- डॉ. व्यंकटेश हेगडेआपली गोमंत भूमी म्हणजे देवभूमी. देवभूमी हे बिरूद मिरवायला इथे देवळं आहेत. चर्चेस्, मशीदीही आहेत. इथला मानकुराद आंबा बाकीच्या आंब्यापेक्षा रूचकर व गोड आहे. इथे देवळं आहेतच; पण निसर्गाच्या एका दैवी संगीतावर डोलणारी माडाची व पोफळीची झाडं आहेत. इथं सूर्याचं दर्शन बऱ्याच लोकांना त्याच्या समुद्रातील प्रतिबिंबात होतं. डोलणारी शेतं, मायेच्या सावलीचा विसावा देणारी आंब्या-फणसाची झाडं. झुळझुळ डोलणारी शेते... तात्पर्य, इथला देव देवळातच नाही तर निसर्गातही त्याची प्रचिती आहे.देवळं बांधणं हा गोवेकराचा छंद. म्हणून गोव्यात असंख्य देवळं आहेत. देवळात देवाच्या मूर्ती आहेत. रोज पूजा अर्चा होत आहे. उत्सवप्रेमी गोवेकरांना खांद्यावरील देवाच्या पालखीचं वजन कळतच नाही. उत्सवामुळे नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी बहरत असतात. भजनात आम्ही संत ज्ञानेश्वर ते तुकोबारायांचे अभंग अगदी विविध रागात गातो; पण त्या अभंगाचा अर्थ लक्षात घेत नाही. खरं भजन म्हणजे त्या अभंगाचा अर्थ लक्षात घेऊन ते संताचे विचार आचरणात आणावे. मानसिक ताण तणावाच्या दिवसात एखादा देवाच्या नामाचा गजर गुणगुणावा किंवा शक्य असल्यास सकाळी नामस्मरण करावं. देवळात मद, मत्सर, वासना, लोभ, राग, द्वेष आदी दैत्यी (राक्षसी) गुणांबद्दल जागृती येऊन त्या गुणांचा त्याग करावा आणि प्रेम, शांती, आनंद, सेवा, दान, करुणा त्या दैवी गुणांचा साक्षात्कार व्हावा. ते गुण बहरावेत हे देवळाचं प्रयोजन. देवळांत देवाची मूर्ती आहे त्या मूर्तीसमोर आपल्या अंतरातील दुर्गण व दैत्यी गुण त्यागून देव बनून उभं रहावं. आपल्या अंतरातला देव त्या मूर्ती समोर बसून अनुभवावा. दैवी गुणांत आपल्यातल्या देवत्वाचा साक्षात्कार व्हावा. जागृत होत, मत्सर, राग, लोभ, आकस, वासना आदी गुणांना देवळातच देवाच्या चरणी वहावे. तात्पर्य देवालयाचं प्रयोजन हे देवळातून बाहेर देव बनून यावं.
सोन्याची द्वारका करणारा खरा दामबाब दिसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 02:04 IST