शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

पाकला हवी तिसरी चपराक

By admin | Published: April 13, 2017 2:32 AM

कुलभूषण जाधव या भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्याला सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा हा केवळ

कुलभूषण जाधव या भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्याला सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा हा केवळ अन्यायाचाच नव्हे तर पाकिस्तानच्या मनातील दुष्टाव्याचा, सुडाचा व त्याच्या दीर्घकालीन भारतविरोधी वृत्तीचा पुरावा आहे. प्रत्यक्ष पाकिस्तानचे गुप्तहेर खातेही कुलभूषण यांच्याविरोधात पुरेसे पुरावे उभे करू शकले नाही हे त्याच खात्याचे माजी प्रमुख सरताज अजिज यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचा आरोप हा की भारताच्या रॉ या गुप्तचर यंत्रणेचा प्रतिनिधी म्हणून कुलभूषण यांनी त्या देशाच्या बलुचिस्तान या प्रांतात हिंसाचार व असंतोष माजविण्याचा प्रयत्न केला. वास्तव हे की कुलभूषण हे इराणमध्ये वास्तव्याला असताना पाकिस्तानच्या हस्तकांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांची पाकिस्तानात रवानगी केली. नंतरची दोन वर्षे त्यांचा ठावठिकाणा वा अन्य तपशील कुणालाही कळला नाही. या काळात त्यांच्याजवळ भारताचे पारपत्रही नव्हते. त्यांच्याजवळ असलेले पारपत्र पाकिस्तानचे व त्याच देशातील कोणा इसमाच्या नावाचे होते. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज कमालीचा असंतोष आहे आणि त्याला पाकिस्तानच्या जाचातून मुक्त व्हायचे आहे. एकेकाळी पूर्वीच्या पूर्व बंगालात (आताच्या बांगलादेशात) झाली तशी स्वातंत्र्याची चळवळच त्या प्रांतात सुरू आहे. ती दडपण्यासाठी पाक सरकारने तेथे अनेक लष्करी कारवाया केल्या व तेथील अनेकांचा बळीही घेतला. तेवढ्यावरही ती चळवळ तीव्र व उग्र राहिली आहे. तेथील जनतेचा असंतोष आपण शमवू शकत नाही म्हणून त्याचे खापर भारताच्या माथ्यावर फोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे आणि तो कुलभूषण जाधव यांच्यावर आरोप ठेवून त्याने अधोरेखित केला आहे. भारत व पाकिस्तान यांचे संबंध सुधारावे यासाठी सारे जग एकवटत असताना व भारताकडून तशी विधायक पावले उचलली जात असताना पाकिस्तानने भारताच्या एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा सुनावणे हा त्याने भारताचाच नव्हे तर साऱ्या जगाचा केलेला विश्वासघात आहे. पाकिस्तानी टोळीने मुंबईवर केलेल्या हल्ल्याचे प्रकरण तो देश अजूनही मान्य करत नाही. त्यासाठी आवश्यक असलेले सगळे पुरावे त्याच्या स्वाधीन केल्यानंतरही ते अपुरेच असल्याचा त्याचा हेका सुरूच आहे. याच काळात त्याने भारताच्या सीमेवरील आक्रमणही सुरूच ठेवले आहे. काश्मिरातील युद्धबंदी रेषेवर त्याच्या सैनिकांची भारतीय सुरक्षा जवानांशी होत असलेली झटापट रोजची आहे. शिवाय त्याच्या हस्तकांनी काश्मिरात त्यांचे चाळेही सुरूच ठेवले आहेत. गेली साठ वर्षे भारताशी असलेले वैर हाच त्या देशाच्या परराष्ट्र व्यवहाराचा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. आपण घुसखोरी करायची, सीमेवर गोळीबार सुरू ठेवायचा, आपले हस्तक कारगीलपासून मुंबईपर्यंत पाठवायचे आणि भारतात शांतता नांदणार नाही याची तजवीज करायची यातच त्या देशाची एवढी वर्षे वाया गेली आहेत. त्याच्या याच दुष्टाव्यापायी १९७१ मध्ये पूर्व बंगालचा प्रदेश त्याच्यातून बाहेर पडून आताचा बांगला देश तयार झाला आहे. नेमकी तीच स्थिती त्याच्या बलुचिस्तान या प्रांतात आहे. कराची व सिंधमधील अशांततेनेही त्याच्या सरकारला बेजार केले आहे. आपल्या देशातील असंतोषाला वाट करून देण्यासाठी व जनतेचे लक्ष अन्यत्र वेधण्यासाठी पाकिस्तानने आजवर त्याच्या भारतीय कारवायांचा व धोरणाचा वापर केला आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावलेला मृत्युदंडही त्याच मालिकेतला आहे. भारत सरकारने त्याचा निषेध करताना हा ‘जाणीवपूर्वक केला जाणारा खून आहे’ असे म्हटले आहे. त्याचवेळी आपल्या ताब्यात असलेल्या बारा पाकिस्तानी कैद्यांना सोडून देण्याचा विचारही त्याने थांबविला आहे. मात्र पाकिस्तान हा कमालीचा घमेंडखोर व आक्रमक वृत्ती असणारा देश आहे. तो अशा निषेधांची वा प्रतिक्रियांची फारशी पर्वा करीत नाही असेच आजवर दिसले आहे. भारतात हत्त्याकांडे घडवून आणणारे व साऱ्या जगाने आतंकवादी म्हणून शिक्कामोर्तब केलेले किती गुन्हेगार त्या देशात आज वास्तव्य करीत आहेत आणि तेथून ते त्यांच्या भारतविरोधी कारवाया चालवीत आहेत याची खबरबात साऱ्यांना आहे. कुलभूषणबाबतची त्याची आताची चिथावणी यासंदर्भात लक्षात घ्यायची आहे. पाकिस्तानच्या या उठवळपणाला पहिला व मोठा धक्का १९६५च्या युद्धात तेव्हाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला. त्याला दुसरा असा धडा त्याचे दोन तुकडे करून इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये दिला. त्यानंतरही त्याला शहाणपण आले नाही हे कारगील युद्धाने स्पष्ट केले आहे. एवढ्या मोठ्या धक्क्यांनंतरही ज्याला शहाणपण येत नाही त्याला त्याच्याच पद्धतीने जरब बसेल असे उत्तर देणे आता आवश्यक झाले आहे. पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. त्याला असे नमवायचे तर भारताला आपल्या जगातील मित्र देशांची त्यावर दबाव आणण्यासाठी मदत घ्यावी लागणार आहे. तेवढ्यावरही त्याला शहाणपण येत नसेल तर त्याला पुन्हा एकवार अद्दल घडविण्याची गरज आहे असेच म्हटले पाहिजे. कुलभूषण यांची सुटका करण्यासाठी आपण सर्व तऱ्हेचे प्रयत्न करू, असे सरकारने म्हटले आहे. त्या प्रयत्नांना अशा दबावाची गरज लागणार आहे.