संपादकीय : ‘आझाद’ आहे, ‘गुलाम’ नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:45 AM2022-01-28T05:45:10+5:302022-01-28T05:46:25+5:30

आपल्याच पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्याला पद्मभूषण पुरस्कार मिळणार असेल तर जयराम रमेश यांच्या नाकाला एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?

There is 'azad', not 'slave'!, why jairam ramesh jealous on gulam nabi azad | संपादकीय : ‘आझाद’ आहे, ‘गुलाम’ नाही!

संपादकीय : ‘आझाद’ आहे, ‘गुलाम’ नाही!

Next

राजेंद्र दर्डा

प्रत्येक विषयाकडे राजकारणाच्याच चष्म्यातून पहायला हवे का? काही विषय हे नेहमीच राजकारणाच्या पलीकडे ठेवायला हवेत, याचे भान असू नये का? आपल्याच एका पक्ष सहकाऱ्याला पद्म पुरस्कार मिळाला, तर दुसऱ्याच्या नाकाला इतक्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? - हे मुद्दे उपस्थित करण्याचे कारण म्हणजे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार आणि त्यावर काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेली टीका!

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी त्यांना जाहीर झालेला पद्म पुरस्कार नाकारला आहे. त्यावर बोट ठेवत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी गुलाम नबी आझाद यांना मिळालेल्या पद्म पुरस्कारावर टिप्पणी केली. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ‘‘योग्यच केले, ते गुलाम नाहीत, तर आझाद राहू इच्छितात.’’ ही टिप्पणी अनाठायी तर आहेच, शिवाय पुरस्काराचाच अवमान करणारी आहे. शिवाय जयराम रमेश यांचे हे विधान आझाद यांच्या देशासाठीच्या आजवरच्या योगदानाचाही अपमान करणारे आहे. हे  संकुचित मानसिकतेचे द्योतक झाले.. पद्म पुरस्कार हा देशाने दिलेला सन्मान असतो. सरकार, राजकीय पक्ष वा कोण्या एका विचारधारेने दिलेला तो पुरस्कार नाही. आपल्या विरोधातील विचारधारेच्या सरकारने आपल्या पक्षाच्या नेत्याला दिलेला पुरस्कार स्वीकारणे ही कुणाला गुलामी वाटत असेल तर त्याचे वर्णन कूपमंडूकपणा या पलीकडे होऊ शकत नाही.

Padma Bhushan: Jairam swipe at Ghulam Nabi Azad widens rift in Congress | India News,The Indian Express

या देशाचे महान नेते अटलबिहारी वाजपेयी यांना १९९२ मध्ये पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आले तेव्हा काँग्रेसचे पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते. काँग्रेसशी टोकाचे वैचारिक मतभेद असूनही वाजपेयी यांनी पुरस्कार नाकारण्याची भूमिका घेतलेली नव्हती. असे अनेक दाखले आहेत. पद्म पुरस्कार हा देशाने दिलेला सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि तो राजकारणातीतच ठेवायला हवा. गुलाम नबी यांनी उद्या हा पुरस्कार स्वीकारला म्हणजे ते केंद्रातील विरोधी विचारांच्या सरकारच्या भूमिकेला, भाजपच्या विचारप्रणालीला पाठिंबा देण्यासारखे होईल, असा तर्क मांडणेही अजिबात योग्य होणार नाही. जम्मू-काश्मीरसारख्या अशांत राज्यात काँग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षापासून स्वत:ची राजकीय कारकीर्द सुरू करून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अशी पदे भूषविलेले गुलाम नबी आझाद यांचा राजकीय प्रवास हा वादातीत काँग्रेसनिष्ठेचा राहिलेला आहे. जम्मू-काश्मीरची अस्मिता टिकून राहावी यासाठी अत्यंत आग्रही भूमिका ते सातत्याने घेत आले; पण त्याचवेळी आपल्या आचारविचारातून देशविरोधी शक्तींना बळ मिळणार नाही याचे भानही त्यांनी नेहमीच राखले आहे. म्हणूनच काश्मीरमधील वादग्रस्त नेत्यांच्या यादीत ते कधीच आले नाहीत. टोकाचे वागून, बोलून राज्यातील अशांत वातावरण अधिक पेटविणाऱ्यांच्या नामावलीत ते कधीही नव्हते. उलटपक्षी अशा नेत्यांपासून दोन हात दूर राहणेच त्यांनी पसंत केले. 
गुलाम नबींचे महाराष्ट्राशी खास जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे. वाशिममधून ते खासदार होते, महाराष्ट्रातून राज्यसभेवरही निवडून गेले. राज्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्याशी आजही स्नेहाचे संबंध अन् संवाद आहेत. जातपात, धर्माच्या भिंतींपलीकडे जाऊन काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष विचार जपणारा आणि जगणारा हा नेता आहे आणि त्याचा अनुभव आपल्याकडच्या अनेक नेत्यांनी अनेकदा घेतलेला आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करून केंद्र सरकारने एका व्यक्तीबरोबर ते ज्या विचारांचा पुरस्कार करतात त्याचाही सन्मान केला आहे. विरोधी विचारधारेच्या व्यक्तीला सन्मानित करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतलेली असताना तितक्याच खिलाडूवृत्तीने हा पुरस्कार स्वीकारण्यातूनच असे पुरस्कार हे राजकारणापलीकडचे असतात, हे सिद्ध होणार आहे. गुलाम नबी आझाद यांचे प्रत्येकानेच अभिनंदन केले पाहिजे. 

