गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा विडा उचललेल्या संघ-भाजपाच्या लोकांची मने भूतदया आणि प्राणीप्रेमाने ओतप्रोत असणार हा तमाम जनतेचा समज एका क्षणात उत्तराखंडमधील मसूरीचे आमदार गणेश जोशी यांनी दूर करुन टाकला आहे. पोलिसांच्या फौजेत समाविष्ट असणाऱ्या शक्तिमान नावाच्या एका श्वेतवर्णी अश्वावर हल्ला करुन त्याचा एक पाय मोडला म्हणून सदर आमदार आणि त्याच्या सवंगड्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही सजीव प्राण्याला क्रूर वागणूक देणे हा कायद्यान्वये गुन्हा असून संबंधित कायदा मंजूर करुन घेण्यात आणि प्राण्यांचा होणारा छळ रोखण्यात ज्यांचा पूर्वीपासून मोठा सहभाग होता व ज्या आता मोदी सरकारमध्ये एक मंत्री आहेत त्या मेनका गांधी यांनीही जोशी यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या राजवटीच्या विरोधात निघालेला मोर्चा जेव्हां पोलिसांनी अडवला तेव्हां गणेश जोशी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे मोर्चेकरी संतप्त झाले. पोलिसांचे कडे तोडून त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हां जोशी यांचे म्हणे शक्तिमानकडे लक्ष गेले आणि पोलिसांवरील राग त्यांनी पोलिसांच्याच त्या अश्वावर काढला. त्याला छडीने बेदम झोडपून काढले व त्यात शक्तिमानचा एक पाय फ्रॅक्चरही झाला. स्वत: गणेश जोशी राजकारणात येण्यापूर्वी सुरक्षा दलात नोकरी करीत होते. याचा अर्थ सुरक्षा दलांमधील विविध प्रशिक्षित प्राण्यांचे मोल ते जाणून होते. किमान तशी अपेक्षा करायला तरी हरकत नाही. परंतु तसे असताना त्यांनी जे क्रौर्य दाखविले ते त्यांच्यावर झालेल्या सर्वच प्रकारच्या संस्कारांचे फोलपण उघड करणारे ठरले. स्वत: जोशी यांनी मात्र अपेक्षेप्रमाणे आपण निर्दोष असल्याचा दावा केला असला तरी त्यांनी ज्या पद्धतीने शक्तिमानचा पाय मोडला तसाच त्यांचाही पाय मोडणाऱ्याला कोणा अचरटाने इनाम जाहीर केले आहे!
हे यांचे प्राणीप्रेम!
By admin | Published: March 18, 2016 3:53 AM