- प्रा. डॉ. अभय चौधरी माजी संचालक हाफकिन, मुंबई.माजी अध्यक्ष राज्य अँटिबायोटिक्स कमिटी.अॅन्टीबायोटिक रेझिस्टन्स हा २0१९ या वर्षात जागतिक आरोग्यासाठी सगळ्यात मोठा धोका असेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. गेली काही वर्षे याबाबतीत वरचेवर चर्चा होऊनही अॅन्टीबायोटिकचा बेबंद वापर होतच राहिला व त्यामुळे ती निष्प्रभ होत चालली. असेच होत राहिले तर आपण परत अॅन्टीबायोटिकांचा शोध लागण्यापूर्वीच्या असाहाय्य अवस्थेत पोहोचू. नियंत्रणासाठी अॅन्टीबायोटिक नाहीत अशी भयावह स्थिती होऊ शकते.आॅर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोआॅपरेशन आणि डेव्हलपमेंट, फ्रान्स या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नोव्हेंबर २॰१८ च्या अहवालानुसार मल्टिड्रग रेझिस्टंट जंतूंच्या संसर्गाचा दर प्रगत राष्ट्रांमध्ये १७ टक्के आहे, परंतु हाच दर प्रगतशील देशांमध्ये (भारत, चीन इत्यादी) ४0 टक्केआहे. जागतिक पातळीवर रुग्णालयीन सूक्ष्म जंतू संक्रमणाचा (हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन) दर ८ टक्के मान्य केला गेला आहे. एस.जी.पी.जी.आय. या नामांकित संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील एम्स, न्यू दिल्ली, एस.जी.पी.जी.आय., लखनऊ, उत्तर प्रदेश या दोन्ही रुग्णालयांत हेच प्रमाण २0 टक्के आहे. उत्तर प्रदेशातील सरकारी हॉस्पिटल्समध्ये हेच प्रमाण ४0 टक्के आहे. याचा अर्थ साधारणपणे १00 पैकी ४0 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये संक्रमण होते. रुग्ण उपचारासाठी येतो एका आजारामुळे व दगावतो दुसऱ्या आजारामुळे.यात रुग्णालयात होणारे इन्फेक्शन हे महत्त्वाचे कारण असते.अॅन्टीबायोटिक रेझिस्टन्सचा धोका कमी करण्यासाठी त्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. तसेच इस्पितळात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नीट न केल्यास जंतूंचा प्रादुर्भाव व प्रसार होतो. याचबरोबर रुग्णांना ‘हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन’ला सामोरे जावे लागते. आरोग्य सेवेतील संक्रमण ही अत्यंत महत्त्वाची व सर्वदूर आघात करून परिणाम करणारी समस्या आहे. जंतूंवर प्रतिजैविकांचा परिणाम कमी होतो अथवा ‘अॅन्टीबायोटिक रेझिस्टन्स’ वाढते. पर्यायाने रुग्णालयीन खर्चातही प्रचंड प्रमाणात वाढ होते. रुग्णसेवेचा कालावधी वाढल्यामुळे इतर गरजू रुग्णांना सेवेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. अॅन्टीबायोटिक्सचा अतिरिक्त तसेच अवाजवी वापर वाढीस लागतो.‘अॅन्टीबायोटिक रेझिस्टन्स’ व ‘हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन’ या दोन्ही समस्या भारतातील रुग्णालयांना भेडसावत आहेत. रुग्णालयांत येणाºया अॅन्टीबायोटिक रेझिस्टंट जीवाणूची लागण झालेल्या रुग्णांपासून इतर रुग्णांना त्यांचा प्रसार होतो आणि ते जीवघेणेसुद्धा ठरू शकते. म्हणूनच रुग्णालयांत संक्रमणांचे नियंत्रण व प्रतिबंध अत्यंत आवश्यक आहेच, तसेच हा रुग्णसुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा घटकदेखील आहे. जंतूसंक्रमण नियंत्रण व प्रतिबंध हा केवळ रुग्णसेवेसाठी एक प्रतिसाद न राहता अत्यावश्यक वैद्यकीय रुग्णसेवेसाठी अत्यंत मूलभूत बाब आहे. काही विकसित देशांमध्ये जर एखाद्या मेडिकल इन्शुरन्स असलेल्या रुग्णाला हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन झाले तर त्याच्यामुळे होणाºया जादा खर्चाची नुकसानभरपाई रुग्णालयास करावी लागते.जंतूसंक्रमणासाठी जबाबदार असणाºया वस्तू अथवा उपकरणे रुग्णांच्या शरीरात प्रवेश करतात त्या वस्तू जंतूविरहित न केल्यास गंभीर जंतूसंक्रमण होण्याची शक्यता असते. अशा वस्तूंना ‘क्रिटिकल’ समजण्यात येते. त्यांचे वापरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणे, कॅथेटर्स, इम्प्लांट्स आदींचा यात समावेश होतो. सेमीक्रिटिकल वस्तू रुग्णाच्या शरीराच्या त्वचा व आवरणांच्या संपर्कात येणाºया वस्तू असतात. भूल देण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे या प्रकारात येतात, त्यांचेही उच्च दर्जाचे जंतूनिर्मूलन करणे गरजेचे असते. नॉन क्रिटिकल या प्रकारात वस्तू रुग्णाच्या केवळ त्वचेच्या संपर्कात येतात.वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन व सी.डी.सी., अॅटलांटा अशा जागतिक संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार रुग्णालयात होणारा ८॰ टक्के जंतूप्रसार हा हातांच्यामार्फत होतो असे सिद्ध झाले आहे. अॅन्टीबायोटिक रेझिस्टन्सच्या लढाईत हॅन्ड हायजिन हा सर्वोत्तम बचाव आहे, कारण तो तुमच्याच हातात आहे. या आॅर्गनायझेशनने सर्व देशांना आवाहन केले आहे की, हातांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण (हॅन्डहायजिन) हे आरोग्यसेवेचे (प्राथमिक ते सुपरस्पेशालिस्ट) अविभाज्य घटक आहेत आणि हॅन्डहायजिनच्या प्रभावशाली मार्गाने जंतुसंसर्ग रोखणे सहज शक्य आहे. शस्त्रक्रियेपूर्वी, दरम्यान व नंतर जखमेची काळजी घेऊन इन्फेक्शन होऊ न देणे हे रुग्णसुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.या पार्श्वभूमीवर हल्ली बºयाच रुग्णालयांमधून हाऊसकिपिंग व स्वच्छतेची कंत्राटे दिली जातात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रुग्णालयीन व स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली. परंतु, या सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे. हॉस्पिटलच्या इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉलप्रमाणे जंतूनाशकांची निवड, दर्जा व त्यांच्या वापरण्याच्या पद्धती यांचे योग्य प्रकारे ट्रेनिंग देणे अपरिहार्य असायला हवे. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारी रसायनेही उत्तम दर्जाची, अत्याधुनिक, सुरक्षित असली तरच निर्जंतुकीकरण प्रभावी होईल, अन्यथा इस्पितळे ही आरोग्यसेवा देणारी ठिकाणे न राहता रोगांची उगमस्थाने होतील.
...तर हॉस्पिटल्स रोगांची उगमस्थाने होतील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 1:48 AM