-संजय करकरे, उपसंचालक, सृष्टी कन्झर्वेशन फाउंडेशन, नागपूर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या दोन सलग मृत्यूमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. या व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या क्षेत्रात गेल्या आठवड्यात साधारणतः अकरा ते बारा वर्षे वयाचा एक नर वाघ मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी वयात येऊ लागलेल्या आणखी एका नर वाघाचा मृतदेह जंगलात काहीसा सडलेल्या अवस्थेत सापडला.
दुसऱ्या जंगलातील वाघ नागझिराच्या जंगलात सोडण्याच्या संवर्धन स्थलांतरणाच्या प्रयोगाचे फलित समोर येण्यापूर्वीच सलग दोन वाघांच्या या मृत्यूमुळे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना अशी म्हणण्याची स्थिती निर्माण झाली. खरं तर वाघांच्या मृत्यूच्या या दोन्ही घटना नैसर्गिक आहेत. या जंगलात नव्याने आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दुसऱ्या नर वाघानं वर्चस्वासाठी या दोन वाघांचा बळी घेतला हे स्पष्ट झालं आहे.
सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचं ‘सत्तांतर’ नावाचं अतिशय सुरेख पुस्तक वानरांच्या सत्तासंघर्षावर लिहिलं आहे. कळपातील प्रमुख नर वानर आपल्या टोळीसोबतच दुसऱ्या टोळीवर कसं वर्चस्व मिळवतो याचं अतिशय मार्मिक असं वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक नागझिरा अभयारण्याच्या पार्श्वभूमीवर आणि माडगूळकर नागझिरामध्ये ज्यावेळेस मुक्कामी राहिले होते, त्यातील नोंदींच्या आधारावर आहे.
नागझिऱ्यात अलीकडील काळात घडलेल्या या घटना सत्ता संघर्षाच्याच आहेत. नागझिरामध्ये मृत्युमुखी पडलेला T 9 नावाचा हा वाघ साधारणपणे २०१५च्या अखेरीस या व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला. हा वाघ मूळचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील शिवणझरीच्या जंगलातील होता. अत्यंत तरुण वयातच म्हणजेच दोन सव्वा दोन वर्षांतच या वाघानं स्थलांतर केलं. जंगलाच्या सलगतेचा फायदा घेत हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातून, गोंदिया जिल्ह्यात प्रवेशला. नव्या दमाच्या या वाघानं त्यावेळेस तेथील जंगलात हळूहळू जम बसवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना साथ मिळाली त्या ठिकाणी असलेल्या अन्य नर वाघांच्या अकाली मृत्यूमुळे. नागझिरा आणि कोका परिसरात असणाऱ्या T 8 या नर वाघाशी त्याची झटापटही झाली. मात्र दोघांनीही आपापले क्षेत्र समजूतदारपणे सांभाळायचे जणू ठरवलं असावं. मात्र T 8 या वाघाचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्यावर त्याच्या क्षेत्रावर अधिराज्य मिळवणं T 9 ला शक्य झालं. परिणामी २०१६ पासून गेल्या आठवड्यातील त्याच्या मृत्यूच्या घटनेपर्यंत या नर वाघानं, सात-आठ वर्षे नागझिरा तसेच कोका परिसरातील जंगलावर आपली सत्ता टिकवून ठेवली.
या मधल्या काळात आजूबाजूच्या क्षेत्रातील नर वाघ आपापल्या परीनं, आपलं क्षेत्र सांभाळून राहिले. कोणीही नागझिराच्या जंगलात T 9 च्या सत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही. या काळात T 9 या वाघाच्या अधिपत्याखाली चार वाघिणी होत्या. आता या चारही वाघिणींना मिळून साधारण १५ पिल्लं आहेत. त्यातील T 4 या वाघिणीचं एक वयात येऊ घातलेलं पिल्लू नव्यानं दाखल झालेल्या या नर वाघानं सर्वप्रथम मारलं. त्यानंतर त्यानं T 9 या वाघाला आव्हान देऊन त्याचाही बळी घेतला. या दोन वाघांच्या झटापटीत नवख्या पण अत्यंत ताकदीच्या या वाघानं वृद्धत्वाकडं झुकू लागलेल्या T 9 या वाघाला अक्षरशः धोबीपछाड करून, त्याच्या गळ्यात आपले तीक्ष्ण दात खुपसून ठार मारल्याचं शवविच्छेदनात स्पष्ट झालं आहे.
अद्याप या नवख्या नर वाघाची व्याघ्र प्रकल्पाच्या दफ्तरी नोंद नाही. हा वाघ गेल्या वर्षीपासूनच व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरील क्षेत्रात फिरत असल्याची माहिती आहे. आता मात्र त्यानं आपला मोर्चा नागझिरा जंगलात वळवल्यानं सर्वप्रथम त्यानं T 4 या मादीच्या पिल्लाचा पहिला बळी घेतला. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात नागझिरा अभयारण्यात T 4 ही वाघीण व तिच्या साधारण १८ ते २० महिन्यांच्या पिल्लांनी पर्यटकांना मोठी भुरळ पाडली होती. या सर्व कुटुंबाची अनेक छायाचित्रे प्रसिद्धिमाध्यमांवर झळकली होती. हे देखणं कुटुंब पुढच्या काळात या संकटाला सामोरं जाईल याची कोणालाही कल्पना आली नाही. पुढच्या भागात पाहू या, हा सत्तासंघर्ष नेमका कसा चालतो, माद्या आपल्या पिलांचं संरक्षण कसं करतात ते.. sanjay.karkare@gmail.com