शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

म्हणे, नमाज आणि सूर्यनमस्कार एकच

By admin | Published: April 01, 2017 12:38 AM

कोणत्याही धर्माची व त्याच्या उपासनेची थट्टा वा त्याविषयीचे ‘अजाण’ म्हणविणारे वा दिसणारे वक्तव्य त्या धर्माच्या श्रद्धांना धक्का

कोणत्याही धर्माची व त्याच्या उपासनेची थट्टा वा त्याविषयीचे ‘अजाण’ म्हणविणारे वा दिसणारे वक्तव्य त्या धर्माच्या श्रद्धांना धक्का देणारे व त्याच्या अनुयायांचा संताप ओढवून घेणारे असते. स्वधर्माविषयीचे प्रेम बाळगणाऱ्यांची तर परधर्माच्या अशा श्रद्धांविषयीची याबाबतची जबाबदारी मोठी व अधिक गंभीर असते. त्यातून अशी बालिश वक्तव्ये करणारी माणसे सत्तापदावर असतील तर त्यांचे तसे वागणे एखाद्या दंगलीला प्रोत्साहन देणारेही ठरत असते. त्याचमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘सूर्यनमस्कार आणि नमाज या दोन्ही गोष्टी सारख्याच असून, त्यातून होणारी व्यायामाची कवायतही सारखीच असते’, असे जे अडाणी व पोरकट विधान केले ते त्यांच्या राज्यातील सगळ्या अल्पसंख्यकांना खोलवर दुखवून गेले आहे. सूर्यनमस्कार ही हिंदू धर्मातील उपासना आहे आणि ती सूर्यदेवाच्या नावाने केली जाते. त्या उपासनेत व्यायामासाठी लागणाऱ्या देहाच्या हालचाली आहेत. पण त्या शरीर कमावण्याएवढ्याच ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या आहेत. याउलट नमाज ही मुसलमान धर्माच्या ‘अल्लाह’ या एकमेव परमेश्वराची उपासना आहे. व्यायाम तीतही आहे. पण तिचे अंतिम पर्यवसान अल्लाहविषयीची आपली श्रद्धा त्याच्यापर्यंत पोहचविण्यात होणारे आहे. सूर्य हा अल्ला नाही. किंबहुना हिंदूंच्या सर्व देवदेवतांहून अल्लाहचे स्वरूप वेगळे आहे. शिवाय इस्लामच्या भूमिकेनुसार तो जगाचा एकमेव परमेश्वर आहे. त्यांची उपासनापद्धतीही आपल्या उपासनेहून वेगळी आहे. एखादा गांधी जेव्हा ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ असे म्हणतो तेव्हा तो या सगळ्या धर्म भावनांच्या पल्याड गेलेला असतो आणि त्याची जगभरच्या सर्व धर्मांच्या ईश्वरी रूपांबाबतची धारणा सारखी व श्रद्धेची असते. योगी आदित्यनाथ यासंदर्भात गांधीजींच्या आसपासही फिरकू शकणारे पुढारी नाहीत. त्यांनी नमाजाला सूर्यनमस्कारासोबत बसविणे याचा अर्थ उघड आहे. त्यांच्या मानसिकतेत सूर्यनमस्कार ही हिंदूंची धर्मोपासना मुसलमानांवर लादायची आहे. त्यासाठीच त्यांना अशा वक्तव्यांमधून एका संघर्ष स्पर्धेचा आरंभ करायचा आहे. खरे तर आपल्या धर्माविषयी एकारलेली श्रद्धा बाळगणाऱ्यांनी इतर धर्मांविषयी बोलणेच टाळायचे असते. कारण त्यातून द्वेष आणि तिरस्काराखेरीज काहीच प्रगट होत नाही. हिंदूंएवढीच ही बाब मुसलमान व अन्य धर्मांच्या प्रवचनकारांनीही नीट ध्यानात