माझ्या कारकिर्दीच्या खूप नंतरच्या टप्प्यावर मी डॉ. श्रीराम लागू यांना भेटले. त्यांचे काम आणि नाव तोवर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले होते, अशा काळात त्यांची आणि माझी भेट झाली. माझे मोठे बंधू गो. पु. देशपांडे यांचे ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे एक अतिशय महत्त्वाचे नाटक डॉ. लागूंनी करायला घेतले. त्या वेळी नट आणि माणूस म्हणून त्यांचे वेगळेपण माझ्यापर्यंत रसिक म्हणून पोहोचत होते. परंतु, ‘चर्चा नाटक’ हा जो प्रकार आहे, ज्याला कोणी एरवी हात लावला नसता, डॉ. लागू यांनी ते लीलया पेलले. त्यांच्या ठायी अनेक गुणांचा समुच्चय असल्याचे समजून आले. डॉ. लागूंच्या रूपाने विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता, उत्तम नट, लेखक, जाणकार माणूस अशा अनेक अंगांनी संपन्न व्यक्तिमत्त्व आज आपण हरवून बसलो आहोत, याचे खूप वाईट वाटते. गेली काही वर्षे ते कार्यरत नसले तरी आपल्या आसपास आहेत, हाच एक मोठा दिलासा होता. त्यामुळे आज आपण फार पोरके झालो आहोत, अशी भावना मनात निर्माण झाली आहे.
डॉ. लागूंना नाट्यप्रशिक्षण घेऊन आलेल्यांबद्दल अतिशय कौतुक वाटायचे. ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’मधून शिक्षण घेऊन आलेल्या मी, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी अशा सर्वांबरोबर त्यांनी काम केले. महेश एलकुंचवार यांच्यासारख्या मोठ्या लेखकाच्या ‘आत्मकथा’ या नाटकात मी सर्वांत प्रथम डॉक्टरांबरोबर काम केले. रूपवेध या संस्थेतर्फे आम्ही ‘आत्मकथा’मध्ये भूमिका साकारल्या. ती माझी आणि डॉ. लागू यांची एकत्र काम करण्याची पहिली वेळ! आमच्यामध्ये वयाचे, अनुभवाचे खूप अंतर होते. तरीही, सर्वांशी मित्रत्वाच्या, समानतेच्या नात्याने नेहमी त्यांची वागणूक असायची. तालमीमध्ये ते आमचे काम अतिशय बारकाईने पाहत असत. त्यांनी कधीही ‘तू असं नाही, तसं करून बघ’ किंवा ‘तसं नाही, असं करून बघ’ सुचवलं नाही. ते तटस्थ भूमिकेतून दुसऱ्या माणसाच्या कामाकडे प्रेमाने, आदराने पाहत असत. त्यांच्या ठायी उदार मन आणि सौजन्य होते. ते अत्यंत शिस्तीचे आणि वेळ पाळणारे होते. नाटक किंवा कोणतेही काम करण्याचा गंभीर दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. सरावाला कोणी वेळेत पोहोचले नाही, तर ते अस्वस्थ व्हायचे. प्रत्येकाची कामातील एकाग्रता ते बारकाईने न्याहाळायचे. कारण, ते स्वत: एकाग्रतेचे, शिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यामुळे त्यांच्यापुढे ढिसाळपणा करण्याची कोणाचीही हिंमत नसायची. एनएसडीचे संचालक आणि माझे गुरू अल्काझी यांच्यासारखे महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. लागू.
- ज्योती सुभाष। ज्येष्ठ अभिनेत्री