डॉ. सुभाष देसाई (ज्येष्ठ विचारवंत)ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाला बोलावले होते. पण संयोजकांनी त्यांचे तयार केलेले भाषण वाचले तेव्हा त्यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतही असेच एकदा घडले होते. पण एक गोष्ट चांगली झाली. मशालीची ज्योत खाली धरली तरी ती वरच उफाळली. या दोहोंचे विचार शतपटीने जनमानसामध्ये पसरले.कोल्हापूरमध्ये नयनतारा सहगल यांना निमंत्रित करावे आणि त्यांच्या मुक्त विचारांना अभिव्यक्त होऊ द्यावे म्हणून माझ्या मनात काही दिवसांपूर्वी विचार उमटला. काही पत्रकार मित्रांना हा विचार आवडला. आम्ही पाठपुरावा केला. पण त्या म्हणाल्या, ‘मला तेथे येणे आवडले असते, पण आता माझे वय ९१ वर्षे आहे. मी प्रकृतीच्या कारणाने कोल्हापूरला येऊ शकत नाही.’ या बोलण्यानंतर त्यांचा शेवटचा कार्यक्रम मुंबईत झाला. तो पूर्वनियोजित होता.१९७५ साली चाळीस वर्षांपूर्वीदेखील आजच्याच तडफेने नयनतारा सहगल कार्यरत होत्या. जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आणि लोकशाहीचा गळा दाबला जात होता तेव्हा त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात उडी घेतली होती. त्या वेळी त्या रस्त्यावर उतरल्या. त्यांनी तो लढा कोण आणि किती जवळच्या आप्ताविरुद्ध आहे याचा विचार केला नाही. या संघर्षानंतर आज त्यांनी चाळीस वर्षांनंतर त्याच मूल्यांसाठी संघर्ष चालू ठेवला आहे. फरक इतकाच आहे की आता हा संघर्ष त्या लेखणीद्वारे करत आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्या गेल्या वर्षी आणि या वर्षी प्रसिद्ध झाल्या - दी फेट आॅफ बटरफ्लाइज (२0१९) आणि व्हेन दी मून शाइन्स बाय दी डे (२0१८ ).पुन्हा एकदा लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला म्हटल्यावर त्यांनी साहित्यातला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार शासनाला परत केला. त्यांना अलीकडे या कादंबरीवरून कुणीतरी विचारले की, ‘फुलपाखरांचे भवितव्य ही आपली कादंबरी वास्तव परिस्थितीवर आहे की काल्पनिक?’ यावर त्यांनी स्पष्ट केले की, कोणतेही काल्पनिक कथानक लिहिताना त्यासाठी वास्तवाचा आधार घ्यावा लागतो. माझ्या अलीकडच्या दोन्ही कादंबऱ्या आज ज्या परिस्थितीतून देशाचा सर्वसामान्य नागरिक जात आहे, जगतो आहे त्याच्याशीच संबंधित आहेत. त्यातील काही उतारे मन अस्वस्थ करतात. कारण प्रत्यक्षात अतिशय धोकादायक आणि अस्वस्थ घटना आपल्याभोवती घडताहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच अशा रस्त्यावर आम्ही उभे आहोत आणि दिशाहीन झाल्यामुळे कोणत्या दिशेने मार्गक्रमणा करायची हेच सर्वसामान्याला समजेना झाले. ही स्थिती फक्त भारतातच आहे असे नाही. अमेरिका, रशियासारख्या प्रगत देशांतही आहे. तिथले साहित्यिक जेव्हा बंड करतात तेव्हा तेही संकटात येतात.आज आपला सांस्कृतिक वारसा संकटात आहे. संविधानातून मांडलेल्या मूल्यांची जर मोडतोड होत असेल तर त्याला साहित्यिकांच्या सह साऱ्यांनीच विरोध करायला हवा. मला याची कल्पना आहे की असा विरोध करणाºयांचे जीव घेतले जातात (महाराष्ट्रातील गोविंद पानसरे, दाभोलकर, कर्नाटकातले कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा संदर्भ या ठिकाणी आहे), पण त्या खुनामागच्या विचारसरणीचे नेते मौनच पाळतात. मुक्त विचारांची फुलपाखरे दिवसाढवळ्या ठार मारली जातात यासारखे देशाचे दुर्दैव कोणते? विविध विचारांची उधळण मुक्तपणे करत फिरणाºया आणि देशाचे सौंदर्य असणाºया फुलपाखरांचे आकाश हिरावून घेतले जात आहे. या देशाच्या सर्व धर्मांविषयी आदर बाळगणाºया, स्वातंत्र्याचा उद्घोष करणाºया राज्यघटनेचा विसर पडला आहे की नाही, हा प्रश्न फार गंभीर नव्हे. पण ही वैभवशाली परंपरा जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करणे म्हणजे मुक्त विचारांचा प्राणवायूच हिरावून घेणे होय. मग फुलपाखरे जिवंत कशी राहतील?प्रसिद्ध अभिनेता नसीरुद्दीन शहा यांनी देशातील मुस्लिमांना मिळणाºया असहिष्णू वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली. त्या वेळी नयनतारा सहगल अस्वस्थ झाल्या. जेव्हा काही मुसलमानांना ते गाईचे मांस वाहतूक करतात एवढ्या संशयावरून त्यांचा जीव घेतला जातो हेही भयानक आहे. नसीरुद्दीन शहा यांच्यावर तेव्हा काहींनी टीकेची झोड उठवली. मात्र एकही बॉलीवूडचा हरीचा लाल नसीरुद्दीन शहा यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला नाही. परिवर्तनाची अपेक्षा श्रीमंत आणि प्रसिद्धी पावलेल्या लोकांपेक्षा देशाच्या सर्वसामान्य नागरिकाकडून आहे. कारण त्याच्या तळपायाला आग लागल्याने तोच मूकनायक आता बोलू लागेल.
या मुक्त फुलपाखरांच्या अभिव्यक्तीला भवितव्य आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 2:06 AM