नागपूर मध्य भारताचे एज्युकेशनल हब होऊ पाहात आहे. आयआयएम, ट्रीपल-आयटी, एम्स, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, सिम्बॉयसिस, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था नागपुरात येऊ घातल्या आहेत. यातील काही सुरुही झाल्या आहेत. मात्र देशात विकसित केल्या जाणा-या २० जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या पात्रता यादीत विदर्भातील एकाही विद्यापीठाचा नंबर लागला नाही. ‘वर्ल्ड क्लास’ विद्यापीठासाठी लागणा-या निकषात येथील आठ शासकीय आणि एक अभिमत यापैकी एकही विद्यापीठात बसत नसल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांच्याकडून याबाबतचा प्रस्ताव मागितला नाही. त्यामुळे वर्ल्ड होण्यासाठी नेमके काय करावे लागते भाऊ, असा वैदर्भीय सवाल येथील विद्यापीठांच्या कट्ट्यावर गमतीने विचारला जात आहे. मुळात जिथे ‘क्लास’ (नियमित वर्ग) होत नाही. प्राध्यापक विद्यादान करण्याऐवजी राजकारणात जास्त सक्रिय असतात. जिथे पीएचडी केवळ फॅशन आणि नावापुढे डॉक्टर लावण्यासाठी उपयोगात आणली जाते. केवळ वेतनवाढीसाठी तिचा उपयोग केला जातो अशा विद्यापीठांपासून आणि तिथे काम करणा-या प्राध्यापकांपासून ‘वर्ल्ड क्लास’च्या अपेक्षा करणे चुकीचेच होईल. ‘वर्ल्ड क्लास’ होण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन, अद्यावत शिक्षण पद्धती, हाऊसफुल्ल कॅम्पस आणि ज्ञानगंगेचा अविरत प्रवाह सुरू असावा लागतो. मात्र आमच्या विद्यापीठात आज हे होते का ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गत दोन वर्षांपासून विदर्भातील विद्यापीठांच्या कुलगुरू आणि प्राध्यापकांना हाच प्रश्न करीत आहेत. मात्र सारेच निरुत्तर आहेत. गत तीन वर्षांपासून नागपूर विद्यापीठातील कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. पदभरती रखडली आहे. कोहचाडे गेला तरी त्याचे अनुयायी अजूनही कायम आहेत. ते गुणवाढीचा वारसा चालवित आहेत. अशात वर्ल्ड क्लासच्या पात्रतेची अपेक्षा कशी करायची? हीच स्थिती देशमुखी थाटात वावरणाºया अमरावती विद्यापीठाची आहे. आदिवासींना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गडचिरोली विद्यापीठाला पदभरती घोटाळ्याचा डाग लागला आहे. जॅकने लागलेल्या प्राध्यापक आणि अघिकाºयांपासून गुणवत्तेची अपेक्षा करणे चुकीचे होईल. जे कृषी विद्यापीठ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अजूनही दहा कलमी कार्यक्रम देऊ शकले नाही, त्यांच्यापासून वर्ल्ड क्लासचा आग्रह कसा धरायचा? माफसू विदर्भात जागतिक धवलक्रांती करेल, असा ढोल वाजला. धवलक्रांती तर दूरच सातत्याने घटणाºया पशूंच्या संख्येवर ते तोडगा काढू शकले नाही.
जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या पात्रता यादीत विदर्भातील एकही विद्यापीठ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:19 AM