- तुषार गांधीराष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन ७0 वर्षे उलटलीत. ती हत्या केवळ त्यांच्या देहाची होती. बापूंचे विचार आजही समाजात खोलवर रुजले आहेत. ते वेळोवेळी व्यक्त होतात. समाजातील द्वेषयुक्त विचारसरणीच्या लोकांची तीच खरी अडचण आहे. म्हणूनच, त्यांच्या मनात बापूंविषयी आत्यंतिक चीड आहे. त्यांची ही चीड वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त होत असते. त्यांचे व्यक्त होण्याचे माध्यम आणि प्रकार वेगवेगळे असतात. यातूनच नथुराम गोडसेचे जाहीरपणे समर्थन करण्याचे धारिष्ट्य ही मंडळी बिनदिक्कतपणे करतात. आधी बापूंची आणि आता त्यांच्या विचारांची ही एक प्रकारची हत्याच होय.विविधता हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांचा सन्मान केलाच पाहिजे. बापूंचे अहिंसावादी विचार कितीही योग्य असले, फलदायी असले, तरी ते सर्वांना मान्य असतीलच, असे नाही. मुळात लोकशाही व्यवस्थेत तशी अपेक्षा करणेही यथोचित नाही. घटनेने प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य दिले आहे आणि सोबतच अभिव्यक्तीस्वातंत्र्यही दिले आहे. त्यामुळेच समाजात भिन्न विचारसरणीची मंडळी निर्भीडपणे व्यक्त होताना दिसते. पण, बापूंच्या पुण्यतिथीच्या दिवशी उत्तर प्रदेशात जो प्रकार घडला, तो बापूंच्या विरोधी विचारसरणीच्या मंडळीची कीव करावासा वाटणारा होता. बापूंनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले. देशासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले. त्यांच्या प्रतिमेवर अलिगढच्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे यांनी गोळ्या झाडल्या. हा घृणास्पद प्रकार समजला, तेव्हा मला स्वाभाविकपणे प्रचंड राग आला; पण लगेच त्याचे रूपांतर हास्यात झाले. हसू आलं ते त्यांच्या बालिश कृत्याचं आणि द्वेषानं ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या विचारांचं. मनातल्या मनात या प्रकाराची मी कारणमीमांसा केली.बापूंच्या प्रतिमेवर गोळ्या झाडतानाचा पूजा पांडेचा व्हिडीओ बारकाईने बघितला असता, तिला मागून कुणीतरी देत असलेल्या सूचना ऐकायला येतात. बापूंच्या प्रतिमेवर किती गोळ्या झाडायच्या, कशा झाडायच्या, हे तिला कुणीतरी मागून सांगत होतं. आपल्या या कृत्यानं देशभरात खळबळ माजेल, याची या मंडळींना पुरेपूर कल्पना होती. झालेही नेमके तसेच. सोशल मीडियाचा प्रभाव अलीकडच्या काळात प्रचंड वाढला आहे. पूजा पांडेचा व्हिडीओ लगेचच देशभर व्हायरल झाला आणि वृत्तवाहिन्यांना हॉट न्यूज मिळाली. समाजहिताची ढीगभर कामं करून जेवढी प्रसिद्धी मिळवता आली नसती, त्याहून जास्त प्रसिद्धी पूजा पांडेला रातोरात मिळाली. त्यामुळे हे कृत्य करण्यामागे त्या मंडळीचा मुख्य उद्देश प्रसिद्धी मिळवण्याचाच असेल; पण या प्रसिद्धीसाठी कोणता मार्ग निवडायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कुणाला राजघाटावर जाऊन प्रसिद्धी मिळवणे योग्य वाटते, तर कुणाला बापूंच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून. राजघाटावर पुष्पांजली अर्पण करून प्रसिद्धी मिळवण्याएवढी कुवत ज्या मंडळीची नसते, ती मंडळी मग दुसरा मार्ग निवडतात. हा मार्ग चुकीचा असला तरी, शासनव्यवस्थेवरील ‘दृढ’ विश्वासामुळे यात त्यांना फारसा धोका वाटत नाही. अलिगढच्या घटनेत संपूर्ण देशाने तो अनुभव घेतलाच. कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात असल्याचे देशाला दाखवण्यासाठी तेथील यंत्रणेला सहा दिवस लागले. अटकेच्या वेळीही आरोपींच्या चेहऱ्यावरील हावभाव क्रांतिकारकांपेक्षा कमी नव्हते. एकूणच काय, तर हा संपूर्ण प्रकार म्हणजे निव्वळ नाटक होते. आधी पूजा पांडेने बापूंच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याचे नाटक केले आणि नंतर सरकारनामक व्यवस्थेने तिला अटक करण्याचे नाटक केले.