- प्रल्हाद वामनराव पैजीवनात सुखी, यशस्वी होण्यासाठी माणसाची सतत धडपड सुरू असते. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे हे आपल्याला ज्ञात आहेच. त्यासाठीच आतापर्यंत आपण व्यवसाय व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, अर्थ व्यवस्थापन इ. शिकत आलोय. पण हे सर्व शिकत असतानाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपण जीवन जगत असतो. करिअर, कुटुंब, आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध या सर्वांचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध येत असतो. म्हणूनच जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आयुष्याचे व्यवस्थापन जमणे खूप गरजेचे आहे. त्यालाच आपण लाइफ मॅनेजमेंट असे म्हणतो. सदगुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्या तत्त्वज्ञान आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते. जीवनविद्या म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवनविद्या हे शास्त्र आहे. पण जेव्हा हे शास्त्र आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणतो तेव्हा ती जीवन जगण्याची कला होते. आयुष्यात आपल्याला सतत यशस्वी व्हावे असे वाटत असते. पण जेव्हा यश मिळत नाही तेव्हा आपण काय करतो...? आपण आपल्या अपयशाचा दोष दुसऱ्यांना देऊन मोकळे होतो. उद्योगधंद्यात अपयश आले तर वरिष्ठ किंवा कनिष्ठ सहकारी यांना दोष देतो. नातेसंबंधात आपण नेहमीच दुसºयांनाच दोषी ठरवतो आणि अगदीच कोणी सापडले नाही तर दैवाला, नशिबाला दोष देण्यात तर आपली मास्टरीच असते. काही लोक तर सगळीकडे सांगत फिरतात, ‘वक्त से पहले और नसिब से ज्यादा इन्सान को कुछ नही मिलता.’ त्यांचे हे वाक्य कोळून प्यायल्यासारखी मग त्यापुढची पिढी वागू लागते आणि समाजात अशा प्रकारे गैरसमज वाढत जातात. जर दैवात असेल तसेच घडणार असेल तर आपण काम, प्रयत्न कशाला करायचे किंवा जर नशिबात नापास होणार असे लिहिले असेल तर अभ्यासच कशाला करायचा अशी वृत्ती निर्माण होऊ शकते. खरे तर अपयशाचे खापर इतरांवर आणि यशाचे कर्तृत्व स्वत:कडे घेणे हा माणसाचा स्वभावगुण आहे. सदगुरू सांगतात, ‘जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच.’ थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपल्या आयुष्यात जो काही परिणाम आहे मग ते यश असेल किंवा अपयश असेल. आपण त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.
विचारांचा करा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 5:07 AM