Congress leader Ghulam Nabi Azad praises 'grounded' PM Narendra Modi- The New Indian Express

जयराम रमेश यांनी यापूर्वी घेतलेल्या भूमिकाही वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या होत्याच. गुलाम नबी आझाद यांच्याविषयीचा त्यांचा टिवटिवाट त्यांच्या वादग्रस्त विधानांची री ओढणाराच आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्याला त्याने केलेल्या कार्यासाठी पद्म पुरस्कार मिळणार असेल तर जयराम रमेश यांच्या नाकाला एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? जयराम रमेश हे बुद्धिमान आणि विचारी गृहस्थ आहेत, त्यांच्याकडून अविचाराची किंवा संकुचितपणाची अपेक्षा नाही. त्यांनी गुलाम नबी आझाद यांची खिल्ली उडवताना पद्म पुरस्कारासही हिणविले आहे. हे काँग्रेसच्या विचारसरणीला आणि परंपरेला धरून निश्चितच नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, माजी केंद्रीय विधी व न्याय मंत्री अश्वनी कुमार, अत्यंत हुशार नेते शशी थरूर या नेत्यांनी जयराम रमेश यांच्या टिवटिवाटावर सडकून टीका केली; हे उचितच झाले. संघ-भाजपच्या विचारांचा मुकाबला करण्यासाठी सदैव पुढे असलेले हे नेते आहेत; पण हा मुकाबला आणि पुरस्कार यांची त्यांनी गल्लत होऊ दिलेली नाही. आझाद यांनी पुरस्कार घ्यावा की घेऊ नये, यावरून काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या भूमिका अजूनही मांडल्या जातील कदाचित. वैचारिक मतभिन्नता ही बाब काँग्रेसमध्ये नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी (जी-२३) एक पत्र काँग्रेस नेतृत्वाला लिहिले होते, यात गुलाम नबी आझाद हेही एक होते म्हणून त्यांना काँग्रेसमध्ये टार्गेट केले जाते, हे योग्य नाही. 
गुलाम नबी आझाद यांनी हा सन्मानाचा पद्म पुरस्कार अजिबात नाकारू नये, उलट अभिमानाने स्वीकारावा. विचारांची लढाई विचारांनी होत राहील. देशाचे नागरी सन्मान नाकारणे हे त्या लढाईचे माध्यम ठरू शकत नाही. 

(लेखक महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि लोकमत वृत्त समुहाचे एडिटर इन चीफ आहेत) 

rjd@lokmat.com

Web Title: There is 'azad', not 'slave'!, why jairam ramesh jealous on gulam nabi azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.