बरे-वाईट, अनुकूल-प्रतिकूल असे काहीही असो; हरेक बाबतीत प्रत्येकाचेच काहीना काही मत असते. त्याबद्दल कुणाची हरकत असण्याचेही कारण नाही. परंतु प्रत्येक बाबतीतले आपले मत जाहीरपणे प्रदर्षित करण्याची गरज नसताना जेव्हा तसे केले जाते व वाद अंगावर ओढून घेतले जातात तेव्हा प्रसिद्धीचा स्टंट म्हणून त्याकडे बघितले जाणे स्वाभाविक असते. विशेषत: सोशल मीडियाचा सुळसुळाट झाल्याच्या आजच्या काळात तर अनेकांना कशाच्याही बाबतीतली आपली मते चावडीवर मांडण्याची जणू घाईच झालेली दिसून येते. घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे हे खरे, परंतु याचा अर्थ कुणाची मने दुखावतील अथवा भावनांना ठेस पोहोचेल, अशी मते मांडण्याचे परवाने दिलेले नाहीत. मात्र, त्याचे भान बाळगले जात नाही. अर्थातच कसेही करून प्रसिद्धीचा झोत आपल्या अंगावर राहील याची काळजी घेण्याचा हेतू त्यामागे असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. या मालिकेत जी अनेक नावे घेता येणारी आहेत त्यात अभिनेते ऋषी कपूर यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. आपल्या अभिनयासाठी ते जसे वा जितके ख्यातनाम आहेत तसे वा तितकेच हल्ली ते त्यांच्या टिवटिवाटमुळेही प्रसिद्धी मिळवत असतात. पण ‘फालोअर्स’ टिकवून ठेवण्याच्या नादात त्यांच्यासारखे सेलिब्रिटीही जेव्हा विवेक गहाण ठेवून बेताल बडबडून जातात किंवा एखादे छायाचित्र प्रसारित करून बसतात, तेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याखेरीज राहत नाहीत. ऋषी कपूर यांच्यावर तशीच वेळ ओढविली आहे. एका लहान मुलाचा विवस्त्र फोटो टिष्ट्वट केल्याने जय हो फाउंडेशन या संस्थेने त्यांच्या विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नंतर कपूर यांनी ही पोस्ट हटविली खरी, परंतु कपूर यांचे २५ लाखांहून अधिक टिष्ट्वट फालोअर्स असल्याने त्यात सदरचे अश्लील छायाचित्र प्रसारित झाले त्यामुळे त्यांच्या विरोधात ‘पॉस्को’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत आहे. मागेही मुंबईतील बांद्रा-वरळी सी लिंकच्या नावावरून असेच वादग्रस्त टिष्ट्वट करताना व काँग्रेस तसेच गांधी घराण्यावर टिप्पणी करताना ‘बाप का माल समझ रखा था’ अशा आशयाचे तारे या कपूर महाशयाने तोडल्याने वादाला सामोरे जावे लागले होते. क्रिकेट सामन्यासंबंधी पाकिस्तानचे अभिनंदन ते मांसाहारावरही मत प्रदर्शित करण्यापर्यंतचा त्यांचा आजवरचा टिवटिवाट पाहता वाद ओढवून घ्यायला त्यांना आवडते, असाच अर्थ काढता यावा. त्यामुळे कपूर यांच्या या साºया उपद्व्यापांकडे बेतालपणा म्हणूनच पाहता यावे.
सोशल मीडियाचा सुळसुळाट , मने दुखावतील अथवा भावनांना ठेस पोहोचेल, अशी मते मांडण्याचे परवाने नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 4:01 AM