योगशास्त्राचा प्रणेता पतंजली हा केवळ धर्मज्ञ नव्हता. तो पाणिनीसारखाच राजनीतिज्ञही होता. देशात वैदिक धर्माची नव्याने मुहूर्तमेढ करणाऱ्या पुष्यमित्र शुंगराजाचा तो प्रधानमंत्री होता. योगशास्त्राएवढाच त्याचा तत्कालीन राजकारणावरही फार मोठा प्रभाव होता. त्याच्या नावाने प्रथम आपली यौगिक व नंतर औद्योगिक इस्टेट उभी करणा-या आताच्या रामदेवबाबांनीही राजकारण, अर्थकारण आणि थोडेफार धर्मकारण अशा सर्व क्षेत्रांत आपली चांगली पैठ जमविली आहे. त्यांना राजकारण त्यातल्या काळवेळेनुसार चांगले समजते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांचा भारतीय जनता पक्ष यांचा उघड प्रचार केला. त्याआधीचे काही दिवस त्यांनी संघाशीही चांगलेच जुळवून घेतले होते. त्यांच्या या राजकीय मैत्रीचा लाभ त्यांना त्यांच्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर मिळाला. एकेकाळी नुसतीच योगविद्या शिकवत देशभर हिंडणारा हा बाबा नंतरच्या काळात पंजाबात त्याची औद्योगिक वसाहत उभारून थांबला. त्या वसाहतीत तयार होणारी अप्रमाणित औषधे व सौंदर्य प्रसाधने त्याने देशभर विक्रीला आणली. पतंजली या नावाने देशात सर्वत्र आढळणारी या बाबाची दुकाने आता थेट मोठ्या मॉलच्या आकाराची व तेवढ्या थाटाची झाली आहेत. त्यात येणाºया ग्राहकांचा वर्ग मोठा आहे आणि त्यातून येणाºया उत्पन्नाच्या बळावर या रामदेवबाबाने आता देशातील लहानसहान उद्योग खरेदी करण्याचाही सपाटा लावला आहे. सरकारने त्याला हजारो एकर जमिनी अतिशय वाºयामोलाने दिल्या आणि त्या या बाबाच्या उद्योगांची वाट पाहत तशाच पडित राहिल्या आहेत. ही स्थिती या बाबाचे मोदीप्रेम वाढविणारी आणि त्याची संघाशी असलेली जवळीक आणखी दृढ करणारी आहे. मात्र प्रत्यक्षात रामदेवबाबा मोदींपासून दूर जातानाच आता दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर जाहीर टीका करायला सुरुवात केली आहे. अस्मानाला भिडलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा, पेट्रोल आणि डिझेलचे भाव जमिनीवर आणा, अन्यथा तुम्हाला येत्या निवडणुकीत यश मिळणार नाही अशी शापवाणी त्यांनी उच्चारायला सुरुवात केली आहे. रामदेवबाबा हा नरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसºया क्रमांकाचा बाबा आहे. सर्वप्रथम या सरकारविरुद्ध आसारामबापू किंचाळत उठला. आसारामबापूच्या पायांना स्पर्श करणारी व त्यांचा आशीर्वाद घेणारी भाजपाच्या नेत्यांची अनेक छायाचित्रे लोकांच्या आताही स्मरणात आहेत. सध्या हा बापू त्याच्या पापाची फळे भोगत व सरकारच्या नावाने शिव्याशाप देत देशाच्या कुठल्याशा तुरुंगात पडला आहे. श्रीश्री रविशंकर याही सत्पुरुषाने आरंभी मोदी व संघ यांच्या आरत्या गायला सुरुवात केली होती. तशी ती अजूनही थांबली नाही. मात्र तिचा आवाज कमी झाला आहे. या श्रीश्रींनी दिल्लीजवळ यमुनेच्या काठी त्यांच्या भक्तांचा जो मोठा उरुस भरविला तिचे पाणी गढूळ करून टाकले. त्यासाठी श्रीश्रींना पर्यावरणाचे रक्षण करणाºया खात्याने पाच कोटींचा दंड केला. वास्तविक हा दंड श्रीश्रींसाठी फार मोठा नव्हे. त्यांचा कोणताही भक्त त्यांच्यासाठी तेवढी रक्कम सरकारात जमा करू शकला असता. परंतु श्रीश्रींसारख्या सत्पुरुषाला सरकारने दंड ठोठावणे हीच बाब त्याच्या महात्म्याला बाधित करणारी ठरली. तेव्हापासून त्यांचीही मोदीनिष्ठा कमी झाली आहे. रामदेवबाबाचा क्रमांक त्यानंतरचा आहे. रामदेवबाबा राजकारणात आहे, उद्योगात आहे, अर्थकारणात आहे आणि सौंदर्य प्रसाधनातही आले आहेत. असा माणूस मोदींवर आणि त्यांच्या सरकारवर संतापून बोलत असेल तर त्याची कारणे त्याच्या वैचारिक भूमिकेत न शोधता आर्थिक व औद्योगिक हितसंबंधांच्या क्षेत्रातच शोधावी लागतात. जमिनी मिळाल्या, त्या अल्प किमतीत मिळाल्या, बाजार मिळाला आणि देशभरची गिºहाईकीहीमिळाली. एवढे सारे ज्यांच्या राजकारणाच्या कृपेने प्राप्त करता आले त्यांच्याच राजकारणावर बाबाने तोंडसुख घेणे हे त्याचमुळे अचंबित करणारे आहे.रामदेवबाबा राजकारण, उद्योग अर्थकारण आणि सौंदर्य प्रसाधनातही आले आहेत. असा माणूस मोदी आणि सरकारवर संतापून बोलत असेल तर त्याची कारणे आर्थिक व औद्योगिक हितसंबंधांच्या क्षेत्रातच शोधावी लागतात.
नरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसरा बाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 4:24 AM