यांना उलट्या, त्यांना मळमळ, लोकांना काय होत असेल..?

By अतुल कुलकर्णी | Published: September 1, 2024 02:00 PM2024-09-01T14:00:31+5:302024-09-01T14:00:52+5:30

Tanaji Sawant News: आपण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध आहात. त्याची प्रचीती उभ्या महाराष्ट्राला गेल्या आठवड्यात अनेक वेळा आली. अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीत बसले की बाहेर आल्यानंतर उलट्या होतात हे आपण सांगितले. इतके स्पष्टपणे बोलणारा नेता या राज्यात दुसरा नाही.

They are vomiting, they are nauseous, what is happening to people..? | यांना उलट्या, त्यांना मळमळ, लोकांना काय होत असेल..?

यांना उलट्या, त्यांना मळमळ, लोकांना काय होत असेल..?

- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई) 

प्रिय तानाजी सावंत,
आपण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध आहात. त्याची प्रचीती उभ्या महाराष्ट्राला गेल्या आठवड्यात अनेक वेळा आली. अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीत बसले की बाहेर आल्यानंतर उलट्या होतात हे आपण सांगितले. इतके स्पष्टपणे बोलणारा नेता या राज्यात दुसरा नाही. खरे तर आपण एक पुस्तकच लिहिले पाहिजे. "अकोला ते धाराशिव ते सुरत... गोहाटीमार्गे गोवा, मुंबई आणि मंत्रिमंडळातला प्रवेश" हा सगळा प्रवास आपण लिहिला तर ते जगातले बेस्ट सेलर पुस्तक होईल. राजकारणात येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना आपल्याला मंत्रिमंडळात घेतले तर आपण पक्षासाठी काय काय कराल असे आपण उद्धव ठाकरे यांना सांगितले होते? त्याची यादीदेखील त्या पुस्तकात द्या, म्हणजे महाराष्ट्राला आपली प्रचंड क्षमता लक्षात येईल. आपण स्पष्ट बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहात. परवा आपण केलेले विधान एकदम खतरनाक होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत म्हणजे अजित पवार गटासोबत मंत्रिमंडळ बैठकीत बसल्यानंतर बाहेर येताच आपल्याला उलट्या होतात असे आपण सांगितले. नेमक्या कोणत्या प्रकारच्या उलट्या होतात हे आपण अधून सांगितले असते तर बरेच झाले असते... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित दादा उपमुख्यमंत्री असताना आपण ठाकरेंच्या सोबत होतात. तेव्हा आपण अजितदादांकडे कामासाठी जात होता. तेव्हा आपल्याला उलट्या होत नव्हत्या. त्या आताच कशा सुरू झाल्या, याचा शोध घेण्याच्या सूचना दादांनी दिल्या आहेत. आपल्या गटात अशा उलट्या आणखी किती जणांना होतात तेही सांगितले तर सगळ्यांसाठी एकत्रितरीत्या औषधी खरेदीचे टेंडर काढता येईल. ते टेंडरदेखील थेट मंत्रिमंडळ बैठकीतच आपण मंजूर करून घेऊ. एक घाव दोन तुकडे..! तिथल्या तिथे सह्या करायला सांगू.. उगाच फाईल इकडेतिकडे फिरत ठेवण्यात काय अर्थ आहे. जेवढा वेळ जाईल तेवढा तेवढे 'टक्के' औषधाचा परिणाम कमी होईल. एक टक्कादेखील परिणाम कमी होऊन चालणार नाही. कोणत्याही औषधाचा १००% परिणाम होण्यासाठी किमान २०% डोस तरी पोटात गेला पाहिजे. म्हणजे उलट्या होणे, मळमळ होणे थांबेल. असे आपल्या कार्यालयातील काही सहकारी सांगत होते. ते या क्षेत्रातले (म्हणजे टक्केवारीच्या नव्हे) तज्ज्ञ डॉक्टर आहेत असेही कळले. असो. मागे आरोग्य विभागाच्या फिरत्या दवाखान्यासाठी वाहन खरेदी करण्याच्या प्रस्तावाची फाईल इकडून तिकडे फिरत होती. तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी अजित दादांना, मंत्रिमंडळ बैठकीतच त्याच्यावर सही करायला सांगितले. त्यावरूनही तिथे धुसफूस झाली, अशा बातम्या बाहेर आल्या. खरे-खोटे माहिती नाही. मागेही आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या अॅम्ब्युलन्सच्या १००% बिलासाठी मंत्रालयात फक्त ७ ते ८ टक्के चकरा मारणाऱ्या ठेकेदारांना त्यांच्या बिलाची काळजी नसावी. त्यांनी मंत्रालयात किमान २० % तरी चकरा मारल्या पाहिजेत. म्हणजे फायलीवर उपस्थित शंकांचे निरसन होते. त्यात आरोग्य विभागाची काय चूक..? उगाच त्यावरून मंत्री कार्यालयाला बदनाम करणारे लोक दादांच्याच गटाचे असावेत....

धाराशिवमध्ये प्रश्न विचारणाऱ्या एका शेतकऱ्याला आपण झापले ते बरेच झाले. तुमच्या सभेत तुम्हालाच प्रश्न विचारणारा तो शेतकरी नक्की अजितदादांच्या गटातून आलेला असेल. त्याच्याशी बोलताना तुम्ही, "सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही..." इतके रोखठोक बोलून त्याची मधून औकात काढली ते बरे झाले. शेतकरी असले म्हणून काय झाले.... आपला हा कित्ता आपल्या गटाच्या इतर नेत्यांनीही अंगी बाळगला पाहिजे. जेणेकरून सगळे शेतकरी १०० टक्के आपल्या पाठीला पाठ लावून उभे राहतील..!

तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. तुम्ही धाराशिव जिल्ह्यातले आपल्या गटाचे सगळे उमेदवार जाहीर करून टाका. शेवटी त्यांनादेखील आपल्याकडून निवडणुकीच्या काळात गांधीजींचे फोटो छापलेले रंगीत कागद हवे असतात. अनेकांना गांधीजींचे फोटो छापलेले कागद जमवण्याचा छंद असतो. आपल्यामुळे त्यांचा छंद पुरा होतो याची त्यांना चांगली जाणीव आहे. इतरांकडून मिळणारे गांधीजींचे फोटो छोटे छोटे असतात. त्यामुळे छंद पुरा होत नाही. आपल्याकडून मिळणारे गांधीजींचे फोटो छंद जोपासण्यासाठी पुरेसे असतात. त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नका, तसेही यंदाच्या निवडणुकीत गांधीजींचे फोटोरूपी विचार मोठ्या प्रमाणावर घरोघरी पोहोचवण्याची योजना सुरू आहेच ना... गांधीजी म्हणायचे, खेड्याकडे चला.... आपणही त्यांना खेड्याकडे नेण्यासाठी मदतच करत आहात. त्यामुळे आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे....
- आपलाच बाबूराव

Web Title: They are vomiting, they are nauseous, what is happening to people..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.