मागे पडले. निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री जाहीर करण्याची असंसदीय पद्धत सुरू करणारा भाजप यावेळी अडचणीत आला. भ्रष्टाचाराच्या आरोपाने काळवंडलेला बोम्मई यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करण्याचे धाडस भाजपला करता आले नाही. स्वत:च्या धोरणालाच काळिमा फासला. येडियुराप्पाशिवाय कर्नाटकात भाजप ही कल्पनाच कार्यकर्त्यांना मानवत नाही. त्याला पर्याय न तयार करता भाजपने पंतप्रधान माेदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाच्या जाेरावर निवडणूक जिंकता येते, असा दाखविलेला आत्मविश्वास बरेच काही सांगून जाताे.
महागाईचा गॅसस्फोट कर्नाटकाच्या काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक स्थानिक पातळीवरील आणि सर्वसामान्य माणसांच्या समस्येवर लढविण्याची रणनीती ठरविली. परिणामी, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या प्रचारातील हवा काढून घेतली. महागाई वाढली आहे हे काेणी नाकारू शकत नाही. गॅस, पेट्राेल, डिझेल आदींचे दर वाढले आहेत, हेदेखील नाकारता येत नाही. काँग्रेसने मतदानाच्या दिवशी गल्लीगल्लीत गॅस सिलिंडरची पूजा करा आणि मतदानाला निघा, ही माेहीम राबविली. त्याचे व्हिडीओ तयार करून सर्वत्र फिरविले. पूजा करणारे कमी, मात्र त्यांचा व्हिडीओ पाहणारे लाखाे मतदार! ही कल्पना हिट ठरली.
जातीय समीकरणे! कर्नाटकात जातीय समीकरणांचा प्रभाव वाढत असताना भाजपने माेठ्या लिंगायत वर्गाला नाराज केले. लिंगायतांचे वर्चस्व असलेला पक्ष म्हणून मध्य कर्नाटक (२६ जागा) आणि दक्षिण कर्नाटकातील (६१ जागा) वक्कलिंगा समाज भाजपपासून दुरावतच राहिला आहे. या दाेन्ही विभागांत सपाटून मार बसला.