घेतली पाहिजे. सध्या आदित्यनाथांची व त्यांच्या पक्षाची देशात चलती असल्यामुळे त्यांचे म्हणणे खपून गेले. तरीही आझमखान या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने व माजी मंत्र्याने त्यावर आपली प्रतिक्रिया देताना ‘हे आदित्यनाथांनी म्हटले म्हणूनच खपले, हेच मी म्हटले असते तर सरकारने मला बेड्या घातल्या असत्या’ असे उद््गार काढले आहेत. कोणताही मुसलमान नमाज व सूर्यनमस्कार एक आहेत असे म्हणणार नाही. त्यांच्या धर्मोपासनेतील प्रत्येकच बाब हिंदूंहून वेगळी आहे. या दोन धर्माच्या लोकांमध्ये विश्वास व एकात्मता निर्माण करायची तर त्यांच्या उपासनापद्धतीवर हल्ले चढवून वा सूर्यनमस्काराची तुलना नमाजाशी करून चालणार नाही. त्यासाठी त्यांची मने एकत्र आणावी लागतील आणि त्याला लागणारे सामर्थ्य, प्रगल्भपण, उंची, धाडस, सहनशक्ती आणि तयारी आदित्यनाथांपाशी नाही. जे मुसलमान वा ख्रिश्चन धर्माची उपासनास्थळे जमीनदोस्त करण्यात पुढाकार घेतात वा तशा कृत्यांचे समर्थन करतात त्यांना याविषयी बोलण्याचा अधिकारही नसतो. आदित्यनाथांनाही तो नाही. मुसलमान वा अन्य धर्मीयांना आपल्या बहुसंख्येच्या बळावर धाकात ठेवून त्यांच्यावर आपले मत त्यांना लादायचे आहे. त्यांच्या सरकारची एवढ्या दिवसातली वाटचाल आणि त्यांच्या पक्षाचे निवडणूक काळापासूनचे एकधर्मीय धोरण याची साक्ष देणारे आहे. राष्ट्रीय एकात्मता वा हिंदू मुस्लीम ऐक्य आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार या संकल्पनांपासून अशा माणसांनी व त्यांच्या संघटनांनी आपले दूरवरचे अंतर आजवर राखले आहे. ते त्यांचे काम नाही आणि तशी जबाबदारी त्यांना पेलणारीही नाही. आदित्यनाथांचे हे वक्तव्य त्याचमुळे अल्पसंख्यकांनी एखाद्या अपमानकारक टवाळीसारखे घेतले आहे व तसे ते त्यांनी घेणे रास्तही आहे. आपली विश्वसनीयता खरी केल्याखेरीज व ती इतरांच्या मनावर ठसविल्याखेरीज अशा महत्त्वाच्या विषयावर पुढाऱ्यांनी बोलायचे नसते. परंतु आदित्यनाथांसमोर मोदींचा आदर्श आहे. मुसलमानांवर बहिष्कार, त्यांच्याविषयीचा दुरावा, त्यांना दिलेला त्रास व प्रसंगी त्यांची केलेली कत्तल हा बहुसंख्यकतावादाला सत्तेपर्यंत पोहचविणारा प्रकार आहे हे त्यांना कळून चुकले आहे. आपली बहुसंख्य जनताही विचार वा कार्यक्रम याहून धर्मश्रद्धा व जातीय संघटन यांच्यासोबत जास्तीची जुळली असल्याने स्वधर्माविषयीचे प्रेम सांगण्याहून परधर्मीयांची अशी टवाळी करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांच्या लाभाचाही होतो. आदित्यनाथांच्या आताच्या नमाजाविषयीच्या भाष्याचे खरे कारण त्यांच्या या लाभकारी राजकारणात दडले आहे हे उघड आहे आणि ते अल्पसंख्यकांएवढेच बहुसंख्येतील जाणकारांनीही गंभीर होऊन समजून घ्यावे असे आहे.