मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ती उभी होती. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे. ती दररोज येऊन उभी राहते म्हणून सुरक्षारक्षक तिला हुसकावून लावत होते. तेवढ्यात मंत्रिमहोदयांची मोटार आली. त्यांची नजर अचानक तिच्याकडे गेली. कविवर्य कुसुमाग्रजांना दिसलेली हीच तर ती ‘माय मराठी’. मंत्र्यांनी पटकन तिला मोटारीत बसवले आणि आपल्या दालनातील कॉन्फरन्स रूममध्ये नेले. पटापट अधिकारी गोळा झाले. मराठी भाषा विद्यापीठाकरिता सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचे चकचकीत प्रेझेंटेशन सचिवांनी केले. डोक्यावरील सोनेरी मुकुट टेबलावर काढून ठेवत मराठी खिन्न हसली. तिने विचारले, ‘राज्यातील १४ विद्यापीठांत मराठी विभाग आहेत. तेथील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरल्या जातात का? मुंबईत आता मराठी माणूस संग्रहालयात ठेवायची वेळ आलीय पण अगदी कोल्हापूर, नागपूरच्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा, साहित्य यांचे अध्ययन करण्यात किती जणांना रुची आहे?’- मराठीच्या प्रश्नावर मंत्री गडबडले. थातूरमातूर खुलासा करू लागले. मराठीने त्यांना थांबवले आणि म्हणाली, वर्ध्याला हिंदी भाषेचे तर रामटेकला संस्कृत भाषेचे विद्यापीठ सुरू केलेत, तिथे तरी विद्यार्थी आहेत का?
महाकवी कालिदासाने मेघदूत लिहिले म्हणून तुम्ही रामटेकला त्यांच्या नावे संस्कृत विद्यापीठ सुरू केले. परंतु मुंबई, पुण्यातील एखादा विद्यार्थी रामटेकसारख्या दूर ठिकाणी संस्कृत शिकायला कशाला जाईल? तीच गत हिंदी विद्यापीठाची नाही का? सुरुवातीला येथे काही प्रमाणात प्रतिसाद लाभला. मात्र आता येथे किती जण शिकायला येतात?’- मराठीच्या रोखठोक सवालांनी कॉन्फरन्स रूममध्ये अस्वस्थता पसरली. मराठी बोलतच होती, ‘‘नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात तुकडोजी महाराजांच्या नावाने अध्यासन सुरू केले. त्याला किती प्रतिसाद लाभला? मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू करायचे होते तर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे करायला हवे होते. अमरावती येथील रिद्धपूरपेक्षा तेच उचित स्थान आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या अगोदर अंबेजोगाईच्या मुकुंदराजांनी शंकराचार्यांच्या वेदातांवर निरूपण करणारा ‘विवेकसिंधू’ हा मराठीतील आद्य ग्रंथ लिहिला. मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळा चरित्र’ श्रीक्षेत्र रिद्धपूरलाच लिहिला गेला. परंतु, रिद्धपूर आडवळणाला आहे. विदर्भाचा सांस्कृतिक अनुशेष भरून काढायचा असल्याने विदर्भातच मराठी भाषा विद्यापीठ सुरू करायचे असेल तर नागपूरपासून जवळच असलेल्या अंभोऱ्यात पाच नद्यांच्या संगमाच्या ठिकाणीही हे विद्यापीठ उभे करता येऊ शकते.
मुकुंदराजांनी ‘विवेकसिंधू’ अंभोऱ्यातच लिहिला. परंतु कदाचित मराठीच्या झोळीत विद्यापीठाचे दान टाकताना महानुभाव पंथीयांची व्होटबँक काबीज करणे हाही तुमचा विचार असू शकेल!... मुंबईत मराठी भाषेकरिता राजकारण केलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाची कोंडी करण्याकरिताही निवडणुकीच्या तोंडावर आता तुम्हाला मराठी विद्यापीठाचा रामबाण सोडावासा वाटला असेल नाही का? मराठी भाषा हे खाते तसे काही मलईदार नाही. नेते आणि पत्रकार यांचा हाच सध्या प्रिय शब्द नाही का? अशा कोरडवाहू जमिनीतून पीक काढायचे तर कष्ट करावेच लागणार. विद्यापीठ सुरू करायचे म्हटले की, मग जमीन खरेदी आली. बांधकाम, फर्निचर, शैक्षणिक साहित्य, ग्रंथ खरेदीची वगैरे कंत्राटे देणे आले. शिक्षक, प्राध्यापकांच्या नियुक्त्या आल्या. विद्यापीठ सुरू झाल्यावर तेथे विद्या ग्रहणाकरिता विद्यार्थी येवो न येवो, पण खात्याचे बजेट खर्च होणार, कंत्राटदारांना संधी मिळणार आणि कुणाच्या पोटात का होईना पीठ - सॉरी सॉरी मलई जाणार”- एवढे बोलून मराठीने हास्याचा गडगडाट केला. मराठीच्या समोर वृत्तपत्र होते.
विद्यापीठ निर्मितीकरिता समिती स्थापन केल्याची बातमी ठळक अक्षरात प्रसिद्ध झाली होती. समितीमधील सदस्यांची नावे वाचून मराठी छद्मी हसली. काही लेखक, समीक्षकही राजकारण्यांसारखे समितीच्या सत्तेची, बैठकांच्या भत्त्यांची, मोटारींची ऊब असल्याखेरीज बहुधा जगू शकत नाहीत. या लेखक, समीक्षकांचेही वैचारिक कंपू झाले आहेत. त्यांच्या विचारांची सरकारे आल्यावर त्यांच्याच कंपूच्या खिशात सरकारी समित्या, पुरस्कार जातात. सहा जणांच्या समितीत चार शासकीय सदस्य नेमल्याने काही साहित्यिकांनी फोडलेल्या डरकाळीनेही मराठीच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. “मराठी भाषिकांच्या एकाच राज्यात समित्या नेमताना प्रादेशिक समतोल राखला नाही तरीही अशा डरकाळ्या फोडल्या जातात, याचा विसर पडू देऊ नका बरं का?”- असे म्हणत मराठी उठली, तिने मुकुट डोक्यावर ठेवला आणि तडक बाहेर पडली...