शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

साडेपाच लाखांच्या ब्रिटिश खजिन्याच्या लुटीची कहाणी; धुळ्यातील व्यंकटराव रणधीर झाले होते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2022 1:22 PM

ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कहाण्या

शुक्रवार, १४ एप्रिल १९४४. रात्री धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात बातमी पसरली की, चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथे ब्रिटिश शासनाची खजिन्याची मोटार अडविण्यात आली.  झटापटीत मोटारीचा चालक, एक पोलीस आणि एका क्रांतिकारकाला गोळी लागली! खजिन्यातील रक्कम धोतराच्या गाठोड्यात बांधून सर्व क्रांतिकारक फरार झाले! त्यामध्ये क्रांतिकारकांच्या एका गटाचे नेतृत्व करणारे व्यंकटराव रणधीर यांचाही समावेश होता. धुळे जिल्ह्यातल्या बोराडीचे क्रांतिवीर व्यंकटराव रणधीर म्हणजे क्रांतीचा तळपता सूर्य.

अण्णांचा जन्म ५ मे १९२३चा. आठवीपर्यंत शिक्षण झालेले असताना महात्मा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ते विद्यार्थीदशेतच स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले.  तिरंगा ध्वज फडकविल्याबद्दल ब्रिटिश शासनाने ठोठावलेली चार महिन्यांची शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांनी बोराडी येथील फॉरेस्ट बंगला जाळला. स्वातंत्र्य चळवळीसाठी पैशांची आवश्यकता होती. त्यातूनच सरकारी खजिना लुटण्याची कल्पना पुढे आली. 

१४ एप्रिल १९४४ रोजी धुळ्याहून साडेपाच लाखांचा खजिना नंदुरबारला जात आहे, अशी माहिती क्रांतिकारकांना मिळाली. हा  खजिना लुटण्याची योजना तयार करण्यात आली. एका गटात सातारा येथील सहा बंदुकधारी क्रांतिकारक आणि दुसऱ्या गटात व्यंकटराव अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आठ क्रांतिकारक सहभागी होतील, असे ठरले. त्यानुसार सातारा येथून सहा क्रांतिकारक धुळ्यात आले. शुक्रवार, १४ एप्रिल १९४४चा दिवस उजाडला.

व्यंकटराव रणधीर यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांचा गट धुळे - नंदुरबार रस्त्यावर डांगुर्णे येथे जाऊन थांबला. शुक्रवारी सकाळी धुळे इम्पिरिअल बॅंकेतून आठ पेट्यांमध्ये साडेपाच लाखांचा खजिना घेऊन युनियनच्या मोटारीतून पोलीस बंदोबस्तात खजिना नंदुरबारकडे रवाना झाला. डांगुर्णे गावाजवळ उपस्थित व्यंकटराव अण्णा यांच्या नेतृत्वाखालील गटाने खजिन्याची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. ठरल्यानुसार साताऱ्याहून आलेल्या क्रांतिकारकांचा दुसरा गट साळवे फाट्यानजीक खजिन्याची गाडी अडविण्यासाठी सज्ज होता. त्यांच्या मदतीला शिंदखेडा येथून अन्य एक क्रांतिकारक ट्रक घेऊन आला. त्याने खजिन्याच्या गाडीपुढे ट्रक आडवा घातला.

साताऱ्याच्या गटाला मदत करण्यासाठी आणखी तीन क्रांतिकारक शिंदखेडाहून नंदुरबारकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाडीने वेळीच त्याठिकाणी उपस्थित झाले होते. डांगुर्णे येथे गाडी अडविण्यात अपयशी ठरलेला व्यंकट अण्णांचा गटही साळवे गावाजवळ पोहोचला. खजिन्याची गाडी अडविल्यानंतर त्या गाडीतील पोलीस आणि क्रांतिकारकांमध्ये गोळीबार झाला. खजिन्याचा वाहनचालक, एक पोलीस आणि एक क्रांतिकारक अशा तिघांना गोळ्या लागल्या. पण त्याची पर्वा न करता  क्रांतिकारकांनी गाडीतील खजिन्याच्या आठ पेट्या खाली उतरवून उघडल्या. सायंकाळी अंधार पडल्यावर खजिना त्यांच्या धोतराच्या गाठोड्यात बांधला. त्यानंतर सर्वच क्रांतिकारक दोन-तीन गटांमध्ये विखुरले आणि मिळेल त्या वाहनाने तेथून निघून गेले.  

व्यंकटराव रणधीर यांच्यासोबत काही क्रांतिकारक  धुळे तालुक्यातील शिरुड येथे एका शेतात लपून बसले होते. खजिना लुटीच्या घटनेनंतर ब्रिटिश शासनाने फरार क्रांतिकारकांना पकडून देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले होते. तब्बल आठ महिने भूमिगत राहिल्यानंतर अखेर व्यंकटराव अण्णा, शंकर पांडू माळी, धोंडीराम तुकाराम माळी, कृष्णराव विष्णू पवार, अप्पाजी उर्फ रामचंद्र भाऊराव पाटील, विष्णू सीताराम पाटील, शिवाजी सीताराम सामंत हे पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. या खटल्याचा निकाल लागला. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी व्यंकटराव अण्णा आणि शंकर माळी, धोंडीराम माळी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली, तर विष्णू पाटील, शिवाजी सावंत यांची निर्दोष सुटका झाली. 

पुढे वर्षभरातच भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात आली. त्यात व्यंकटराव अण्णाही सुटले. भारत सरकारने ताम्रपट देऊन स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांचा सत्कार केला. स्वातंत्र्यानंतर अण्णा १९५७ ते १९६७ अशी दहा वर्षे काॅंग्रेसचे आमदार होते. त्यांनी १९६८ साली बोराडीत ऑल इंडिया आदिम जाती परिषद भरवली. पुढे १९७२पासून १९७९पर्यंत त्यांनी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. किसान विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खान्देशातील शेतकरी, आदिवासी, हरिजनांसाठी शाळा व महाविद्यालये उघडली. 

१९५३ ते १९६० या काळात धुळे जिल्हा स्काऊट आणि गाईड सहायक आयुक्त म्हणूनही काम पाहिले. त्यांना १९८५मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ‘सिल्व्हर एलिफंटा’ पुरस्कार मिळाला, तर १९८७मध्ये राज्य शासनाच्या ‘आदिवासी सेवक’ पुरस्काराने अण्णांना सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातही अविरत देशसेवा केलेल्या अण्णांनी ३० नोव्हेंबर २०१० रोजी देह ठेवला.संकलन, शब्दांकन : राजेंद्र शर्मा,  लोकमत, धुळे

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत