- रणजीत दळवी(ज्येष्ठ क्रीडा समीक्षक)आपल्याकडे ‘पुरस्कार’ म्हटले की वाद निर्माण होणार हे ठरलेलेच! मग ‘भारतरत्न’ असो की ‘खेलरत्न’! ते जाहीर होताच कोणा ना कोणावर घोर अन्याय झाल्याचे दृष्टीस पडते. या वेळी ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर होताच मल्ल बजरंग पुनियासह किमान चार - सहा खेळाडूंची योग्यता असून आपल्याला डावलले गेल्याची भावना होणे अगदी रास्त! बजरंग पुनिया आणि महिला मल्ल विनेश फोगाट यांना सरकारने ठरविलेल्या निकषांनुसार ‘पुरस्कार’ मिळावयास हवे होते. बरे हे ‘निकष’ २०१४ साली देशाच्या सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयाला अनुसरून होते. सरकारने २००२ साली निकषांना बगल दिल्यानंतर वाद निर्माण झाला व अखेरीस न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. तरीही पुरस्कार निवड समितीला काही अधिकार दिले गेले आणि त्यामुळेच यंदा निकषांनुसार ‘शून्य’ गुण मिळवणारा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची निवड झाली. यानंतर मल्ल बजरंग पुनियाने तातडीने केंद्रीय क्रीडामंत्र्यांची भेट घेतली. राज्यवर्धन राठोड हे देशाचे पहिले क्रीडापटू ज्यांना क्रीडामंत्री केल्याने ‘क्रीडा संस्कृतीहीन’ भारतात क्रीडाक्षेत्राचे काही भले होईल अशी भावना होती. पण बजरंग पुनियाला काही न्याय मिळाला नाही. क्रीडामंत्री झाल्यावर राज्यवर्धन राठोड यांच्यातला क्रीडापटू कोठे गेला, असा प्रश्न पडणे स्वाभाविक होते. ‘पुढल्या वर्षी बघू!’ असे पुढाऱ्याला शोभणारे आश्वासन त्यांनी दिले. त्याचप्रमाणे, ‘प्रथम न्यायालयात जाईन,’ असे बजरंग पुनिया ठामपणे म्हणाला, पण त्याने तसे केले नाही. त्यामुळे दोन वेळा पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या क्रिकेटपटू विराट कोहलीला पुरस्कार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यालासुद्धा पुढल्या वर्षी बघू, असेच आश्वासन दोनवेळा मिळाले होते.या प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, क्रीडाक्षेत्रात ‘वर्गभेद’, ज्याला आपण ‘क्लास डिव्हाईड’ म्हणतो तो प्रकार दिसला. ‘क्रिकेट’ खेळांचा राजा! हा खेळ खेळणारे वरच्या वर्गातले, ‘स्पेशल स्टेटसवाले’ असाच अर्थ त्यातून ध्वनित होतो. काल-परवाच कोठेतरी वाचले की, क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेला अन्य खेळांचे विश्वचषक किंवा आॅलिम्पिक खेळांचा दर्जा देण्यात यावा, क्रिकेटच्या आशिया चषक स्पर्धेला एशियाडचा दर्जा द्यावा असे एका विद्वानाने म्हटले. खरोखरच क्रिकेट हा भूतलावरील सर्वश्रेष्ठ खेळ असे संबोधणाºयांची कीव करावी वाटते!आज जगामध्ये पाच - सहा देश हा खेळ खºया अर्थाने खेळतात व त्यापैकी चार देश तर भारतीय उपखंडातले आहेत; आणि क्रिकेटला सर्वोच्च दर्जा द्या? नीरज चोप्रा, हीमा दास यांनी आत्ताच कोठे देशाला जागतिक स्तरावर एक ओळख मिळवून दिली. सौरभ चौधरी, लक्ष्य शेवरन व विहान शार्दुल ही नुकतीच मिसरूड फुटलेली पोरे एशियाड नेमबाजीमध्ये सुवर्णपदके मिळवत भारतामध्ये क्रीडासंस्कृतीच्या बीजाला अंकुर फुटल्याची जाणीव करून देत आहेत. अशा वेळी मल्ल बजरंग पुनियावर अन्याय होणे उचित आहे? एशियाड स्पर्धेमधील त्याने मिळवलेले दोन पदके, तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक, रौप्यपदक त्याचप्रमाणे, विश्व स्पर्धेतील कांस्यपदक आणि त्याच्या एकूणच पराक्रमाचे काहीच मोल नाही का? खेळाडू म्हणून विराट कोहलीचे कौतुक नक्की व्हावे, पण त्यासाठी अन्य कोणाचा बळी जाऊ नये!
क्रीडाक्षेत्रामध्ये ‘वर्गभेद’ झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:33 PM