कोरोनाच्या भीतीमुळे जागतिक पातळीवर स्थलांतर वाढल्याने त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला. चीनमध्ये अनेक कारखाने बंद पडले. चिनी बनावटीच्या सुट्या मालावर अवलंबून असलेल्या उद्योगांना फटका बसला. प्लेगच्या साथीने गावेच्या गावे ओस पडायची. पिढी गारद व्हायची. या कथा आपण पुस्तकांतून वाचल्या. शंभर वर्षांपूर्वीच्या या संकटाचे वर्णन आपल्याला साहित्यातून वाचायला मिळते. स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांविरुद्धच्या असंतोषाचे कारण ही साथ झाली होती. दरम्यानच्या काळात आपण संशोधनाच्या जोरावर प्लेग जगातून हद्दपार केला. त्याचप्रमाणे देवी, कॉलरा, डेंग्यू अशा साथींवर नियंत्रण मिळविले.दोन महिन्यांपूर्वी चीनमध्ये अवतरलेल्या कोरोनानामक विषाणूने आता जगभर धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला आहे. चीनच्या एका प्रांतापुरत्या मर्यादित असलेल्या या विषाणूने आता अवघ्या जगाला विळखा घालण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याची मर्यादा केवळ जीवितहानीपुरती मर्यादित नाही, तर अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला हलवण्याचे सामर्थ्य त्यात दिसते. गेल्या शुक्रवारी जागतिक शेअर बाजारात आठवड्याचे व्यवहार बंद होताना याची प्रचीती आली. साथी व भीतीमुळे जागतिक पातळीवर स्थलांतर वाढल्याने त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला. चीनमध्ये तर अनेक कारखाने बंद पडले. उत्पादन थांबले आणि निर्यात रोडावली. चिनी बनावटीच्या सुट्या मालावर अवलंबून असलेल्या उद्योगांना याचा फटका बसला. वाहन, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स आदी उद्योगांवर याचे परिणाम लवकरच दिसून येतील. त्याचप्रमाणे औषध उद्योगावरही ते दिसतील. चीनमधून याचा घाऊक माल येतो. त्यात खंड पडण्यास सुरुवात झाली आणि जागतिक उद्योगाला हा मोठा धोका आहे. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी आखडता हात घेतला. ही घसरण येथेच थांबली नाही, तर तब्बल सहा महिन्यांनंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाची पत घसरली.१ मार्चपासून जहाजाद्वारे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर बंदी आणल्यामुळे भारतातील वाहन उद्योगाला याचा फटका बसणार. कारण येथे तयार होणाऱ्या वाहनांचे २७ टक्के सुटे भाग चीनमधून आयात केले जातात. त्यातच भारतातील वाहन उद्योग संक्रमणातून जात आहे. बीएस-६ या नव्या प्रणालीची वाहने पुढील महिन्यापासून बाजारात येणार असल्याने त्याच्या पुरवठ्यावर परिणाम होईल आणि उत्पादनाची गती मंद होईल. मागणी व पुरवठ्यात अंतर येणार. उत्पादनावर मर्यादा म्हणजे बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम. हवाई सेवेद्वारे सुटे भाग आणले, तर ते तुलनेने महाग पडतील आणि त्याचा थेट परिणाम किमतीवर होईल. या सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाºया आहेत आणि आधीच ती बाळसेदार नाही.गेल्या दोन वर्षांत उत्पादन आणि उत्पन्न या दोन आघाड्यांवर सातत्याने आपली घसरण होत असून, त्याचा परिणाम रोजगारावर झाला आणि बाजारपेठेतही मालाला उठाव नाही. अशा परिस्थितीत हे कोरोना व्हायरसचे संकट उद्भवले. भारतासारख्या दाट लोकसंख्या असणाºया देशाला कोरोनाचा धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोरोना व्हायरसने चीन, दक्षिण कोरिया ते युरोप, अमेरिकेपर्यंत आपले अस्तित्व दाखविले. ३९ देशांमध्ये ३,३४६ रुग्ण आजपर्यंत आढळले. एकट्या चीनमध्ये ७८ हजार ४९७ रुग्ण आणि मृतांचा अधिकृत आकडा हा २ हजार ७४४ आहे. दक्षिण कोरियाप्रमाणे इराणमध्येही ही साथ वेगाने पसरली. आशिया, मध्यपूर्व, आफ्रिका, युरोप, अमेरिका असा हा व्हायरस वेगाने पसरत असून, यातून जागतिक धोका निर्माण होतो की काय, याची चिंता जागतिक आरोग्य संघटनेला लागली आहे. जपानमध्ये ७०० जणांना लागण झाल्याने तेथे शाळा बेमुदत बंद केल्या. अशी धास्ती निर्माण करणारी परिस्थिती जगभरात निर्माण होत असून, अजून या आजारावर रामबाण औषध सापडलेले नाही. केरळमध्ये संशयिताचा मृत्यू झाला; पण सरकार अजून तेवढे सावध नाही. त्यात आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अनास्था, सार्वजनिक स्वच्छतेविषयी जागरूकता आणि दाटीवाटीची लोकसंख्या, याचा विचार केला, तर भारताला मिळालेला इशारा हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. परदेशात मानवी जीवाचे जेवढे महत्त्व आहे, तसे भारतात नाही. म्हणूनच या साथीचा जगापेक्षा आपल्यालाच मोठा धोका आहे.
...तर भारताला मिळालेला हा इशारा दुर्लक्ष करण्यासारखा नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 5:22 AM