शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
3
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
5
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
6
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
7
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
8
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
9
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
10
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
11
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
12
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
13
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
14
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
15
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
16
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
17
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
18
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
19
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
20
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!

दौरा छान, पण अंतस्थ नाराजी उजागर

By किरण अग्रवाल | Published: October 08, 2023 11:34 AM

Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटील नुकतेच अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले.

-  किरण अग्रवाल 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्याही दंड बैठका सुरू झाल्या आहेत; मात्र ही तयारी दिसून येतानाच पक्षांतर्गत नाराजीचेही जे उमाळे येताना दिसत आहेत त्याची योग्य दखल घेणे या पक्षासाठीच कसोटीचे ठरले तर आश्चर्य वाटू नये.

प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या मनासारखी होत नसते, राजकारणात तर ते मुळीच शक्य होत नाही. हल्लीच्या ''ट्रिपल इंजिन'' राजकीय फार्म्युल्यात तर प्रत्येक कार्यकर्ता टिकवून ठेवणे गरजेचे बनले आहे, अशात आपसातील मतभेद उघडपणे समोर येणार असतील तर ते चर्चेचा विषय बनणारच. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या पश्चिम वऱ्हाडातील दौऱ्याप्रसंगीही तेच झालेले बघावयास मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते दिलीप वळसे पाटील नुकतेच अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. योगायोग असा की, ते या परिसरात दौऱ्यावर असतानाच बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी त्यांची निवड झाल्याची बातमी येऊन धडकली; त्यामुळे शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी बुलढाण्यात नवीन जबाबदारीचा श्रीगणेशाही केला. मंत्रिपदाच्या प्रदीर्घ वाटचालीचा त्यांना असलेला अनुभव पाहता बुलढाणा जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढून जाणे स्वाभाविक आहे. त्यातून आपसूकच पक्ष विस्ताराचाही लाभ होणे अपेक्षित आहे. विशेषत: शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार व आमदार असलेल्या बुलढाण्याचे पालकमंत्रिपद त्यांना लाभल्याने स्थानिक नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे बळ वाढण्याची संधी उपलब्ध झाली आहे, परंतु हे होत असताना याच दौऱ्यात अकोला व वाशिममध्ये जे काही प्रकार घडून आलेत त्यामुळे काहीशा शंका उपस्थित होणे क्रमप्राप्त ठरावे.

अकोला येथे बैठकीप्रसंगी शिवा मोहोड यांच्या नियुक्तीवरून पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अमोल मिटकरी यांची नाराजी उघडपणे दिसून आली. यामागे व्यक्तिगत पातळीवर केल्या गेलेल्या आरोपांचे 'कारण' असले तरी, या नाराजीचे उघड प्रदर्शन झाले. पक्षातील नियुक्त्या करताना विश्वासात घेण्याचा मुद्दा यावेळी उच्चारला गेला, परंतु हल्ली राजकारणात व्यक्ती व निष्ठांवर विश्वास राहिला नसताना नियुक्त्यांच्यावेळी कुणाकुणाला विश्वासात घेतले जाणार? बरे, जिथे नेते व कार्यकर्त्यांची गर्दी ओसंडून वाहते आहे तेथे माणसं निवडून येणे एकवेळ समजता यावे; पण मुळात कार्यकर्त्यांची वानवा असतानाही व्यक्ती तावून-सुलाखून घ्यायची तर कुणाचीही अडचणच होणार !

अकोला जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव विधान परिषद सदस्य मिटकरी अजित पवार गटाकडे गेले असले तरी, जिल्ह्यातील राष्ट्रवादीची मोठी व मान्यवर म्हणवणारी फळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच पाठीशी आहे. सत्तेच्या 'ट्रायसिकल' मधील सोबती भाजपा व शिवसेना (शिंदे गट) काहीशा वरचढ स्थितीत असताना राष्ट्रवादी (अजित पवार)ला अकोल्यात आपले अस्तित्व उभे करायचे तर एकेक कार्यकर्ता जोडावा लागणार आहे. याचा अर्थ स्व पक्षाच्याच नेत्यांची उणीदुणी काढून एकप्रकारे पक्षाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का, असेही नाही; मात्र या संबंधातील मतभिन्नता अगर नाराजी जाहीर करून पुन्हा पक्षासाठीच अडचणीचे काही ठरेल असेही होणे योग्य नाही. तुम्हाला भांडायचेच असेल तर आम्हाला बाहेरून का बोलाविले, असे वरिष्ठ नेत्यांना उद्वेगाने म्हणण्याची वेळ त्यामुळेच आली.

वाशिम येथेही दिलीप वळसे पाटील यांच्या आढावा बैठकीप्रसंगी पक्षातील मातब्बर म्हणवणाऱ्या एका गटाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवणारी ठरली. या जिल्ह्यात ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे व त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी घेतलेली मेहनत कुणापासून लपून राहिलेली नाही. पक्षात दोन गट झाल्यावर ठाकरे यांनी अजित दादांचे बोट धरले, मात्र नव्या गटाचे जिल्हाध्यक्ष नेमताना युसूफ पुंजाणी यांना संधी दिली गेली तेव्हापासून अंतर्गत गणित काहीसे बिघडल्याची वदंता आहे. वळसे पाटील यांच्या आढावा बैठकीतील ठाकरे यांच्या अनुपस्थितीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले जाणे गैर ठरू नये. वाशिममध्ये पक्षीय दबदबा निर्माण करण्यात आजवर राष्ट्रवादी यशस्वी ठरली असताना वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीच्या निमित्ताने सुप्त नाराजी उजागर होणे बरेच काही सांगून जाणारे व विरोधकांसाठी समाधानाचेच ठरावे.

सारांशात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पश्चिम वऱ्हाडात केलेल्या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या तयारीनेही वेग घेतल्याचे म्हणता यावे, पण सोबतच अकोला व वाशिममध्ये जे पक्षांतर्गत नाराजीचे प्रत्यंतर आले, ते पाहता पक्षाची स्थिती सुधारताना नेत्यांची मनस्थिती सुधारण्याचेही आव्हान या पक्षासमोर आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस