घारापुरी बेट अर्थात ‘एलिफंटा के व्हज्’ हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. इ.स.चे नववे शतक ते १३वे शतक या कालखंडात पाषाणात खोदलेल्या या ऐतिहासिक लेण्यांना दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. मात्र, आजपर्यंत हे बेट अंधारात होते. चोहोबाजूंनी समुद्र आणि लखलखणाºया मायानगरीपासून अवघ्या सहा ते सात मैलांवर असणाºया या ऐतिहासिक बेटावर वीज पोहोचण्यासाठी ७० वर्षांची प्रतीक्षा करावी लागली, हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. १९८७ला या लेण्यांना ‘जागतिक वारसा स्थाना’चा दर्जा देण्यात आला. मात्र, त्या वेळीही येथील वीजपुरवठ्याबाबत विचार झाला नाही. दरवर्षी घारापुरी बेटावर महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे ‘एलिफं टा महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. त्या वेळी तात्पुरती वीज येथे उपलब्ध करून दिली जाते. मात्र, त्या वेळीही येथे येणाºया मान्यवरांनी एवढी वर्षे विजेच्या प्रश्नाबाबत वाच्यता के ली नाही.मुंबईपासून हाके च्या अंतरावर आणि न्हावा शेवा बंदरापासून अगदी जवळ असणाºया बेटवासीयांना विजेसाठी ७० वर्षे झगडावे लागले. येथील अंधार दूर होण्यासाठी २०१८ साल उजाडावे लागले. या कालावधीत येथील राजबंदर, मोराबंदर आणि शेतबंदरच्या रहिवाशांना सरकार, सरकारी यंत्रणा यांचा सातत्याने पाठपुरावा करावा लागला. आज ही गावे विकासापासून दूर आहेत. येथे रस्ते, पाणी, आरोग्य या पायाभूत सुविधा नाहीत. शिक्षणासाठी शाळा असल्या तरी त्या केवळ दहावीपर्यंत आहेत. १२५० लोकसंख्या असणाºया या गावातील मुलांना आजपर्यंत दिव्यांच्या मंद प्रकाशात अभ्यास करावा लागला. मात्र, आता वीज आल्याने या मुलांच्या चेहºयावरही हासू उमटले आहे. ३० वर्षांपूर्वी येथे विद्युत जनित्राची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे दिवसातून सव्वातीन तास वीज या बेटवासीयांना मिळू लागली. सायंकाळी ७ ते रात्री १०.१५ या काळात येथे विजेचा लखलखाट असे. मात्र, त्यानंतर संपूर्ण बेटावर अंधार. त्यामुळे या सव्वातीन तासांत बेटवासीयांना आपली दैनंदिन कामे दमछाक करत उरकावी लागत असत. मात्र, आता येथे सरकारच्या कृपेने २५ कोटींच्या वीजपुरवठा करणाºया प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ निरु पणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. या विद्युत प्रकल्पासाठी घारापुरी बेटावर न्हावा समुद्रखाडीतून १८ किलोमीटर लांबीची सबमरिन केबल टाकून घारापुरीला वीजपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. त्यामुळे या बेटवासीयांचा आता तरी विकास होईल, अशी आशा पल्लवीत झाली आहे. मात्र, तरीही आर्थिक राजधानीजवळील प्रसिद्ध अशा घारापुरी बेटावर वीज पोहोचण्यास ७० वर्षे लागली, ही गोष्ट नक्कीच विचार करायला भाग पाडणारी आहे. यापुढे येथील विकासासाठी सरकार काय प्रयत्न करणार? याकडे या बेटवासीयांचे लक्ष लागले आहे.
गोष्ट अंधारातल्या बेटाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 4:03 AM