निर्भयतेसाठी खरेपणा, सचोटी आवश्यक आहे. निर्भयतेशिवाय अंगीकृत कार्यात प्रगती नाही. आपला आहार-विहार, पथ्य सांभाळणाऱ्याला तशी रोगाची काळजी करण्याचे कारण नाही. तशी सत्यनिष्ठाला भीतीच उरत नाही.तरि न घालुनि महापुरी।न घेणे बुडणेयाचि शिसासी।कां रोगुन गणिजे यरी।पथ्याचिया।। तैसा कर्मांकर्माचिया मोहरा। उठू नेदि अहंकारा।संसाराचा दरारा।सांडणे येणे।। (ज्ञाने १६, ६९-७०)ईश्वरनिष्ठाला ही सारी जीवसृष्टी, त्याच परमात्म तत्त्वाचा विस्तार भासत असल्याने तोदेखील निर्भयतेने वावरतो - नित्य प्रार्थना, उपासना करणाऱ्याला तो आपल्या उपास्याच्या रूपाने पाठीशी आहे किंवा माझ्यात असलेल्या ईश्वरी अंशाचा म्हणजे पर्यायाने माझाच हा विस्तार आहे, अशी त्याची भावना असते. भीती ही नेहमी दुसऱ्यापासून असते. मीच सर्वत्र व्यापलेला आहे. दुसरे त्याशिवाय नाही, ही भावना निर्भयतेचे अधिष्ठान आहे.आपल्या वाट्याला आलेली निहितकर्मे करणारा निर्भयतेचा उपासक ठरतो किंवा वरचा वैचारिक स्तर ज्यांनी गाठला आहे तो आत्मभावाने, निर्भयतेने संचार करीत असतो. आपल्या कर्तव्यपालनात कुठेही मी पणाचा भाव नसल्याने असा साधक संसारातील द्वंद्वांना सामोरे जाताना कुठलाही धाक बाळगत नाही.आपल्या कर्मप्रवृत्तीत अहंकाराला प्रवेशू न देता, जे झाले, घडले ते त्याच्या इच्छेने झाले असे समजून कर्मफलाच्या परिणामापासून तो भयभीत होत नाही. सर्वांविषयी आत्मभाव निर्माण होणे ही साधना कठीण असली तरी निर्भयतेसाठी ती आवश्यक आहे. विश्वातील परम सत्य एक ईश्वरी सत्ताच आहे. ही जाणीव असणे- नित्य असणे - आवश्यक आहे. निर्भयतेशिवाय संसार दु:खाला सोडविणारे अन्य औषध नाही. सदाचार, ईश्वरनिष्ठा, संतांची कृपा आणि नित्य प्रार्थना यातून आघाडीवर असलेल्या या गुणविशेषाची, अभय साधनेची सुरुवात होते. आपल्या प्रत्येक व्यवहारात खरेपणा किंवा सचोटी राखणे हे या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
निर्भयतेशिवाय प्रगती नाही
By admin | Published: February 13, 2015 12:12 AM