ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे? अशी स्वत:चीच समजूत अडवाणींनी घातली असेल का? भारतीय राजकारणातील एका तपस्वी नेत्याच्या आयुष्याच्या संध्याकाळची ही वेदना...आपल्या घरात कुणी मोठी माणसे आली तर आपण त्यांना बसायला जागा देतो. ते आदरातिथ्य असते. सार्वजनिक ठिकाणी असा मान दिला तर तो संस्काराचा भाग ठरतो. आजची मुले विनम्र नाहीत, अशी चर्चा एरवी घराघरांत सुरू असते. आपले सार्वजनिक जीवन संस्कारशून्य होत असल्याचे ते निदर्शक आहे.
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना परवा नागपुरात येताना विमानात आलेला अनुभव असाच दु:खद आणि वेदना देणारा आहे. म्हटले तर ही घटना तशी साधी. त्यात फार काय, असेही म्हणता येईल. पण, ज्येष्ठांचा मानसन्मान जेव्हा समाजाच्या चिंतेचा विषय ठरतो तेव्हा या घटनेची नोंद घेणे गरजेचे वाटते. दिल्लीहून नागपूरला येताना अडवाणी दुसºया रांगेत बसले होते. आयुष्यभर देशाची सेवा केलेला एक ज्येष्ठ नेता या ठिकाणी बसलेला पाहून काही संवेदनशील प्रवाशांना वाईट वाटले. त्यांनी पहिल्या रांगेतील एका तरुणाला अडवाणींना त्याच्या जागेवर बसू देण्याची विनंती केली. तो प्रवासी तरुण आनंदाने उठेल आणि अडवाणींना जागा देईल, असे त्यांना वाटले. पण, तो उठला नाही. ‘ही जागा मला मिळाली आहे, त्यामुळे दुस-याला बसू देण्याचा प्रश्नच नाही’, असे म्हणत त्याने तुच्छपणे नकार दिला. त्या तरुणाने अडवाणींना जागा दिलीच पाहिजे असा काही कायदा नाही. पण, ज्येष्ठांचा आपण सन्मान राखला पाहिजे ही आपल्या संस्काराची पहिली शिकवण असते. अडवाणी कोण आहेत हे आपण क्षणभर विसरून जाऊ. पण, आपल्या आजोबाच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकाचा असा अनादर करणे ही गोष्ट कोणत्या संस्कारात बसते?
अडवाणींऐवजी कुण्या सामान्य मंत्र्याच्याबाबतीत असे घडले असते तर त्या तरुणाच्या स्वातंत्र्याचे व ठामपणाचे स्वागतच केले असते. पण, वय, देशसेवा, तपस्या यातून जी माणसे श्रद्धेय ठरतात, त्यांच्या बाबतीत अशी विनम्रता दाखवणे ही कायद्याची मागणी नाही तर आपण संस्कारशील असण्याचे ते द्योतक ठरते. विनयशीलता हा मनुष्य धर्माचा भाग आहे. अशावेळी त्या तरुणाला असे का सुचले नाही? दोष केवळ त्या एकट्या तरुणाला देणेही योग्य नाही. विमानातील पहिल्या रांगेत इतरही प्रवासी होते. अडवाणींचा मोठेपणा न उमगण्याइतपत तेसुद्धा एवढ्या खुज्या मनाचे होते?
अडवाणी आज ९० वर्षांचे आहेत. या वयाची माणसे हळवी असतात, आपल्या आत्मसन्मानाबाबत संवेदनशील असतात. आपल्या घरातील वृद्ध आई-वडील एखाद्या कारणामुळे अस्वस्थ झाल्यानंतरची त्यांची अवस्था अशावेळी आपण अडवाणींना डोळयासमोर ठेवून समजून घेतली पाहिजे. या दु:खद प्रसंगाबद्दल अडवाणी कधीच बोलणार नाहीत. पण, त्यांच्या मनात हे शल्य अखेरच्या श्वासापर्यंत राहील. माणसाचे आयुष्य स्मरण-विस्मरणाच्या हिंदोळयावर असते तेव्हा अशा जखमा त्याच्या मनात खोलवर रुतून बसतात. ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे? अशी स्वत:चीच समजूत अडवाणींनी घातली असेल का? भारतीय राजकारणातील एका तपस्वी नेत्याच्या आयुष्याच्या संध्याकाळची ही वेदना आपल्या साºयांच्याच संस्कारातील डागाळलेपण सांगणारी आहे.
(gajanan.janbhor@lokmat.com)