हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे समर्थक आता अगदी सातव्या स्वर्गात आहेत. हिमाचल प्रदेशात त्यांच्या पक्षाने सत्ता मिळवली आहे. राज्यातल्या निवडणूक प्रचारात सोनिया किंवा राहुल गांधी न आल्याने त्या एकट्याच मुख्य प्रचारक होत्या. आपले सहकारी त्यांनी स्वतः निवडले. त्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राज्यसभेचे सदस्य खासदार राजीव शुक्ला, सचिन पायलट, भूपिंदरसिंह हुडा आणि इतर काहीजण होते. राजीव शुक्ला यांना विचारले गेले, ‘या विजयाचे श्रेय आपण प्रियांका गांधी वड्रा यांना देणार काय? तर ते तत्काळ उत्तरले, ‘अर्थातच. दुसरे कोणाला देणार?’ प्रियांका गांधी राजकारणात उतरल्यापासून मानाने मिरवता येईल, असे त्यांच्या बाबतीत काही घडले नव्हते. पंजाब, उत्तर प्रदेश येथे त्यांनी केलेल्या प्रयोगांना यश आले नाही; परंतु हिमाचलने त्यांना यश दाखवले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने लोकांच्या मनात थोडेफार अनुकूल मत तयार केले असले तरी खरी परीक्षा २३ आणि २४ साली होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत होणार आहे.
विरोधकांचे ऐक्य अजूनही दूरच१५ वर्षांच्या मोठ्या काळानंतर भाजपने दिल्ली महानगरपालिकेमधील सत्ता गमावली. हिमाचल प्रदेशही पक्षाच्या हातून निसटला़. अर्थात गुजरातमध्ये पक्षाने ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे जल्लोष साजरा होणे स्वाभाविक होते. दिल्लीमधील ‘आप’चा विजय आणि हिमाचलातील काँग्रेसचे यश यातून २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता दुरावली, ही भाजपच्या दृष्टीने जरा आनंदाची गोष्ट आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसद सभागृहातील समन्वयासाठी बोलावलेल्या बैठकीला तृणमूल काँग्रेस आणि ‘आप’चे सदस्य उपस्थित राहिले; परंतु इतर अनेक पक्ष आलेच नाहीत. त्यात बसपा, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, जेडीएस आणि इतर पक्षांचा समावेश होता. हे सर्वच पक्ष काँग्रेसची मतपेढी खात असल्यामुळे त्यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना तसा काहीच अर्थ नाही. एमआयएम हा पक्ष एकामागून एक राज्यात लक्षणीय संख्येने अल्पसंख्याकांची मते घेत सुटला आहे. आपने गुजरातमध्ये तेच केले. पक्षाला तेथे १३ टक्के मते मिळाली. सुमारे ३० जागांवर आपने काँग्रेसची मते खाल्ली. शक्य असेल तेथे काँग्रेसला संपवण्याची घाई आपला झाली आहे, असेच दिसते. हिमाचल प्रदेशमधील यशामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाला जरा बरे वाटेल. यातून विरोधकांचे ऐक्य स्वप्नवत राहण्याची शक्यता मात्र वाढली आहे. सोनिया-नितीश भेटराष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि सोनिया गांधी यांची १० जनपथ या ठिकाणी गुप्त बैठक झाली, असे आता समोर येत आहे. ही बंद दाराआडची बैठक नव्हतीच मुळी असेही कळते. पाच वर्षांनंतर अशी बैठक झाली आणि त्यासाठी नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला होता. २०१७ साली संयुक्त जनता दलाने राजदशी नाते तोडले आणि भाजपशी घरोबा केला. मिळालेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यादव यांनी सोनिया गांधींशी संपर्क साधला आणि अगदी अल्पकालीन सूचना देऊन अशी बैठक बोलावण्याची विनंती केली. सोनिया गांधी यांना कुठेतरी जायचे होते; पण रविवार होता तरी त्यांनी मान्य केले. असे सांगतात की, त्यांनी लालू आणि नितीश यांच्याशी केवळ १० मिनिटे संवाद साधला. कारण, त्यांना उशीर होत होता. नेत्यांचा पाहुणचारही त्यांनी केला; पण अल्पकाळात ही भेट घडवावी लागल्याने पाहुणचार नीटसा करता आला नाही, याबद्दल क्षमाही मागितली. २०१४ मध्ये नितीशकुमार यांना विरोधी पक्षांचे नेते म्हणून समोर यायचे असेल तर या दृष्टीने या बैठकीचा काहीच उपयोग झाला नाही. काँग्रेस आपला अवकाश त्यांच्यासाठी मोकळा करणार नाही, असा संदेश नितीशकुमार यांना यातून गेला.
भाजप लोकसभेला ६० नवे चेहरे उभे करणार२०२४ची लोकसभा निवडणूक आणि दहा राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची युद्धयंत्रणा कामाला लागली आहे. भाजप मुख्यालयातून आलेल्या बातम्यांनुसार पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी ६० ते ७० नवे उमेदवार देण्याचे ठरवलेले दिसते. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले सर्व नेते बाजूला केले जातील. त्यात काही केंद्रीय मंत्रीही असतील. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातील आमदार राजेश्वर सिंह यांना गाजियाबादमधून लोकसभेच्या तयारीला लागा, असे सांगण्यात आले आहे. जनरल व्ही. के. सिंग हे सध्या तेथे खासदार आहेत.
१५ पेक्षा जास्त खासदारांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. त्याचप्रमाणे कुलदीप बिष्णोई हे काँग्रेस सोडून भाजपत आले होते. २०२४ साली हिस्सारमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे. बिरजिंदर सिंह हे तेथे सध्या खासदार आहेत. गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मेहसाणातून उभे केले जाऊ शकते. अर्थातच विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार नाही. महाराष्ट्रातील जागा आणि नवे चेहरे निश्चित करण्यासाठी राज्यातल्या नेत्यांबरोबर बैठकामागून बैठका होत आहेत.