देशात आपलीच सत्ता आहे, त्यामुळे आपलं कुणी काय वाकडं करणार, याची खात्री असल्यामुळे अशा प्रवृत्तींची हिम्मत वाढते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: महात्मा गांधींच्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत. आपल्या भाषणांमधून ते बापूंचं माहात्म्य अनेकदा आवर्जून सांगतात. देशाचा सर्वेसर्वा बापूंचा अनुयायी असताना, बापूंच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याची हिम्मत कुणी करत असेल, तर हे सर्व एकाच माळेचे मणी तर नाहीत ना, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.सत्ताप्राप्तीची लालसा किती खालच्या थराला गेली आहे, हे देखील अशा घटनांमधून अधोरेखित होते. राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संलग्न संघटना मतांचे राजकारण करण्यासाठी असे नीच प्रकार करताना अनेकदा दिसतात. त्यातून त्यांचे उद्देश काही अंशी साध्य होत असतील; मात्र समाजाची दिशाभूल करून, द्वेषाचे राजकारण करून मिळवलेली सत्ता दीर्घकालीन नसते, हे निश्चित. समाजावर सत्प्रवृत्तींचाच पगडा अधिक आणि दीर्घकालीन असतो. या सत्प्रवृत्तींचे विचार सुप्त असतात. ब-याचदा ते व्यक्त होत नाही; मात्र अशा घटनांचे ते नक्कीच चिंतन करतात आणि त्यातून होणारे मतपरिवर्तन हे दीर्घकालीन असते.बापूंची हत्या करणाºया नथुराम गोडसेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बापूंचे विचार कधीच संपणार नाहीत. बापूंचे विचार हा समाजाला मिळालेला अमर ठेवा आहे. तो समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतासारखा आहे. त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. समाजातील दुष्प्रवृत्तींची हीच खरी शोकांतिका आहे. म्हणूनच, ७0 वर्षांनंतरही त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याची, त्यांच्या विचारांना जागोजागी विरोध करण्याची गरज त्यांना भासते. या दुष्प्रवृत्ती दुसºया ग्रहावरून आलेल्या नाहीत. ती देखील आपल्यासारखीच हाडामांसाची माणसं आहेत. त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही; पण चिंता वाटते ती समाजाची आणि खासकरून तरुणांची.आयुष्यभर अहिंसेचे तत्त्व जपणाºया बापूंच्या प्रतिमेवर गोळ्या झाडतानाची दृश्ये त्यांच्या मनावर कशा प्रकारे प्रतिबिंबित होत असतील, हा खरंच चिंंतनाचा विषय आहे.तुमच्या गोळ्या मी जिवंतपणी माझ्या छातीवर झेलल्या. आता माझ्या प्रतिमेवरही गोळ्या झाडता, हरकत नाही; पण जिवंत प्राणिमात्रांवर गोळ्या झाडण्याचे पाप करू नका. कदाचित, माझ्या देहाचा नाश करून तुमचे समाधान झाले नसेल, म्हणूनच तुम्हाला माझ्या प्रतिमेवर गोळ्या झाडाव्या लागत आहेत. यातूनच, तुम्हाला समाधान मिळत असेल, तर त्यापेक्षा आणखी चांगली गोष्ट काय आहे?(लेखक महात्मा गांधी यांचे पणतू आहेत.)- शब्दांकन : राजू ओढे
बापूंच्या हत्येनेही ते समाधानी नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 12:43 PM
महात्मा गांधी यांची हत्या करूनही त्यांचा अहिंसेचा, प्रेमाचा, सत्याचा संदेश संपवता न आल्यानेच अत्यंत संतापाच्या भावनेतून बापूंच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याचा घृणास्पद प्रकार करण्यात आला. सत्ताप्राप्तीच्या लालसेतून असे प्रकार केले जातात. अर्थात, देशातील युवावर्ग या घटनेकडे कशा प्रकारे पाहतो, हाच औत्सुक्याचा विषय आहे.
ठळक मुद्देमहात्मा गांधी यांची हत्या करूनही त्यांचा अहिंसेचा, प्रेमाचा, सत्याचा संदेश संपवता न आल्यानेच अत्यंत संतापाच्या भावनेतून बापूंच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याचा घृणास्पद प्रकार करण्यात आलाराष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन ७0 वर्षे उलटलीत. ती हत्या केवळ त्यांच्या देहाची होती. बापूंचे विचार आजही समाजात खोलवर रुजले आहेत. ते वेळोवेळी व्यक्त होतात