विजय दर्डा
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या शनिवारी अमेरिकेचे दिग्गज उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासाठी म्हातारा धनिक, हटवादी, खतरनाक असे शेलके शब्द वापरले; तेव्हा त्यांच्या या तिखट पवित्र्याची जगभर चर्चा झाली. हे जॉर्ज सोरोस वेळोवेळी भारताबद्दल वाकडे बोलतात.
जयशंकर म्हणाले, ‘जॉर्जसारख्या लोकांना न्यू यॉर्कमध्ये बसून असे वाटत असते की जग त्यांच्या मर्जीने चालले पाहिजे.’ गेल्या वर्षी स्लोवाकियामध्ये एका पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले होते, ‘आपले प्रश्न सगळ्या जगाचे प्रश्न असतात अशा मानसिकतेत युरोप वाढला आहे; परंतु जगाचे प्रश्न हे युरोपचे प्रश्न नाहीत.’ त्याहीआधी वॉशिंग्टनमध्ये युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याबद्दल एका पत्रकाराने जयशंकर यांना प्रश्न केला, तेव्हा ते म्हणाले, ‘आपण भारताच्या तेल खरेदीबद्दल चिंतित आहात; पण युरोप रशियाकडून जितके तेल एका दुपारी खरेदी करतो तितके भारत एका महिन्यातही खरेदी करत नाही’, ही अशी थेट उत्तरे देणे हे जयशंकर यांचे वैशिष्ट्य आहे. ते गोलगोल बोलत नाहीत. त्यांच्या या तिखट वक्तव्यांमुळे संपूर्ण जगात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दक्षिण आशियातील कुठल्याही देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पश्चिमेला अशा प्रकारे झणझणीत उत्तरे दिलेली नाहीत.
महत्त्वाची गोष्ट ही की, विदेशी राजनीतिज्ञही त्याचे समर्थन करतात. जयशंकर यांनी युरोपच्या मानसिकतेवर प्रहार केला, तेव्हा भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनेर यांनी ट्वीट केले, ‘यांचा तर्क अगदी योग्य आहे.’ जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्रनीतीचे सर्वांत मोठे दूत आहेत. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि व्यापक अनुभव यामुळे त्यांच्यात अपार क्षमता आहेत. केवळ परराष्ट्र सचिव म्हणून नव्हे तर चीन, रशिया आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मोदींनी त्यांच्या क्षमता ओळखून मे २०१९ मध्ये त्यांना परराष्ट्रमंत्री केले. त्यानंतर त्यांचा खणखणीत पवित्रा संपूर्ण जग पाहत आले आहे.
कुठल्या देशाने भारतावर टीकाटिप्पणी करावी आणि जयशंकर यांनी गप्प राहावे, असे सहसा होत नाही. एस. जयशंकर यांच्या या खमक्या गर्जनांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट असे धोरण आहे. ते म्हणजे भारत आता कमजोर राहिलेला नाही. विश्वगुरू होण्याच्या दिशेने निघाला आहे. यावेळी शक्तिशाली ‘जी २०’ आणि शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन यांसारख्या संस्थांचे अध्यक्षपद भारताकडे आहे. भारताच्या राष्ट्रवादाच्या संदर्भात जयशंकर यांना प्रश्न केला गेला तेव्हा ते म्हणाले, ‘भारताचा राष्ट्रवाद व्यापक आंतरराष्ट्रीयवादाला पुढे घेऊन जात आहे.’ राजनीतीचा इतिहास सांगतो, एका बाजूला गर्जना करत असताना दुसरीकडे अत्यंत सूक्ष्म कूटनीतीचे जाळे पसरणे तितकेच आवश्यक असते. अशा गुप्त मोहिमांसाठी प्रसिद्ध आणि सशक्त खेळाडू अजित डोवाल यांच्याशिवाय सरस दुसरे कोण असू शकेल? ते शांतपणे आपले काम करत राहतात आणि जगाला अचानक धक्का देतात. अगदी ताजे उदाहरण पाहा. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते अमेरिकेत पोहोचले. तेथे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी त्यांच्याशी भेट झाल्यानंतर सांगितले,
‘जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अमेरिका भारताबरोबर सहकार्य वाढवत आहे.’ यानंतर डोवाल ब्रिटनला पोहोचले. लंडनमध्ये ब्रिटनचे सुरक्षा सल्लागार टीम बॅरो यांच्याशी त्यांची भेट झाली आणि कमालीची गोष्ट ही की, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेसुद्धा बैठकीत सहभागी झाले होते. तिथून निघून डोवाल रशियात पोहोचले. तेथे अफगाणिस्तानसंदर्भात एक बैठक झाली. त्या बैठकीत इराण, कझाकस्तान, चीन, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले होते; परंतु, पाकिस्तानमधून कोणीही आले नव्हते. पाकिस्तानकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारच नाही; आणि त्यांनी बैठकीत सहभागी व्हायला नकारही दिला होता. बैठकीत पाकिस्तान नसणे हा भारतीय कूटनीतीचा मोठा विजय मानला जात आहे. ज्या अफगाणिस्तानात तालिबान्यांना सत्तेवर आणण्यासाठी पाकिस्तानने हरप्रकारे प्रयत्न केले, तेच तालिबान आता त्याचे शत्रू झाले आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा भारतासाठी धोका मानला जात होता, तेच तालिबान भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी उतावळे झाले आहेत. तिथले नागरिकही पाकिस्तानचे शत्रू झाले आहेत. बाजी उलटवण्यात नक्कीच अजित डोवाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन सर्वसाधारणपणे कोणत्याही देशाच्या कॅबिनेट मंत्र्यालाही भेटत नाहीत; परंतु, सगळे राजशिष्टाचार बाजूला ठेवून ते डोवाल यांना भेटले. यावरून डोवाल काय रसायन आहे, याचा अंदाज आपण लावू शकतो... पुतीन आणि डोवाल दोघांनीही व्यवसाय म्हणून हेरगिरी केलेली आहे, हे इथे महत्त्वाचे! भारताचे महत्त्व आता जगभरात प्रस्थापित झाले आहे. चीनविरुद्ध आपल्याला भारताची गरज आहेच; पण रशियातही भारतच आपल्याला मदत करेल, हे अमेरिकाही जाणते! रशियाचाही भारतावर विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या गोष्टी उत्तमरीतीने जाणून आहेत. त्यांची कूटनीतीही याच मुद्द्यांभोवती गुंफलेली आहे. ते स्वत: तर कूटनीतीचे प्रसिद्ध खेळाडू आहेतच; पण जयशंकर आणि अजित डोवाल यांच्यावरही त्यांचा विशेष विश्वास आहे. हे दोघेही खऱ्या अर्थाने भारताची दोन अनमोल रत्ने आहेत.
(लेखक लोकमत समूहाचे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आहेत)